राज्य सरकारने गांभीर्य लक्षात घेऊन शेतकर्‍यांना थेट मदत द्यावी ः विखे

राज्य सरकारने गांभीर्य लक्षात घेऊन शेतकर्‍यांना थेट मदत द्यावी ः विखे
जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान; पालकमंत्र्यांचे मात्र दुर्लक्ष
नायक वृत्तसेवा, राहाता
‘राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली. मात्र, राज्यातील अनेक मंत्री अद्याप नुकसानीची पाहणी करण्यासाठी फिरकले नाहीत,’ असा आरोप माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांनी केला आहे. ‘राज्य सरकारने मदतीसाठी केंद्राकडे बोट दाखविण्यापेक्षा गांभीर्य लक्षात घेऊन शेतकर्‍यांना थेट मदत द्यावी,’ अशी मागणीही त्यांनी केली आहे.


याबाबत बोलताना विखे यांनी म्हटले आहे की, ‘यापूर्वीही राज्यात वादळी वार्‍यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. परंतु राज्य सरकारने फक्त पंचनामे करण्याचा फार्स केला. शेतकर्‍यांना कवडीचीही मदत जाहीर केली नाही. आताही राज्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली, परंतु राज्यातील एकही मंत्री झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी अद्याप फिरकला नाही. शेतकर्‍यांचे अश्रू पुसायलाही वेळ नसलेल्या मंत्र्यांनी आता तरी बाहेर पडावे. केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकण्यापेक्षा आता तातडीने मदतीची घोषणा करावी. त्यांच्या खात्यात पैसे जमा करावेत. राज्यातील शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीचे भीषण चित्र पाहिले तर सोयाबीन, कांदा, भाजीपाला, कापूस, ज्वारी, तूर यांसह गाळपासाठी आलेले उसाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे साखर कारखान्यांसमोरही गाळपाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. खरीप हंगामातील संकटातून शेतकरी सावरत असतानाच आता रब्बीची पेरणीही अतिवृष्टीमुळे वाया गेल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. राज्य सरकारने आता पंचनाम्याची वाट न पाहता सरसकट मदत जाहीर करून दुबार पेरणीसाठी शेतकर्‍यांना सहकार्य करावे, अशी मागणीही विखे यांनी केली आहे.’


नगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात जास्त नुकसान झाले आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या मतदारसंघाचा दौरा करून नुकसानीची पाहणी केली. त्या पाठोपाठ भाजपचे माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनीही मतदारसंघात फिरून पाहणी केली आहे. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही त्यांच्या मतदारसंघातील शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूर जिल्ह्यात व्यस्त असले तरी तेही नगरकडे मात्र फिरकले नाहीत. याशिवाय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

Visits: 3 Today: 1 Total: 23119

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *