शतपावली करणार्‍या महिलेच्या गळ्यातील दागिने ओरबाडले! पावबाकी रोडवरील घटना; सोनसाखळी चोरीच्या घटना पुन्हा सुरु झाल्या..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
अपवाद वगळता संगमनेर बसस्थानकात प्रवाशांचा ऐवज लांबविण्याच्या घटना नियंत्रणात येत असतानाच आता गेल्या काही महिन्यांपासून जवळपास बंद असलेले ‘चेन स्नॅचिंग’चे प्रकार पुन्हा सुरु होवू लागले आहेत. असाच प्रकार रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शहरालगतच्या पावबाकी रस्त्यावर घडला आहे. या घटनेत जेवणानंतर पतीसह शतपावली करणार्‍या 65 वर्षीय महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे मणीमंगळसूत्र दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात दोघा चोरट्यांनी लांबविले. याप्रकरणी रात्री उशिराने दोघांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतून शहरातील महिलांच्या गळ्यातील दागिनेे लांबविण्याचे प्रकार पुन्हा सुरु झाल्याने महिलांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार रविवारी (ता.11) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास संगमनेरच्या भूमि अभिलेख कार्यालयाकडून पावबाकीकडे जाणार्‍या रस्त्यावर घडला. या परिसरातील दुधगंगा पतसंस्थेच्या जवळ राहणारे शशीकांत मुळे व त्यांच्या 65 वर्षीय पत्नी सविता हे दोघे रात्रीचे जेवण झाल्यानंतर रोजच्या सवयीनुसार शतपावली करण्यासाठी निघाले. घराजवळून चालत येवून ते पावबाकी रस्त्याने पुढे जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी आपली मोटारसायकल त्यांच्या अंगावर जात असल्याचे चित्र निर्माण केले.

त्यामुळे घाबरलेल्या पती-पत्नींमध्ये अंतर निर्माण झाले, त्याचा फायदा घेत चोरट्यांनी आपली दुचाकी दोघांच्या मध्ये घालून पाठीमागे बसलेल्या चोरट्याने 65 वर्षीय सविता मुळे यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे मणीमंगळसूत्र ओरबाडून घेतले. अचानकच्या या प्रसंगाने घाबरलेल्या त्या वृद्ध जोडप्याने आरडाओरडही केला. मात्र तोपर्यंत दुचाकीवरील दोघेही चोरटे सुसाट वेगाने पसार झाले. या घटनेनंतर रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास सदरील वृद्ध दाम्पत्याने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.


त्यानुसार पोलिसांनी अज्ञात दोघा चोरट्यांविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम 392 (जबरी चोरी) नुसार गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्याकडे देण्यात आला आहे. संगमनेर शहरात वाढलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमुळे गेल्या काही महिन्यांत रस्त्यावरुन पायी जाणार्‍या महिलांच्या गळ्यातील दागिने लांबविण्याच्या घटना नियंत्रणात आल्या होत्या. मात्र त्याचवेळी चोरट्यांनी संगमनेरचे बसस्थानक लक्ष्य करुन अनेक प्रवाशांचे दागिने, रोकड असा लाखोंचा ऐवज गायब केला. सातत्याने घडणार्‍या या घटनांनी वैभवशाली ठरलेल्या बसस्थानकाला चोरट्यांचे ग्रहण लागले होते.

याबाबत दैनिक नायकने सातत्याने परखड भूमिका मांडल्यानंतर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी बसस्थानकात तिघा कर्मचार्‍यांना कायम नियुक्ती दिल्याने त्याचा परिणाम अपवाद वगळता तेथील चोरीच्या घटनांना पायबंद बसला. गेल्या महिनाभरात एखादी घटना वगळता बसस्थानकातील चोर्‍या थांबल्याचे समाधान व्यक्त होत असतानाच आता चोरट्यांनी पुन्हा संगमनेरच्या रस्त्यांवर लुटमार सुरु केल्याने निर्भय होवून वावरणार्‍या महिलांमध्ये चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे. या घटनेचा लवकरात लवकर तपास करुन महिलांच्या मनात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे.


यापूर्वीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी शहरातील सोनसाखळी लांबविण्याचे प्रकार अत्यंत गांभीर्याने घेवून सीसीटीव्हीच्या आधारे वडाळा महादेव (ता.श्रीरामपूर) येथील सोनसाखळी चोरांची टोळी उघड केली होती. त्यावेळी पोलिसांनी विनोद उर्फ खंग्या या कुप्रसिद्ध गुन्हेगाराच्या तीन साथीदारांना अटकही केली होती. परंतु पोलिसांना त्यावेळीही टोळीप्रमुख ‘खंग्या’चा शोध लावता आला नव्हता. मात्र पोलिसांच्या धडक कारवाईमुळे तेव्हापासून शहरातील अशा घटना जवळपास थांबल्या होत्या. दूधगंगा पतसंस्थेजवळ घडलेल्या रविवारच्या घटनेने त्या आता पुन्हा सुरु होवू लागल्याचे दिसत असून ‘धडाकेबाज’ असे बातम्यांमधून वर्णन झालेल्या विद्यमान पोलीस उपाधिक्षकांकडून त्यावर नियंत्रण मिळवले जाण्याची संगमनेरकरांना अपेक्षा आहे.

Visits: 203 Today: 1 Total: 1423558

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *