राहुरी कृषी विद्यापीठाचा कास्ट प्रकल्प देशात पहिला फळबागांच्या फवारणीसाठी विकसित केलेल्या रोबोटचाही गौरव

नायक वृत्तसेवा, राहुरी
जागतिक बँक अर्थसहाय्यित भारतीय कृषी अनुसंधान परिषद, राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प नवी दिल्ली अंतर्गत राहुरी येथे असलेल्या हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान व तंत्रज्ञानाची (कास्ट) वार्षिक आढावा बैठक नवी दिल्ली येथे पार पडली. या बैठकीत महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कास्ट प्रकल्पाने देशात पहिल्या क्रमांकावर स्थान मिळविले.

14 राज्यांमध्ये असे प्रकल्प राबविले जात आहेत. या प्रकल्पातंर्गत कोविड परिस्थितीत पाच आंतरराष्ट्रीय कार्यशाळा, 46 राष्ट्रीय प्रशिक्षणे, 27 राष्ट्रीय कार्यशाळा, 19 वेबिनार्स, 73 तज्ज्ञ व्याख्याने, 14 प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये 25 हजार 536 शिक्षक व शास्त्रज्ञ आणि 29 हजार 435 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. हवामान, अद्ययावत शेती आणि डिजिटल तंत्रज्ञान या विषयांवरील व्याख्याने व प्रशिक्षणाचा 6168 शेतकर्‍यांना लाभ झाला आहे. या कास्ट प्रकल्पातंर्गत शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञान आणि रोबोटचा वापर यावर मोठे काम केले आहे.

फळबागांच्या फवारणीसाठी विकसित केलेल्या रोबोटला आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरविण्यात आले आहे. विद्यापीठाच्या या धडाकेबाज कार्यामुळेच विद्यापीठातील हा संशोधन प्रकल्प देश पातळीवर आघाडीवर ठरला. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली कास्ट प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. सुनील गोरंटीवार, प्रकल्पाचे सहसमन्वयक डॉ. मुकुंद शिंदे व या प्रकल्पाचे 20 टिम मेंबर व 20 संशोधन सहयोगी यांच्या अतुलनीय कार्यामुळेच हा सन्मान राहुरी कृषी विद्यापीठास मिळाला. विद्यापीठाचा कास्ट प्रकल्प देशात प्रथम आल्याने विद्यापीठाच्या सर्व स्तरातून प्रकल्पाचे अभिनंदन होत आहे.

या विद्यापीठाचा कास्ट प्रकल्प हा शिक्षण, संशोधन, विस्तार, वित्त व्यवस्थापनात सरस ठरुन देशात प्रथम क्रमांक मिळविला. विद्यापीठ कोविडच्या काळामध्ये याच प्रकल्पामुळेच ऑनलाईन सत्र घेण्यात आले आहे. या प्रकल्पाद्वारे फळबागांच्या फवारणीसाठी रोबोट विकसित केलेला आहे. ड्रोन तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर, डिजिटल शेती आणि स्मार्ट व्हिलेज ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात येत आहे.
– डॉ. प्रशांतकुमार पाटील (कुलगुरु)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *