खुषखबर! नवरात्रोत्सव ठरतोय संगमनेरकरांसाठी आनंददायी..! शहरासह तालुक्यातील रुग्णसंख्या कमालीची घटली मात्र, आजच्या अहवालात निम्म्याहून अधिक दुर्गाच संक्रमित..

नायक वृत्तसेवा संगमनेर
गेल्या काही दिवसांपासून शहर आणि ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी शहरातील अवघ्या तिघांसह तालुक्यातील छत्तीस जणांचे अहवाल पॉझिटिव आलेले असताना नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शहरातील दोघांसह तालुक्यात अवघे आठ रुग्ण समोर आले आहेत. आजच्या दिवसातील सर्वात दिलासादायक बाब म्हणजे प्रशासनाने केलेल्या बत्तीस जणांच्या रॅपिड अँटीजेन चाचणीतून एकही रुग्ण समोर आला नाही. आज प्राप्त झालेले सर्वच्या सर्व अहवाल खासगी प्रयोगशाळेकडून मिळाले आहेत. आज तालुक्यातील रुग्णसंख्येत संक्रमणाच्या सुरुवातीच्या काळाप्रमाणे अवघ्या आठ रुग्णांची भर पडल्याने तालुका 3 हजार 953 वर पोहोचला आहे.

मागील महिन्यापर्यंत कोविड बाधितांची संख्या दररोज मोठ्या प्रमाणात वाढत होती. त्यामुळे शहरासह तालुक्यात कोविड विषयी दहशत निर्माण झाली होती. मात्र या महिन्याच्या सुरुवातीपासून शहरातील रुग्णसंख्येला ओहोटी लागली. मात्र ग्रामीण भागात रुग्ण समोर श्रृंखला कायम राहिल्याने संगमनेरकरांची अवस्था ‘कही खुशी कही गम’ सारखी झाली होती. शनिवारी 36 जणांच्या अहवालातून शहरातील तिघे तर ग्रामीण भागातील 33 जण संक्रमित झाले होते. दररोज येणाऱ्या मोठ्या रुग्णसंख्ये पेक्षा कालची संख्या कमी असल्याने यंदाचा नवरात्रोत्सव संगमनेरकरांना दिलासादायक ठरेल असे चित्र निर्माण झाले होते. त्याची प्रचिती आज मिळाली, आज शहरातील केवळ दोघांसह ग्रामीणभागातील सहा जणांचे अहवाल पॉझिटिव प्राप्त झाले आहेत. आजच्या एकूण रुग्णसंख्येत मात्र तब्बल पाच महिला संक्रमित असल्याचेही समोर आले आहे.

खासगी प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालातून शहरातील नवीन नगर रोड परिसरातील 70 वर्षीय महिला व ताजणे मळा परिसरातील 56 वर्षीय इसमाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यासोबतच तालुक्यातील राजापूर येथील 29 वर्षीय महिलेसह चार वर्षीय बालिका, रहिमपूर येथील 53 वर्षीय महिला, सारोळे पठार येथील 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, शेडगाव येथील 29 वर्षीय तरुण, आश्वी बुद्रुक मधील 23 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. आजच्या रुग्णसंख्येत आठ रुग्णांची भर पडल्याने तालुक्याची एकूण रुग्णसंख्या 3 हजार 953 झाली आहे.

