संगमनेरनजीकच्या गुंजाळवाडी शिवारात वाहनावर दरोडा! यंत्रसामग्री भरलेला पिकअपच पळवला; शहर पोलिसांकडून तासाभरात छडा..


नायक वृत्तसंस्था, संगमनेर
चोरट्यांकडून आपले इप्सित साध्य करण्याच्या वेगवेगळ्या क्लृप्त्या घडणार्‍या घटनांमधून समोर येत असताना आता संगमनेर तालुक्यात आज पहाटे चोरीचा अजब प्रकार समोर आला आहे. या घटनेत संगमनेर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पुणे-नाशिक महामार्गावरील गुंजाळवाडी शिवारात लघुशंकेसाठी थांबलेल्या गुजरातच्या पिकअप चालकाला चौघांनी मारहाण करीत चक्क त्याच्या ताब्यातील चार लाखांच्या वाहनासह त्यात भरलेली यंत्रसामग्री, चालकाचा मोबाईल आणि रोकड असा 6 लाख 5 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल घेवून पोबारा केला होता. मात्र शहर पोलिसांनी तासाभरातच चोरुन नेलेल्या वाहनाचा शोध घेत सहा लाखांचा मुद्देमाल पुन्हा हस्तगत केला, परंतु चोरटे काही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. याप्रकरणी चालकाच्या फिर्यादीवरुन अज्ञात चौघांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहर पोलीस ठाण्याच्या हद्दितील चोरीचा हा नवीनच प्रकार आज (ता.12) पहाटे साडेबाराच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरील म्हाळुंगी नदीच्या पुलानजीक गुंजाळवाडी शिवारात घडला. गुजरातच्या बडोदा जिल्ह्यातील बागोडीया तालुक्यातील महेश रतीलाल पंचाळ (वय 60) हे आपल्या ताब्यातील महिंद्रा पिकअप (क्र.जी.जे.06/बी.टी.2892) या वाहनात दोन लाख रुपये मूल्य असलेली यंत्रसामग्री घेवून गुजरातहून बेंगलोरच्या दिशेने संगमनेरातून जात होते. त्यांचे वाहन रात्री साडेबाराच्या सुमारास गुंजाळवाडी शिवारातील म्हाळुंगी नदीच्या पुलाजवळ आल्यानंतर लघुशंकेसाठी त्यांनी आपले वाहन रस्त्याच्या बाजूला घेवून उभे केले आणि ते वाहनापासून काही अंतरावर पुढे गेले.

त्याचवेळी तोंडाला कापडं बांधून ओळख लपवलेले चार चोरटे तेथे आले व त्यांनी त्या साठवर्षीय वाहनचालकाला मारहाण करुन त्यांच्याकडील मोबाईल व अडिच हजारांची रोकड हिसकावून घेत त्यांनी रस्त्यावर उभा केलेला चार लाख रुपये किंमतीचा पिकअप आणि त्यातील दोन लाख रुपये किंमतीची यंत्रसामग्री असा एकूण 6 लाख 5 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल घेवून पुण्याच्या दिशेने पळ काढला. अचानक घडलेल्या या प्रकाराने भांबावलेल्या त्या वाहनचालकाला आपण नेमके कोठे आहोत? या गावातील पोलीस स्टेशन कोठे आहे? याबाबतच कोणतीही माहिती नसल्याने त्यांनी महामार्गावरुन जाणार्‍या अनेक वाहनांना मदतीसाठी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते अपयशी ठरले.

घटनेनंतर पंधरा/वीस मिनिटांनी नाशिककडून येणार्‍या लेनवरुन आलेल्या एका दुचाकीस्वाराने मात्र माणुसकी दाखवत आपले वाहन उभे केले व त्या इसमाची विचारपूस केली असता घडला प्रकार समोर आला. त्याने मदतीच्या हेतूने त्या वाहनचालकाला आपल्या दुचाकीवर बसवून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आणून सोडले व तो दुचाकीस्वार निघून गेला. यावेळी रात्रपाळीला असलेले सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी आपल्या कपाळाला हात लावत ‘अरे देवा’ असे म्हणतं लागलीच त्या वाहनचालकाला सरकारी वाहनात बसवून घटनास्थळापासून पुण्याच्या दिशेने चोरीला गेलेल्या वाहनाचा शोध सुरु केला.

या दरम्यान घटनास्थळापासून साधारणतः दीड किलोमीटर अंतरावर वैदूवाडीजवळ पुण्याकडून येणार्‍या लेनवर रस्त्याच्या कडेला चोरीला गेलेल्या पिकअपसारखेच वाहन उभे असल्याचे पोलिसांना दिसले. त्यांनी सोबत असलेल्या पिकअपच्या चालकास खात्री करण्यास सांगितले असता सदरचे वाहन आपलेच असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. यावेळी वाहनातील मुद्देमाल तपासला असता तो देखील तसाच असल्याचेही आढळून आले, त्यावेळी रात्रीचे दीड वाजले होते. यानंतर पोलिसांनी वाहनचालकाची फिर्याद दाखल करुन घेत चौघा अज्ञात चोरट्यांविरोधात भा.दं.वि. कलम 394 नुसार जबरी चोरीचा गुन्हा दाखल करुन या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्याकडे सोपविला आहे. संगमनेरात यापूर्वीच अभावाने घडलेल्या या अजब घटनेने एकच खळबळ उडाली आहे.


नगरकडील कोंचीचा घाट वगळता संगमनेरात रस्तालुटीचे प्रकार घडत नसल्याचे गेल्या अनेक वर्षांपासून दिसत असताना आज पहाटे गुंजाळवाडी शिवारातून चक्क चालकाला मारहाण करुन मालासह वाहन पळविण्याचा अजब प्रकार घडला. त्यामुळे वाहनचालकांमध्येही आता भीती दाटू लागली आहे. पोलिसांनी हा प्रकार गांभीर्याने घेवून भयमुक्त असलेल्या संगमनेर तालुक्यातील रस्त्यांवर दाटू लागलेले भयाचे मळभ दूर करण्याची गरज आहे.

Visits: 105 Today: 2 Total: 1103612

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *