जिल्ह्यातील दोन तालुक्यात आढळले शंभराहून अधिक रुग्ण! अकोले तालुक्यात संगमनेरपेक्षा अधिक रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील तीन दिवसांपासून पाचशेच्या आसपास फिरणार्‍या जिल्ह्याच्या कोविड रुग्णसंख्येत आज काहीशी वाढ झाली असून जिल्ह्यातील दोन तालुक्यांमध्ये शंभराहून अधिक रुग्ण समोर आले आहेत. संगमनेर तालुक्यातील संक्रमण मात्र गेल्या मात्र गेल्या पाच दिवसांपासून 60 रुग्ण प्रतिदिवसाच्या सरासरी भोवतीच स्थिरावल्याने तालुक्याच्या सरासरीतही मोठी घट झाली आहे. आजच्या अहवालातून अकोले तालुक्यात संगमनेरपेक्षा अधिक रुग्ण समोर आले आहेत हे विशेष. आज शहरातील आठ आणि अकोले तालुक्यातील एकासह तालुक्यातील अवघ्या 58 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या आता 22 हजार 379 झाली आहे.

जून महिन्याच्या प्रारंभापासूनच जिल्ह्यातील संक्रमणाला ओहोटी लागून जिल्ह्याचा सरासरी रुग्णदर एक हजारांच्या खाली आला आहे. मात्र पहिल्या आठवड्यात संगमनेरातील संक्रमणाची गती जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत अधिक होती, त्यामुळे जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यांना दिलासा मिळालेला असतांना संगमनेरकरांच्या माथ्यावर मात्र कोविडचे भय घोंगावतच होते. परंतु गेल्या पाच दिवसांपासून तालुक्यातील संक्रमणाचा वेगही ओरण्यास सुरुवात झाली असून पहिल्या आठवड्यातील सरासरी 81 रुग्णगती कमी होवून आता प्रतिदिवस 76 रुग्णांवर आली आहे. गेल्या 11 दिवसांत तालुक्यात 846 रुग्ण आढळले आहेत. त्यातच गेल्या 6 जूनपासून तालुक्यातील रुग्ण समोर येण्याची संख्या 60 रुग्ण प्रतिदिवसाच्या आसपास स्थिरावल्याने संगमनेकरांनाही दिलासा मिळण्यास सुरुवात झाल्याचे समाधानकारक चित्र सध्या दिसू लागले आहे.

आज शासकीय प्रयोगशाळेच्या 12, खासगी प्रयोगशाळेच्या 13 आणि रॅपिड अँटीजेनच्या 33 निष्कर्षातून संगमनेर तालुक्यातील 58 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शहरातील अवघ्या नऊ जणांचा समावेश असून मालदाड रोडवरील 51 वर्षीय इसम, साईबन कॉलनीतील 22 व 21 वर्षीय तरुणी तर संगमनेर असा पत्ता असलेल्या 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 24 व 23 वर्षीय तरुण आणि 60 व 33 वर्षीय महिला बाधित झाल्या आहेत. त्यासोबतच अकोले तालुक्यातील गणोरे येथील 76 वर्षीय वयोवृद्ध इसमाची स्रावचाचणीही संगमनेरात घेण्यात आल्याने व त्यांच्यावर संगमनेरातच उपचार सुरु असल्याने त्यांचा समावेशही तालुक्याच्या रुग्णसंख्येत करण्यात आला आहे. आजच्या एकूण रुग्णसंख्येत तालुक्याच्या ग्रामीणभागातील 49 रुग्णांचा समावेश आहे.

मागील तीन दिवस जिल्ह्याची रुग्णसंख्या पाचशेच्या आसपास आली होती, मात्र गुरुवार व आजच्या शुक्रवारी त्यात काहीशी वाढ झाली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील बाधितांची दैनंदिन रुग्णसंख्या शंभराच्या आंत आल्याचा मोठा दिलासा मिळालेला असतांना आज त्याला गालबोट लागले असून आज जिल्ह्यातील श्रीगोंदा व जामखेड तालुक्यातून शंभराहून अधिक रुग्ण समोर आले आहेत. जिल्ह्यात आज सर्वाधिक 113 रुग्ण श्रीगोंदा तालुक्यातून तर 103 रुग्ण जामखेड तालुक्यातून समोर आले आहेत. याशिवाय श्रीरामपूर 88, अकोले 67, संगमनेर 58, नेवासा 53, कोपरगाव 52, पाथर्डी 47, पारनेर 35, शेवगाव 33, कर्जत व राहाता प्रत्येकी 29, नगर ग्रामीण 23, राहुरी 21 आणि महापालिका क्षेत्र व अन्य जिल्ह्यातील प्रत्येकी 9 अशा एकूण 769 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 2 लाख 71 हजार 199 झाली आहे.

Visits: 181 Today: 1 Total: 1793423

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *