तालुक्याच्या रूग्ण संख्येत पुन्हा पडली 43 रुग्णांची भर!

दिवसभरात 62 रुग्ण समोर आल्याने स्थापित झाला नवा विक्रम!!
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्याच्या कोविड इतिहासात आजचा दिवस बाधितांना विक्रम नोंदवणारा ठरला आहे. आज तालुक्याच्या रूग्ण संख्येत 62 रुग्णांची वाढ झाली आहे. आज सकाळी शासकीय प्रयोगशाळेच्या अहवालातूनही एकोणावीस रुग्ण समोर आले होते, तर आत्ता रॅपिड चाचणीतून 43 रुग्ण समोर आले असून तालुक्याची रुग्णसंख्या पंधराव्या शतकाच्या दारात पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासात तालुक्याच्या रूग्ण संख्येत तब्बल 98 रुग्णांची भर पडल्याने बाधितांची संख्या 1 हजार 493 वर पोहोचली आहे.

मंगळवारी रात्री उशीराने खासगी प्रयोगशाळा आणि रॅपीड अँटीजेन चाचणीतून संगमनेर शहरातील सात जणांसह तालुक्यातील 36 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे मंगळवारी रात्रीच तालुक्यातील बाधितांनी चौदावे शतक ओलांडून 1 हजार 431 रुग्णसंख्या गाठली होती. आज दिवस उजेडताच शासकीय प्रयोगशाळेचाही अहवाल येवून धडकला आणि संगमनेरकरांना तब्बल 19 रुग्णांचा धक्का देवून गेला.

आज सकाळी शासकीय प्रयोगशाळेच्या अहवालातून शहरातील माळीवाडा व खंडोबागल्ली परिसरात कोविडने पुन्हा घुसखोरी करीत तेथील 70 व 65 वर्षीय नागरिकांना बाधित केले. नंदनवन वसाहतीतही पहिल्यांदाच प्रवेश करणार्या कोविडने तेथील 65 वर्षीय महिला संक्रमित झाली, साळीवाडा परिसरातून 49 वर्षीय इसमासह 30 वर्षीय महिला, कुरणरोड परिसरातून 67 वर्षीय इसम, घासबाजारातून 36 वर्षीय महिलेसह 10 व पाच वर्षीय बालिका, शहरालगतच्या गुंजाळवाडी शिवारातील गोल्डनसिटी भागातील 21 वर्षीय तरुण तर रहाणेमळा येथील 29 वर्षीय तरुण, चंदनापूरी येथील 41 वर्षीय तरुण, चिकणी येथील 28 वर्षीय तरुण, मेंढवण येथील 65 वर्षीय इसम, घुलेवाडी येथील 50 वर्षीय इसम, पानोडी येथील 55 वर्षीय महिला, तर पठारभागातील घारगावमधून 55 वर्षीय इसम, जवळे बाळेश्वर येथील 29 वर्षीय तरुण व साकूरमधील 65 वर्षीय महिलेलाही संक्रमण झाले होते.

आज सकाळीच तालुक्याची रुग्णसंख्या एकोणावीसने वधारल्याने आजचा दिवस गौराईच्या मुक्कामात आनंदात जाईल असा समज करून संगमनेरकर हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात व्यस्त असतानाच रात्र होता होता कोविडच्या विषाणूंनी तालुक्यातील नागरिकांना पुन्हा धक्का दिला आहे. आज करण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन चाचणीतून संगमनेर तालुक्यातील तब्बल 43 रुग्ण समोर आले आहेत.

या अहवालातून संगमनेर शहरातील 11 तर तालुक्यातील बत्तीस संशयित रुग्णांची चाचणी पॉझिटिव आली आहे. त्यात जनतानगर परिसरातील 48, 26 व 19 वर्षीय महिला, खंडोबागल्लीतील 58 वर्षीय महिलेसह 36 वर्षीय तरुण, साळीवाडा परिसरातून 78 वर्षीय इसम, चैतन्यनगर येथील 65 वर्षीय महिला, माळीवाडा परिसरातील साठ, 55 व 26 वर्षीय महिला तर उपासनी गल्लीतील 75 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

त्यासोबतच आज तालुक्यातील 32 जणांचे अहवालही पॉझिटिव आले आहेत. त्यातून गुंजाळवाडी येथील 52 वर्षीय इसमासह 43 वर्षीय महिला, 16 वर्षीय तरुणी व आठ वर्षीय बालक, कुरकुटवाडी येथील 46 वर्षीय महिला, चंदनापुरी येथील 49 व 37 वर्षीय पुरुषांसह 34 व 33 वर्षीय महिला व दोन वर्षीय बालिका, वडगाव पान येथील 27 वर्षीय महिला व 21 वर्षीय तरुण, मेंढवण येथील 34 वर्षीय तरुण व तीस वर्षीय महिला, गोरक्षवाडीतील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 28 वर्षीय तरुण, 34 वर्षीय महिला व 9 वर्षीय बालिका, रहिमपूर येथील 65 वर्षीय महिला व 11 वर्षीय बालिका, चिकणी येथील 53 वर्षीय पुरुषांसह 48 वर्षीय महिला, राजापूरमधील अवघ्या 21 दिवसांची बालिका, संगमनेर खुर्द मधील 32 वर्षीय तरुण, निमगाव टेंभी येथील 26 वर्षीय तरुणांसह दोन वर्षीय बालिका व दोन वर्षीय लहान मुलं, पानोडी येथील 65 वर्षीय पुरुषांसह 20 वर्षीय तरुण, घुलेवाडीतील 57 व 50 वर्षीय महिलांसह 40 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव आला आहे.

आज दिवसभरात सकाळी एकोणावीस व आत्ता 43 अशा एकूण 62 रुग्णांची भर पडल्याने संगमनेर तालुक्यातील बाधितांची संख्या पंधराव्या शतकाच्या दारात अर्थात 1 हजार 493 वर जाऊन पोहोचली आहे. संगमनेर तालुक्याच्या कोविड इतिहासात एकाच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडण्याचा आजचा नवा विक्रमही नोंदविला गेला आहे.

