महामार्गावर तृतीयपंथीयांचे ‘दान’ मागणे बेतले स्वतःच्याच जीवावर! पुणे-नाशिक महामार्गावरील अपघातात एक तृतीयपंथीय ठार, तर दोन प्रवासी जखमी


नायक वृत्तसंस्था, संगमनेर
महामार्गाच्या उभारणीत राहिलेल्या त्रुटी वारंवार मागणी करुनही अपूर्ण राहील्याने पुणे-नाशिक हा नूतनीकरण झालेला महामार्ग विविध अपघातांमूळे नेहमीच चर्चेत राहतो. आजही या महामार्गावर दुपारी बाराच्या सुमारास घडलेल्या विचित्र अपघातात एका तृतीयपंथीयाला आपला जीव गमवावा लागला, तर या गडबडीत घडलेल्या चार वाहनांच्या विचित्र अपघातात अन्य दोघे जखमी झाले आहेत. या अपघातानंतर नाशिककडे जाणारा रस्ता काहीकाळ बंद झाला होता. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर विचित्र अपघाताची घटना घडली. संगमनेर शहरातून जाणारा जुना महामार्ग आणि नवीन महामार्गाला हॉटेल स्टेटसजवळ जोडणार्‍या रस्त्यावर नाशिककडे जाणार्‍या बाजूला आज सकाळी तिघे तृतीयपंथीय वाहने थांबवून दान मागत होते. या दरम्यान याचवेळी पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणार्‍या स्वीफ्ट कारच्या (क्र.एम.एच.12/इ.एक्स.2728) चालकाने महामार्गावरुन सुरू असलेल्या रहदारीकडे दुर्लक्ष करीत त्यांना दान देण्यासाठी आपले वाहल उभे केले.

अचानक समोरचे वाहन उभे राहिल्याने त्यापाठीमागून आलेल्या दुसर्‍या कारने (क्र.एम.एच.14/एच.क्यू.1728) त्याला पाठीमागून जोराची धडक दिली. त्याचवेळी त्यापाठीमागे असणार्‍या तिसर्‍या वाहनाच्या (क्र.एम.एच.11/बी.डी.6093) चालकाचाही गोंधळ उडाल्याने त्यानेही अपघातग्रस्त दुसर्‍या वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात तीनही वाहनांचे अवशेष रस्त्यावर विखुरले तर दान मागणार्‍या तिघा तृतीय पंथीयातील साई अंकिता साथी या तृतीयपंथीयाचा जागीच मृत्यू झाला, तर शैलेश श्रीराम बिर्ला (वय 52) व त्यांची पत्नी सोनल (वय 46, रा. हडपसर, पुणे) हे कारमधील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले आहे.

हा सर्व प्रकार घडल्यानंतर मोठ्या प्रमाणात धुराडा उडाल्याने पुण्याहून भरधाव वेगाने नाशिककडे निघालेल्या आशयर टेम्पोच्या (क्र.एम.एच.15/इ.एफ,2999) गोंधळ उडाला. जेव्हा त्याला समोर तीन वाहने अपघातग्रस्त होवून विखुरलेली दिसली, तेव्हा त्याने गडबडीने आपले वाहन नियंत्रित करण्याचा प्रयत्न केल्याने या अपघाताचे गांभिर्य कमी झाले व सदरचा टेम्पो रस्त्याच्या मधोमध असलेल्या रस्ता दुभाजकावर चढला. मात्र टेम्पोच्या चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.

अपघातानंतर आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात रवाना केले. मात्र उपचारापूर्वीच जखमींपैकी एका तृतीयपंथीयाचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी जाहीर केले, तर उर्वरीत दोघा प्रवाशांवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक अभय परमार तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतुकीसाठी रस्ता खुला केला.

सदरचा महामार्ग निर्माण करतांना असंख्य त्रुटी ठेवण्यात आल्या आहेत. याबाबत संबंधित ठेकेदार कंपनीकडे वारंवार तक्रारीही केल्या मात्र त्यांना आजवर मानवी जीवाचे मूल्य समजलेले नाही. येथील ग्रामस्थानी संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांसह पोलीस निरीक्षकांनाही येथील चुकीच्या ‘पॉईंट’बाबत वारंवार सांगितले आहे, मात्र गेंड्याची कातडी पांघरलेल्या यंत्रणेकडून कोणतीही कारवाई न झाल्याने निष्पापांचे बळी जाण्याची श्रृंखला आजही कायम आहे. या अपघाताची गंभीर दखल न घेतल्यास या नंतर अपघातात जीव जाणार्‍या व्यक्तीचा अंत्यविधी महामार्गावरच केला जाईल.
– श्याम नाईकवाडी
स्थानिक नागरिक

Visits: 177 Today: 2 Total: 1112000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *