खबरदार! आता कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास होणार पाचशेचा दंड… जिल्हाधिकार्यांचे पोलिसांना आदेश; तर नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सध्या कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत असून, बाधितांच्या संख्येत रोज नव्याने भर पडत आहे. तर काहींचा विषाणूने बळी जात आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करणे गरजे असताना वारंवार निष्काळजीपणा होत असल्याच्या घटना समोर येत आहे. यामुळे प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आकारण्यात येणारा शंभर रुपयांचा दंड आता पाचशे रुपये करण्यात आला आहे. हा दंड आकारण्याचा अधिकार आता थेट जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी पोलिसांना दिला असून सोमवारपासूनच अंमलबजावणी करण्याचे आदेश बजावले आहेत. यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करुन कोरोनाचा लढा यशस्वी करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही केले आहे.
देशभरात कोरोनाचा विषाणूचा पुन्हा उद्रेक झाला आहे. रोज नव्याने बाधितांच्या संख्येत भर पडण्यासह अनेकांचे बळी जात आहे. यावर खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने पुन्हा निर्बंध टाकण्यास प्रशासनास सूचित केले आहे. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणि नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी नव्याने आदेश बजावले आहेत. त्यातच सध्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम होत आहे. यावेळी मास्क न वापरणे, सुरक्षित अंतर न ठेवणे, धूम्रपान करणे, गर्दी करणे यासाठी शंभर रुपये दंड आकारण्यात येत आहे. परंतु, दिवसेंदिवस कोविडचे संक्रमण वाढत असूनही नागरिक सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करुन संचार करताना दिसत आहे. त्यासाठी आता सोमवारपासूनच पाचशे रुपये दंडाची आकारणी करण्याचे आदेश जिल्हाधकार्यांनी निर्गमित केले आहे.
यामध्ये धार्मिक ठिकाणी अथवा सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे, सुरक्षित अंतर न पाळणे, धूम्रपान करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे याचा समावेश आहे. यामुळे उल्लंघन करणार्यांवर आता पोलिसांचा ‘वॉच’ राहणार असून त्यांच्याकडून पाचशे रुपयांचा दंड आकारण्याचा अधिकार पोलीस नाईक ते पोलीस अंमलदार यांना देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करुन कोविडचा लढा यशस्वी करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकार्यांनी केले आहे.
सध्या शहरात सर्रासपणे नागरिक कोरोना नियमांचे उल्लंघन करताना आढळून येत आहे. त्यांच्याकडून प्रशासनातील संबंधित विभागांसह पोलीस दंडात्मक कारवाई करत आहे. यापूर्वी नियमांचे उल्लंघन करणार्यांकडून आकारण्यात येणारा शंभर रुपये दंड आता पाचशे रुपये करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे आणि कारवाईपासून वाचावे.
– मुकुंद देशमुख (पोलीस निरीक्षक-शहर पोलीस ठाणे)