श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संगमनेर होणार राममय! प्रा. एस. झेड्. देशमुख उलगडणार जन्मभूमीच्या पाचशे वर्षांचा रक्तरंजीत इतिहास..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची वेळ जशी जवळ येत आहे, तसे संगमनेरातील वातावरण राममय होताना दिसत आहे. सोमवारी तर देशात दिवाळीच साजरी होणार असून घरोघरी त्याची जय्यत तयारी सुरु असल्याचेही चित्र माध्यमातून बघायला मिळत आहे. संगमनेरातही या स्वप्नपूर्ती सोहळ्यानिमित्त विविध संस्था, संघटना, मंडळे व मंदिर व्यवस्थापनांनी भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहेत. कारसेवकांनी स्थापन केलेली संस्था म्हणून ओळखल्या जाणार्‍या फ्रेंड्स सर्कल हिंदू मंडळाने शनिवारपासून सलग तीन दिवस वेगवेगळे उपक्रम आयोजित केले असून प्रा. एस. झेड्. देशमुख यांच्या प्रखरवाणीतून श्रीराम जन्मभूमीच्या पाचशे वर्षांचा रक्तरंजीत इतिहास ऐकण्याची संधी मिळणार आहे. रविवारी सायंकाळी चंद्रशेखर चौकातील श्रीराम मंदिरात सामुहिक श्रीरामरक्षा पठणाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. याशिवाय शहर व तालुक्यातील बहुतेक सर्वच मंदिरांवर विद्युत रोषणाई केली जाणार आहे.

अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मंगळवारपासून सुरुवात झाली. प्रभू श्रीराम प्रत्येक हिंदू धर्मियांच्या आस्थेचा विषय असल्याने देशातील बहुतेक हिंदू समाज या सोहळ्याशी जोडला गेला आहे. गेली पाचशे वर्ष प्रभू श्रीरामांचे जन्मस्थळ मुक्त करण्यासाठी ७७ वेळा आक्रमणं झाली. प्रत्येक लढाईत हजारो रामभक्तांचे बळी गेले. १५२८ सालच्या घनघोर युद्धात १ लाख ७५ हजारांहून अधिक रामभक्तांनी प्राणार्पण केले. त्यानंतरही अपवाद वगळता प्रत्येक राजवटीत जन्मभूमी मुक्तीसाठीचा लढा सुरुच राहिला आणि त्यातून रामभक्तांचे बळीही जात राहिले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हा वाद न्यायालयाच्या कक्षेत आला आणि दीर्घकाळ न्यायालयीन लढाही सुरु झाला. त्याचा निवाडा व्हायला २०१९ साल उजेडले आणि आज पाचशे वर्षांपासून ज्या स्थळासाठी लाखोंनी बलिदान दिले त्या सर्व रामभक्तांच्या स्वप्नाची पूर्ती होत आहे. त्यामुळे श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

अयोध्येतील कारसेवा आंदोलनात संगमनेरातील १४० कारसेवक सहभागी झाले होते. त्यात मेनरोड परिसरातील सहा तरुणांचाही सहभाग होता. याच तरुणांनी स्थापन केलेल्या फ्रेंड्स सर्कल मंडळानेही या सोहळ्यानिमित्त तीन दिवस वेगवेगळे उपक्रम आयोजित केले आहे. शनिवार २० जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता लालबहाद्दूर शास्त्री चौक येथे संगमनेर शहर व तालुक्यातील कारसेवकांचा मंदिराची प्रतिकृती देवून सन्मान व त्यानंतर प्रा. एस. झेड्. देशमुख यांच्या प्रखरवाणीतून श्रीराम जन्मभूमीच्या पाचशे वर्षांचा रक्तरंजीत इतिहास श्रवण्याची संधी मिळणार आहे. रविवार २१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता माळीवाडा मारुती मंदिर सभागृहात शालेय विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तीन गटात होणार्‍या या स्पर्धेसाठी स्वतंत्रपणे अकराशे, सातशे व पाचशे रुपयांची अनुक्रमे पहिली, दुसरी व तिसरी तर, प्रत्येकी तीनशे रुपयांची दोन उत्तेजनार्थ बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. सायंकाळी सात वाजता ‘ध्वज मिरवणूक’ काढली जाणार असून वाजतगाजत श्रीराम मंदिराला ध्वज दिला जाणार आहे.

सोमवार २२ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता माळीवाडा येथील श्री मारुती मंदिरात महाआरती व त्यानंतर लाडू प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. संगमनेर पुरोहित संघ व चंद्रशेखर चौक हिंदू मंडळाने रविवारी (ता.२१) सायंकाळी सात वाजता श्रीराम मंदिरात सामुहिक श्रीरामरक्षा पठणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सोमवारी सकाळी १० वाजता मुहूर्ताची गुढी उभारली जाणार असून दुपारी एक वाजता ब्राह्मण प्रतिष्ठान महिला मंडळाचे तालनृत्य, दीड वाजता शंखनाद ढोल-ताशा मंडळाचे सादरीकरण, सायंकाळी सहा वाजता स्ट्रॉबेरी स्कूलचे विद्यार्थी ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम’ ही नाटिका सादर करणार आहेत. तर, सायंकाळी सात वाजता सर्वेश व वैशाली देशपांडे, समृद्धी देशपांडे, शिवप्रसाद सस्कर ‘श्रीराम विजय गाथा’ ही सुरेल रामगीतांची मैफील सजवणार आहेत. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी, महाआरती आणि प्रसाद वाटप केले जाणार आहे.

सामाजिक व धार्मिक संस्था, देवस्थांनाशिवाय घरोघरी या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. तालुक्यातील बहुतेक सर्वच मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. काही हौशी रामभक्तांनी आपल्या घर व आस्थापनांवर तर शहरातील अनेक मंडळांनी आपापल्या परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा विद्युत रोषणाई केली आहे. रस्त्यारस्त्यावर रामप्रतिमा उभारुन रामधूनही वाजवली जाणार असल्याने संगमनेर राममय होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोमवारी दिवाळी साजरी करण्याचे व दिवाळीप्रमाणे दीपोत्सव साजरा करण्याचे आवाहन केल्याने देशातील माहोल रामभक्तीत चिंब भिजू लागला आहे.


गेल्या पाचशे वर्षांपासून ज्या जागेसाठी अविरत संघर्ष सुरु होता, तो २०१९ साली सर्वोच्च न्यायालयाच्या निर्वाळ्याने निकाली निघाला. आज त्याजागी अतिशय भव्य असे श्रीरामाचे मंदिर उभे राहीले आहे. १९९० पासून झालेल्या कारसेवेत संगमनेरातून अनेकजण सहभागी झाले, आम्हीही गेलो होतो. आज मंदिर उभे राहिलेले पाहताना आपोआप आनंदाश्रू वाहू लागतात. असंख्य लोकांचे बलिदान आणि कारसेवकांचे योगदान म्हणूनच आजचा सुदीन उगवला आहे. मंडळाकडून संगमनेरातील त्या सर्व कारसेवकांचा मंदिराची प्रतिकृती देवून होणारा सोहळा खरोखरी कृतज्ञता सोहळा ठरेल.

– ओंकार जोशी
संस्थापक : फ्रेंड्स सर्कल मंडळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *