शिरुरच्या साईभक्ताकडून भाविकांना आमरसाची मेजवानी साईनगरीत होतेय चर्चा; पाच वर्षांपासून देणगी स्वरुपात देताहेत आंबे


नायक वृत्तसेवा, शिर्डी
‘सबका मालिक एक’ आणि ‘श्रद्धा सबुरी’चा संदेश देणार्‍या साईबाबांच्या झोळीमध्ये देश-विदेशातील साईभक्त विविध स्वरूपाचे दान देत असतात. आर्थिक स्वरूपाच्या दानाबरोबरच अन्नदान देखील तितकंच महत्त्वाचं मानलं जातं. शिरुर येथील साईभक्त शेतकरी रवी नारायण करगळ यांनी साधारण 2 लाख 2 हजार किंमतीचे 2527 किलो केशर आंबे श्री साईबाबा संस्थान विश्स्त व्यवस्था शिर्डीच्या प्रसादालयात देणगी स्वरुपात दिले असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली.

साईभक्ताच्या या दानातून श्री साईबाबा संस्थानने भाविकांसाठी प्रसादालयात आमरसाची मेजवानी ठेवण्यात आली. या मेजवानीची चर्चा सार्‍या शिर्डीत ऐकायला मिळत आहे. देणगी स्वरुपात प्राप्त झालेले केसर आंबे रासायनिक प्रक्रिया न करता, नैसर्गिकरित्या पिकविलेले व उच्च प्रतीचे आहेत. आजपासून संस्थानच्या साई प्रसादालयात संस्थान कर्मचार्‍यांच्या श्रमपरिहारासाठी व साईभक्तांच्या प्रसाद भोजनासाठी या आंब्यांच्या रसाचा समावेश करण्यात आला असल्याचे सांगून सर्वांनी या प्रसाद भोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे.

दरम्यान, हा साईभक्त चार ते पाच वर्षांपासून सेंद्रीय पद्धतीने पिकविलेले आंबे देणगी स्वरुपात संस्थान प्रसादालयासाठी देत आहे. मागील वर्षीही रवी करगळ यांनी सुमारे 4 लाख 25 हजार रुपये किंमतीचे 5000 किलो केशर आंबे देणगी स्वरूपात दिले होते. त्याचा एक लाखांहून अधिक साईभक्तांनी लाभ घेतला होता.

Visits: 184 Today: 1 Total: 2057959

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *