शेंगादाणे विकणार्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग! लोकांनी बसस्थानकावरच चोपला; विनयभंगासह मारहाण करणार्यांवरही गुन्हा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
साकूरमधील अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार आणि त्यानंतर तिच्या आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संताप निर्माण झालेला असताना संगमनेरातून आणखी एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. या संतापजनक घटनेत बसस्थानकावर शेंगादाणे विकणार्या एका 36 वर्षीय विवाहित धेंडाने आपल्यापेक्षा निम्म्याहून कमी वयाच्या विद्यार्थीनीचा पाठलाग करुन तिचा विनयभंग केला. सलग तीन दिवस चाललेल्या या घटनेतील आरोपी बुधवारी बसस्थानकाजवळ दिसताच जमावाने त्याला चोपून काढले. या प्रकरणी सुरुवातीला पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन विनयभंगासह पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आज पहाटे विनयभंग करणार्या आरोपीकडूनही अज्ञात आठ इसमांनी मारहाण केल्याची तक्रार दाखल झाली आहे. या घटनेने संगमनेर तालुक्यातील महिलांची सुरक्षा आणि पोलिसांची भूमिका पुन्हा एकदा ऐरणीवर आली असून शहरातून संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलीचा विनयभंग होण्याचा प्रकार रविवारपासून (ता.17) सुरु होता. मालदाड रोड परिसरात राहणारी एक 17 वर्षीय मुलगी रविवारी पायी चालत महाविद्यालयात जात असताना तिरंगा चौकात पाठीमागून पांढर्या रंगाच्या मोपेडवरुन आलेल्या एका धेंडाने तिच्याकडे पाहुन हाताने इशारा करीत ‘तु सुंदर दिसतेस’ असे म्हणत तिची छेड काढली. यावेळी त्याने अश्लिल हावभावही केले आणि नंतर तो सुसाट वेगाने निघून गेला. रस्त्यावर असे विकृत फिरतच असतात असे समजून त्या मुलीने त्याच्या माकड चाळ्यांकडे दुर्लक्ष केले.

दोन दिवसांनंतर मंगळवारी (ता.19) सदरील मुलगी महाविद्यालयाकडे जाण्यास निघाली असता पुन्हा त्या धेंडाने पाठीमागून येत तिच्याकडे पाहुन इशारे करण्यास सुरुवात केली. यावेळी मात्र त्याच्या माकडचाळ्यांमध्ये वाढ झाल्याने वैतागलेल्या त्या मुलीने आपल्या मोबाईलमधून त्याचा फोटो काढला. सायंकाळी महाविद्यालयातून घरी गेल्यानंतर पीडित मुलीने घडत असलेल्या प्रकाराबाबत आपल्या मामांना कल्पना देत सकाळी काढलेला फोटाही दाखवला. पीडितेच्या मामाने त्यांच्या एका मित्राला तो फोटो पाठवून माहिती घेण्यास सांगितले. त्या दरम्यान बुधवारी (ता.20) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मामाच्या मित्राने छेड काढणार्या ‘त्या’ अधेडाला बसस्थानकावर शेंगादाणे विकताना पाहिले.

याबाबत त्याने आपल्या मित्राला कळविल्यानंतर काही वेळातच पीडित मुलीला घेवून तिचे मामा तेथे आले. यावेळी पीडितेने आरोपीला ओळखताच तिच्या मामाने मुलीची छेड का काढतोस अशी विचारणा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तेथे आसपासच्या लोकांचा जमाव गोळा होवू लागला. सदरचा प्रकार अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीचा असल्याचे समजल्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने आरोपीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे घाबरलेल्या पीडितेच्या मामाने आपल्या मित्रासह आरोपीला रिक्षात घालून थेट पोलीस ठाण्यात नेले आणि त्याच्या विरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम 354 (ड) सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्या कायद्याचे (पोक्सो) कलम 12 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली.

या धक्कादायक घटनेनंतर आज पहाटे एक वाजण्याच्या सुमारास विनयभंग आणि पोक्सोच्या गुन्ह्यातील आरोपी इम्रान रज्जाक सय्यद (वय 36, मूळ रा.मल्हारवाडी रोड, राहुरी, हल्ली मु.कुरण) यानेही अज्ञात सात ते आठ जणांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार फिर्यादी बसस्थानकावर असताना तीन अनोळखी तरुण त्याच्याजवळ आले. त्यातील एकाने ‘हाच आहे तो’ असे म्हणत त्याला शिवीगाळ सुरु केली आणि नंतर तिघांनीही त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. काही वेळाने एका मुलीसह आणखी चार ते पाचजण आले. त्यातील मुलीने ‘हाच मला तु फार आवडतेस असे म्हणत छेड काढतो’ असे सांगताच तेथे जमलेल्या सा ते आठजणांनी त्याची इथेच्छ धुलाई करीत त्याला चोपून काढले.

हा प्रकार सुरु असताना पीडित मुलीच्या मामाने आपल्या जोडीदारासह आरोपी इम्रान सय्यद याला रिक्षात घालून पोलीस ठाण्यात नेले. सायंकाळी सहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेची फिर्याद आज (ता.21) पहाटे एकच्या सुमारास दाखल करण्यात आली. विनयभंग करुन अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणार्या आरोपी इम्रान सय्यद याने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात सात ते आठ जणांविरोधात बेकायदा जमाव गोळा करणे, शिवीगाळ, धमकी व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने संगमनेरातील तणावाच्या वातावरणात आणखी भर पडली आहे.

राहुरीतून संगमनेरात स्थायिक झालेल्या इम्रान रज्जाक शेख या 36 वर्षीय धेंडाचे लग्न झालेले असून तो आपल्या पत्नी व तीन मुलांसह कुरणमध्ये वास्तव्यास आहे. त्याने ज्या मुलीचा पाठलाग करुन तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला त्या वयाची त्याची मुले आहेत. असे असतानाही हिंदुबहुल भागात जावून त्याने केलेले कृत्य शहराच्या शांततेला गालबोट लावणारे असून त्यातून शहरातील तणावात भर पडली आहे. त्यामुळे त्याच्या या कृत्यामागील हेतूचा सखोल तपास होण्याची गरज असून शहराची शांतता भंग करण्याचे षडयंत्र उघड होण्याची आवश्यकता आहे.

