भाजपाकडून वाट पाहण्याचे तर आघाडीकडून पुनर्विचाराचे सूत्र! नाशिक पदवीधरचा घोळ काही संपेना; सत्यजित तांबे यांची मात्र प्रचारात आघाडी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
नाशिक पदवीधर मतदार संघात नाट्यमय घडामोडी घडून तब्बल आठवडा उलटला आहे. मात्र या मतदार संघात कोणता उमेदवार कोणत्या पक्षाचा याचा फैसला करण्यात भाजपासह महाविकास आघाडीही अपयशी ठरली आहे. एकीकडे सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजपाकडून उमेदवारीच्या आशेने अर्ज दाखल करणार्या दोन्ही उमेदवारांची माघार झाली. तर, दुसरीकडे या घडामोडीनंतर ज्येष्ठनेते शरद पवार यांनी पुन्हा एकदा ‘राजकीय गुगली’ टाकीत महाविकास आघाडीने सत्यजीत तांबेंचा पुन्हा विचार करण्याची भूमिका मांडल्याने आधीपासूनच संभ्रमीत असलेल्या या मतदारसंघातील राजकीय घोळ आणखी वाढला आहे. मात्र यासर्व घडामोडींकडे दुर्लक्ष करीत अपक्ष उमेदवारी दाखल करणार्या सत्यजीत तांबे यांच्यासह त्यांच्या यंत्रणेने मात्र प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत असून मतदारांच्या भेटीगाठी घेवून त्यांना आपली भूमिका पटवून दिली जात आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीच्या दिवशी सत्यजीत तांबे यांनी ऐनवेळी राजकीय सोंगट्या टाकून नाशिक पदवीधर मतदार संघाला राज्यात चर्चेत आणले. तेव्हापासून या मतदार संघात निर्माण झालेली राजकीय अनिश्चितता सहा दिवसांनंतरही कायम आहे. या दरम्यान भाजपाकडून उमेदवारीची आस लावून बसलेल्या धुळ्याच्या शुभांगी पाटील यांनी भाजपाकडून उमेदवारी मिळणार नसल्याचे हेरुन थेट मातोश्री गाठली. महाविकास आघाडीतील जागा वाटपात नाशिक पदवीधरची जागा आधीपासूनच काँग्रेसच्या वाट्याला आहे. मात्र असे असतांनाही उद्धव ठाकरे यांनी त्यांना पाठींबा जाहीर केल्याने आघाडीत बेबनाव निर्माण झाल्याच्या चर्चा समोर येवू लागल्या होत्या.
त्यावर आघाडीतील अन्य दोन घटक पक्षांच्या प्रतिक्रिया समोर येण्यापूर्वीच ठाकरे गटाचे माजीमंत्री व शिर्डी लोकसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख बबन घोलप यांनी शुभांगी पाटील यांच्या नावाला विरोध करीत सुभाष जंगम यांना पाठींबा देण्याची गळ ठाकरे यांना घातली. त्यामुळे मातोश्रीचा ‘तो’ निर्णय महाविकास आघाडीतील परस्पर समन्वयासह स्वपक्षातील अंतर्गत मतभेद उघड करणारा ठरल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे. त्यातच जागांच्या अदला-बदलीबाबत ठोस निर्णय झालेला नसतांनाही शिवसेनेने परस्पर शुभांगी पाटील यांना पाठींबा देण्याची भूमिका घेतल्याने व पाटील यांनीही आपणच महाविकास आघाडीच्या उमेदवार असल्याचे सांगण्यास सुरुवात केल्याने आघाडीतील धुसफूसही चव्हाट्यावर आल्याचे राजकीय जाणकार बोलू लागले आहेत.
नाशिक पदवीधर मतदार संघात अद्यापही राजकीय संभ्रम कायम असतांना भाजपाकडून उमेदवारी मिळण्याच्या आशेने अर्ज दाखल करणार्या धनंजय जाधव व धनराज विसपुते या दोघांनीही सोमवारी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे या निवडणुकीत भाजपा सत्यजित तांबे यांना पाठींबा देईल असे चित्र निर्माण झालेले असतांना राजकीय डावपेच टाकण्यात माहीर मानल्या जाणार्या ज्येष्ठनेते शरद पवार यांनी आता गुगली टाकली आहे. त्यामुळे राजकीय डावपेचात आपल्या दोन्ही मातब्बर उमेदवारांची माघार घडवणारा भाजपा आता अडचणीत आल्याचेही दिसू लागले आहे. ज्येष्ठनेते पवार यांनी महाविकास आघाडीने सत्यजित तांबे यांच्याबाबत विचार करावा अशी सूचना करीत एकप्रकारे त्यांनी तांबे यांच्यासाठी आघाडीची दारे अजूनही खुली असल्याचेच दर्शविले आहे. त्यातून या मतदार संघातील संभ्रमात मात्र आणखी भर पडली आहे.
दुसरीकडे काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने आत्तापर्यंत केवळ डॉ.सुधीर तांबे यांच्यावरच शिस्तभंगाची कारवाई केलेली आहे. अपक्ष उमेदवारी दाखल करणार्या सत्यजित तांबे यांच्याबाबत मात्र माध्यमातील चर्चा वगळता अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यातच आपली उमेदवारी दाखल करताच तांबे यांनी आपण महाविकास आघाडीचेच उमेदवार असल्याचे व त्यासाठी सर्वांची भेट घेणार असल्याचे सांगत पक्षासोबत असल्याचेच दाखवून दिल्याने महाविकास आघाडीने त्यांना पाठींबा दर्शविल्यास आश्चर्य वाटायला नको. ठाकरे गटाच्या शिवसेनेने यापूर्वीच शुभांगी पाटील यांना पाठींबा दिला असला तरीही महाविकास आघाडीने तांबेंना पाठींबा दर्शविल्यास ठाकरे गटाची राजकीय कोंडी होणार आहे. त्यातही त्यांनी आपली भूमिका कायम ठेवल्यास त्यांच्यात पक्षातंर्गत फाटाफूट होण्यासारखी राजकीय स्थिती निर्माण होवू शकते.
यासर्व पार्श्वभूमीवर नेते व पक्ष यांच्या भूमिकांवर अवलंबून राहण्यापेक्षा सत्यजित तांबे यांनी मतदारांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या भेटीगाठी घेण्याचे धोरण राबविण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे त्यांची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात असतांना राज्यभरातील माध्यमे ती जाणून घेण्यासाठी त्यांच्या घराजवळ आठवड्यापासून तळ ठोकून आहेत, तर दुसरीकडे सत्यजित तांबे व त्यांचे वडिल डॉ.सुधीर तांबे हे दोघेही त्याकडे दुर्लक्ष करीत प्रचारातही आघाडी मिळवित असल्याचे चित्र सध्या नाशिक पदवीधर मतदार संघात दिसत आहे. आज सत्यजित तांबे यांनी नाशिक शहरासह जिल्ह्यातील मतदारांच्या भेटीगाठीचा कार्यक्रम हाती घेतला आहे, तर डॉ.सुधीर तांबे धुळे व नंदूरबारमधील मतदारांशी संवाद साधीत आहेत.
नाशिक पदवीधर मतदार संघातील निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपली आहे. मात्र निवडणुकीच्या रिंगणात कोणता उमेदवार कोणाचा झेंडा हाती घेणार आहे हे मात्र अजूनही स्पष्ट झालेले नाही. त्यातच अपक्ष उमेदवारी दाखल करणार्या सत्यजित तांबे यांनीही अजूनपर्यंत आपली ‘मन की बात’ समोर आणलेली नाही. त्यामुळे संपूर्ण मतदार संघात संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले असतांना तांबे बुधवारी किंवा गुरुवारी या विषयावरील आपले ‘मौन’ सोडतील असा राजकीय जाणकारांचा व्होरा आहे.