महिलेकडूनच शिक्षिकेची आर्थिक फसवणूक! संगमनेरातील प्रकार; शहर पोलिसांकडून गुन्हा दाखल


नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील अँग्लो उर्दू शाळेत कार्यरत असलेल्या एका महिला उपशिक्षिकेला नोकरीत कायम करण्याची ऑर्डर मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची तब्बल 5 लाख 80 हजार रुपयांना फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या ‘त्या’ शिक्षिकेच्या तक्रारीवरुन संगमनेर शहर पोलिसांनी अमिना सलीम शेख या महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात आरोपी असलेल्या महिलेने सदरील तक्रार दाखल होण्यापूर्वी गुरुवारी शहरातील एका कथित पत्रकाराने आपल्याकडून सहा लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केल्याने शौकत पठाण नावाच्या इसमावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. आता त्याच महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आल्याने संगमनेरात खळबळ उडाली आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार गेल्या वर्षभराच्या कालावधीत घडल्याचे समोर आले आहे. जोर्वे रस्त्यावरील फादरवाडी परिसरात राहणार्‍या शाहिस्ता मुजीबूर रहेमान शेख या शहरातील अँग्लो उर्दू शाळेत गेल्या दहा वर्षांपासून उपशिक्षिका म्हणून सेवेत आहेत. सन 2019 मध्ये त्यांच्या शाळेतील अनुदानित शिक्षकाचे एक पद रिक्त झाले होते. त्या पदावर आपली नियुक्ती व्हावी यासाठी संबंधित शिक्षिकेने सन 2021 मध्ये शाळेत अर्ज दाखल केला. त्यानुसार शाळा व्यवस्थापनाने कागदपत्रांसह जिल्हा परिषदेकडे त्यांच्या नावाची शिफारस केली. सदरील गोष्ट अमिना सलीम शेख (रा.मूळ कुरण, ह.मु.मालदाड रोड) या महिलेला समजल्यानंतर तिने सदरील शिक्षिकेचा मोठा भाऊ इम्रान यांच्याशी संपर्क साधला.

त्यावेळी दोघांमध्ये झालेल्या संभाषणात सदरील महिलेने तुमच्या बहिणीची फाईल शाळेमार्फत जिल्हा परिषदेला पाठविल्यास आपण त्यांचे काम करुन देवू असे सांगत सदरील शिक्षिकेला शहरातील एका हॉटेलमध्ये भेटण्यास पाठविण्यास सांगितले. त्यानुसार इम्रान शेख यांनी आपल्या शिक्षक असलेल्या बहिणीसह त्या हॉटेलमध्ये जावून अमिना शेख यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेतून त्या महिलेने अनुदानित पदावरील नियुक्तीचे पत्र लवकरात लवकर मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याने त्या बहीण-भावाचा तिच्यावर विश्वास बसला. त्यानंतर 1 फेब्रुवारी 2021 रोजी सदरील महिलेने त्या शिक्षिकेला फोन करुन काम सुरु करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. तत्पूर्वीच तिने त्या शिक्षिकेचा विश्वास संपादन केलेला असल्याने त्यांनीही लागलीच गुगल पेवरुन ऑनलाईन पद्धतीने एक लाख रुपये त्या महिलेच्या खात्यावर पाठविले.

त्यानंतरही वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगत 17 मार्च 2022 पर्यंत त्या महिलेने सदरील शिक्षिकेकडून वेगवेगळी कारणं सांगत 5 लाख 80 हजार रुपयांची रक्कम उकळली. मात्र त्यानंतरही अनुदानित पदावरील नियुक्तीबाबतच्या ऑर्डरबाबत विचारणा केली असता त्या महिलेकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. तसेच, संपूर्ण प्रशासन आपल्या पर्समध्ये असून आपले कोणीही वाकडे करु शकत नाही असे सांगत त्या महिलेकडून फसवणूक झालेल्या शिक्षिकेचा वारंवार उपमर्दही केला गेला. त्यातून आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर त्या शिक्षिकेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अमिना सलीम शेख (रा.मूळ कुरण, हल्ली मालदाड रोड) या महिलेविरोधात भा.दं.वि. कलम 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या वृत्ताने शहरात एकच खळबळ उडाली आहे.


विशेष म्हणजे सदरील गुन्हा दाखल झाल्यानंतरच्या दुसर्‍या दिवशी या प्रकरणातील आरोपी महिलेने शहरातील एका कथित पत्रकारावर खंडणी मागितल्याचा आरोप करुन त्याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार ह्युमन राईट्स कमिशनचा पदाधिकारी आणि पुरोगामी पत्रकार संघाचा पत्रकार असल्याचे सांगत शौकत पठाण या इसमाने आपल्या विरोधात असंख्य तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्यात व्हिडिओ, संभाषणाच्या क्लिप्स व अश्लील फोटो असल्याचे सांगत आपल्याकडून सहा लाखांची खंडणी मागितल्याचे म्हंटले होते. याबाबत आपल्यावर खोटा गुन्हा दाखल होणार असल्याचे ‘त्या’ कथित पत्रकाराने गेल्या महिन्यातच पोलिसांना दिलेल्या निवेदनात सांगितले होते.

Visits: 112 Today: 1 Total: 1425561

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *