महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला युवा नेतृत्वाचा तिटकारा? निष्ठावानांवरच अन्याय; अंतर्गत गटबाजीचेही लागले ग्रहण..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोणताही व्यावसायिक असो अथवा राजकारणी त्यांच्याकडून आपल्या मुलांनाच पुढे आणण्याची पद्धत सर्वत्र रुढ आहे. त्याच पद्धतीने योग्यवेळी संधी मिळावी या भावनेतून डॉ. सुधीर तांबे यांनी ऐनवेळी आपले सुपुत्र सत्यजित तांबे यांना नाशिक पदवीधर मतदारसंघातील आपल्या जागेवर पुढे केले. मात्र त्यांची ही कृती शिस्तभंग असल्याचे सांगत पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्यातून पक्षाने आपल्यावर अन्याय केल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली असून पक्षाचे नुकसान होईल अशी कोणतीही कृती न करताही झालेली कारवाई एकतर्फी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. या सर्व घटनाक्रमात संघटन कौशल्य असलेल्या तरुण नेतृत्वालाच मागे खेचण्याचा प्रकारही समोर आला असून पक्षातंर्गत गटबाजीही उफाळल्याचे दिसत आहे. एकीकडे राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेतून युवकांमध्ये ऊर्जा फुंकण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले जात आहे, तर दुसरीकडे सत्यजीत तांबेंसारख्या दोन दशके पक्षकार्य करणार्‍या तरुणाची मात्र प्रतारणा करण्याचे पद्धतशीर षडयंत्र राबविले जात आहे.

वास्तविक पाहता डॉ. सुधीर तांबे यांनी 2005 पासूनच नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे विचार रुजविण्यास सुरुवात केली. त्यांचे हे प्रयत्न सुरु होते त्यावेळी हा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. प्रतापदादा सोनवणे हे त्यावेळी या मतदारसंघाचे नेतृत्त्व करीत होते. मात्र 2009 साली धुळे लोकसभा मतदारसंघातून लोकसभा लढवण्यासाठी त्यांनी राजीनामा दिला आणि अवघ्या 11 महिन्यांसाठी या मतदारसंघात निवडणूक लागली. त्यावेळी वारंवार मागणी करुनही काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन त्यावेळी विजय संपादन करीत आपण या मतदारसंघात जमीनस्तरावर केलेल्या कामाची झलक दाखविली. तेव्हापासून या मतदार संघाचे तेच नेतृत्त्व करीत आहेत.

गेल्या तेरा वर्षांच्या कालावधीत डॉ. तांबे व त्यांच्या यंत्रणेने नाशिक पदवीधर मतदारसंघातील पदवीधर मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांना काँग्रेसच्या विचारधारेशी जोडून ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. पाच जिल्हे आणि 56 तालुक्यांचा आवाका असलेल्या या मतदारसंघातील एकूण 2 लाख 56 हजार मतदारांत तब्बल दीड लाखांहून अधिक मतदारांची नोंदणी एकट्या तांबे यांच्या यंत्रणेकडून झाली आहे. तर डॉ. राजेंद्र विखे यांनी सुमारे 40 हजार व भाजपाच्या पक्षीय यंत्रणेमार्फत जवळपास 30 हजार मतदारांशिवाय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील यांनी अवघ्या 10 हजार पदवीधरांना या मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेशी जोडले आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत उमेदवारांवर पक्षाचा शिक्का दिसत असला तरीही ही निवडणूक पक्षीय चिन्हांवर मात्र लढवली जात नाही. त्यामुळे पाच वर्ष जमिनीवर काम करणार्‍या, पदवीधरांशी संपर्क साधून, त्यांच्याशी संवाद साधून त्यांना निवडणूक प्रक्रियेशी जोडणार्‍या उमेदवारांचा विजय निश्चित मानला जातो. 2009 साली अपक्ष उमेदवारी करणार्‍या डॉ. सुधीर तांबे यांच्या समोर काँग्रेस आणि भाजपाचे अधिकृत उमेदवार असतानाही त्यांनी सहज मिळवलेला विजय हेच सांगणारा आहे. त्यामुळे डॉ. तांबे आणि त्यांच्या यंत्रणेकडून या निवडणुकीसाठी नोंदवली गेलेली जवळपास 60 टक्के मतदार संख्या त्यांचे सुपुत्र सत्यजीत तांबे यांचा विजय करणारी ठरेल असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

डॉ. तांबे यांच्या प्रचंड कामामुळे काँग्रेससाठी सहज असलेल्या या मतदारसंघात त्यांच्याऐवजी त्यांच्या मुलासाठी करण्यात आलेली उमेदवारीची मागणी गैर नव्हती. या निवडणुकीच्या माध्यमातून नेतृत्वगुण असलेल्या एका तरुणाला संधी मिळतेय म्हटल्यावर पक्षानेही डॉ. तांबे यांच्या मागणीचा सन्मान करणे आवश्यक होते. त्यातून एकाप्रकारे संसदीय जबाबदारीतून मुक्त झालेल्या डॉ. तांबे यांच्या नेतृत्त्वगुणांचा पक्षीय वाढीसाठी संघटनात्मक पातळीवर फायदाही करुन घेता आला असता. मात्र राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतून कोणताही बोध न घेता राज्यातील काँग्रेसच्या काही नेत्यांनी कुरघोड्या करण्याच्या नादात त्यांच्या या भूमिकेलाच विरोध करीत भाजपच्या घशातून ओढून आणीत डॉ.तांबे यांनी काँग्रेसच्या पदरात पाडलेल्या या मतदारसंघात मात्र गटबाजीचे प्रदर्शन घडवले.

ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे बोट धरुन राजकारणात आलेल्या सत्यजीत तांबे यांनी 2000 साली युवक काँग्रेसच्या सचिवपदापासून कामाला सुरुवात केली. गेल्या 23 वर्षांच्या आपल्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी जिल्हा परिषदेच्या सदस्यपदासह प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्षपदही भूषविले. ज्यावेळी काँग्रेसमध्ये भवितव्य नाही असे मानून मोठ्या प्रमाणात तरुणांचे पक्षातून पलायन सुरु होते, त्यावेळी त्यांनी राज्यभर झंझावती दौरे करीत अडगळीत जावू पाहणार्‍या संघटनेत नवा जोश भरला. वेगवेगळ्या आंदोलनातून संघटनेत पुन्हा प्राण फुंकले आणि प्रदेश युवक काँग्रेसला गतवैभव प्राप्त करुन दिले. मात्र नाशिक पदवीधरची उमेदवारी निश्चित करतांना मात्र स्वपक्षानेच त्यांची प्रतारणा केली.


त्यांना झालेला विरोध काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचेच लक्षण असल्याचे लपून राहिलेले नाही. त्यांच्या या भूमिकेचा आधार घेवून बाळासाहेब थोरात यांच्या परिश्रमातून सत्तेची फळे चाखणार्‍या काही नेत्यांनी थेट त्यांच्या पक्षनिष्ठेवरच शंका उपस्थित करणे थोरात यांना मानणार्‍यांच्या कधीही पचनी पडणार नाही. त्यामुळे अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतरही आपण महाविकास आघाडीचेच घटक आहोत, मात्र ही निवडणूक ‘बिनविरोध’ करण्यासाठी आपण भाजपासह अन्य सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना भेटू या वक्तव्याचा गैर राजकीय अर्थ काढून तांबे कुटुंबाने काँग्रेसशी बंडखोरी केली असा आरोप नाशिक पदवीधर मतदारसंघातील मतदार मान्य करणार नाहीत असा विश्वास तांबे यांना वाटतो.

Visits: 271 Today: 2 Total: 1422804

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *