भांगरेंच्या ‘खेळी’ने अकोलेतील राजकीय पत्ते उलगडले! विद्यमान आमदार गोंधळात; तर ‘पाटील’ सत्तालाभाच्या मोहात..

नायक वृत्तसेवा, अकोले
राष्ट्रवादी पक्षामध्ये पवार काका-पुतण्या गटात फाटाफूट झाल्यानंतर राज्यात पक्षीय आणि संघटना पातळीवर दोन गट पडले आहेत. अकोले तालुक्यातही अशीच स्थिती आहे. येथे आमदार डॉ. किरण लहामटे, अगस्ति कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक सीताराम गायकर आणि अगस्ति कारखान्याच्या उपाध्यक्षा सुनीता भांगरे यांचा एक गट असे तीन गट तयार झाले आहे. मात्र, यातील सुनीता भांगरे यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी जवळीक साधल्याने राजकारणाची समीकरणेच बदलून गेली आहेत. यामुळे आगामी काळात होणार्या निवडणुकांत याचे प्रतिबिंब दिसण्याची शक्यता आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत थेट उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राष्ट्रवादीचे दोन गट तयार झाले. याचा परिणाम स्थानिक पातळीवरही पाहायला मिळत आहे. अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीवेळी पहिल्याच रांगेत अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे बसलेले पाहायला मिळाले. त्यानंतर दुसर्याच दिवशी शरद पवार यांची कराडला जावून सुनीता भांगरे यांनी भेट घेऊन पाठिंबा दर्शविला. त्यावेळी त्यांच्या सोबत अकोलेतील काही कार्यकर्ते होते.

या सगळ्या घडामोडींत शरद पवार आणि अजित पवार यांनी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी सभांचे आयोजन केले. या सभांना जाण्यापूर्वी सुरुवातीला अजित पवारांना पाठिंबा देणारे आमदार लहामटे यांनीही वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतली होती. जनता जो निर्णय घेईल तो मी मान्य करेल असे त्यांनी जाहीर केले होते. अकोलेतील शासकीय विश्रामगृहात कार्यकर्ते व पदाधिकार्यांशी चर्चा करुन दुसर्या दिवशी थेट मुंबईत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंची भेट घेऊन पाठिंबा दर्शविला.

परंतु, सुरुवातीला शरद पवारांना पाठिंबा दर्शविणारे अनेकजण अजित पवारांना भेटायला गेल्याचेही पाहायला मिळाले. तर अकोलेतील सहकारातील नेतेमंडळी थेट अजित पवारांच्या गटात सहभागी होण्यासाठी सरसावले आहेत. शुक्रवारी (ता.7) अगस्ति साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघ अशा संस्थांचा कारभार पाहणार्या पदाधिकार्यांची कारखान्यात गुप्त बैठक झाली. यात अजित पवारांना पाठिंबा देणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. त्यातून आता सहकारी संस्थांमध्ये राजीनामा नाट्यही सुरू होण्याची शक्यता आहे.

आधीच अजित पवारांचे खंदे समर्थक असलेले सीताराम गायकर, कैलास वाकचौरे, प्रकाश मालुंजकर आणि अशोक देशमुख यांनी उघडपणे पाठिंबा जाहीर केलेला असताना आता शरद पवारांच्या सभेला उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती भानुदास तिकांडे, उपसभापती रोहिदास भोर, माजी सभापती पर्बत नाईकवाडी, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रकाश नाईकवाडी यांनीही पाठिंबा दर्शवून जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी केली आहे. यामुळे अकोले तालुक्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलणार असून, त्याचा परिणाम आगामी निवडणुकांत पाहायला मिळणार आहे.

अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्याने तालुक्याच्या विकासकामांसाठी मोठा निधी आणता येईल. तसेच अगस्ति कारखाना आणि इतर सहकारी संस्थांना ऊर्जितावस्थेत आणण्यासाठीही मोठा फायदा होईल, यादृष्टीनेच सहकारातील नेतेमंडळी अजित पवारांच्या गटात सहभागी होणार असल्याचे सध्या तरी पाहायला मिळत आहे.

