विखे पाटील कारखान्याकडून साई संस्थानला सॅनिटायझर
नायक वृत्तसेवा, शिर्डी
राज्य शासनाच्या आदेशाने श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी काही अटी व शर्तींवर खुले करण्यात आलेले असून साईभक्तांच्या सुरक्षितेसाठी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने 5 हजार लिटर सॅनिटायझर संस्थानला देणगी स्वरुपात नुकतेच दिले आहे.
कोरोना विषाणूच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्यावतीने 17 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. दरम्यान, राज्य शासनाच्या आदेशान्वये 16 नोव्हेंबरपासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटी व शर्तींवर खुले करण्यात आलेले आहे. मात्र, अजून कोरोनाचे संकट संपले नसून मंदिर खुले झाल्यामुळे साईभक्तांच्या आरोग्याच्या दृष्टीने दर्शनरांगेत सॅनिटायझेशन करणे, थर्मल स्क्रिनिंग करणे व दर्शनरांगेत प्रवेश करताना पाय धुण्याची व्यवस्था आदी उपाययोजना संस्थानच्यावतीने करण्यात आलेल्या आहेत. अशावेळी अधिक प्रमाणात सॅनिटायझरचा वापर करावा लागणार असल्यामुळे शिर्डी लगतच्या सॅनिटायझर उत्पादक साखर कारखान्यांना प्रत्येकी 5 हजार लिटर सॅनिटाझर देणगी स्वरुपात संस्थानला देणेबाबत आवाहन करण्यात आलेले होते. त्यानुसार पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्यावतीने माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे व खासदार डॉ.सुजय विखे यांनी 1675 लिटर सॅनिटायझर संस्थानला देणगी स्वरुपात दिले असून उर्वरित सॅनिटायझर संस्थानच्या आवश्यकतेनुसार टप्या-टप्याने देणगी स्वरुपात उपलब्ध करुन देणार आहेत.