अकोलेत अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी ‘सिटू’ची निदर्शने विविध संघटनांचाही मोर्चास पाठिंबा; केंद्रीय कर्मचार्‍यांचा दर्जाची प्रमुख मागणी

नायक वृत्तसेवा, अकोले
सिटू कामगार संघटना प्रणित अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता.4) अकोले पंचायत समिती येथे अंगणवाडी कर्मचार्‍यांनी तीव्र निदर्शने केली. अंगणवाडी कर्मचारी फेडरेशनमधील विविध संघटनांनी अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मागण्यांसाठी राज्यभर निदर्शने करण्याची हाक दिली होती. यानुसार ही निदर्शने करण्यात आली.

अकोले येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयांमध्ये अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने एकत्र आले. माकपच्या कार्यालयापासून मोर्चा काढून कर्मचार्‍यांनी अकोले पंचायत समितीवर धडक दिली. आपल्या विविध मागण्यांबाबत घोषणा देत यावेळी अंगणवाडी कर्मचार्‍यांनी तीव्र निदर्शने केली.

अंगणवाडी कर्मचार्‍यांना केंद्रीय कर्मचारी म्हणून दर्जा द्यावा, सदर मागणी मान्य होत नाही तोपर्यंत किमान 15 हजार रुपये मानधनवाढ तातडीने लागू करावी, सर्व अंगणवाडी कर्मचार्‍यांना निवृत्तीनंतर पेन्शन द्यावी, सर्वांना अंगणवाडीच्या कामासाठी नवीन मोबाईल व मोबाईलमध्ये मराठी अ‍ॅप तसेच मोबाईल देखभाल खर्च तातडीने द्यावा, मिनी अंगणवाडी कर्मचार्‍यांना पूर्ण अंगणवाडी कर्मचारी म्हणून दर्जा द्यावा, मदतनिसांना सेविकापदी बढतीबाबत निकष शिथिल करावे, पात्र सेविकांना सुपरवायझरपदी बढती द्यावी, अंगणवाडीची 2021 ची उन्हाळी सुट्टी मार्चपूर्वी जाहीर करावी, सेवाज्येष्ठतेप्रमाणे मानधनात वाढ लागू करावी, दुर्गम भागातील अंगणवाडी कर्मचार्‍यांचा बंद झालेला भत्ता पुन्हा सुरू करावा, अनेक अंगणवाडी ताईंचे गहाळ मानधन योग्य ती चौकशी करून तातडीने अदा करावे, अंगणवाडी इमारतीची नवीन बांधणी व दुरूस्तीसाठी तातडीने उपाययोजना करावी, अंगणवाडी ताईंना आरोग्याच्या सोईसह संपूर्ण कुटुंबाला मोफत पाच लाखांचा आरोग्य विमा लागू करावा, कोरोना सारख्या महाभयंकर आजारात जनतेची सेवा करत असताना मृत झालेल्या अंगणवाडी ताईंना 50 लाखांची विमा भरपाई तातडीने द्यावी, थकीत प्रवास भत्ता, इंधन खर्च, अमृत आहार खर्च व थकीत बिल तसेच इतर देणे तातडीने अदा करावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. गणेश ताजणे, आशा घोलप, मंगल गोरे, निर्मला मांगे, रंजना पराड, रंजना साबळे, ताई म्हशाळ, रोशनी शिंगोटे आदिंनी मोर्चाचे नेतृत्व केले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने ज्ञानेश्वर काकड, किसान सभेच्यावतीने डॉ. अजित नवले, सिटू कामगार संघटनेच्यावतीने सदाशिव साबळे व आशा कर्मचारी संघटनेच्यावतीने संगीता साळवे यांनी मोर्चास पाठिंबा दिला.

Visits: 121 Today: 1 Total: 1108219

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *