राहुरीतील चक्री उपोषणास शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. अजित काळेंनी दिली उपोषणाला भेट


नायक वृत्तसेवा, राहुरी
डॉ. तनपुरे साखर कारखान्याचे खासगीकरण होऊ नये किंवा भाडेतत्त्वावर हा कारखाना कोणाला चालवायला देऊ नये, अशी भूमिका शेतकरी संघटनेची आहे. म्हणून या आंदोलनाला शेतकरी संघटनेने देखील जाहीर पाठिंबा दर्शविला असल्याचे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. अजित काळे यांनी केले.

डॉ. तनपुरे कारखान्यातील कोट्यवधींच्या गैरव्यवहाराच्या चौकशीच्या मागणीसाठी बुधवारपासून कारखाना बचाव कृती समितीचे राहुरी तहसील कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरू आहे. या उपोषणाला शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. अजित काळे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.

यावेळी बोलताना अ‍ॅड. काळे म्हणाले, कारखान्यावर काम करणार्‍या सहकार क्षेत्रातील मंडळींची भूमिका संशयास्पद वाटते. कारखाना टिकला पाहिजे व सहकार टिकला पाहिजे ही आमची भूमिका आहे. परंतु, हे होत असताना कारखानदारीत काही प्रश्न निर्माण झाले तर ते विचारण्याचा अधिकार आम्हाला आहे. यासाठी भांडणार्‍या मंडळींच्या पाठिशी उभे राहण्याचे आमचे कर्तव्य आहे. या कारखान्याकडे सहकार आयुक्तांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे डॉ. तनपुरे कारखान्याची वाताहात झाली आहे. यावेळी कृती समितीचे संयोजक अमृत धुमाळ म्हणाले, राहुरी येथील डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, म्हणून गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या कृती समितीच्या उपोषणाकडे प्रशासनाने सपशेल दुर्लक्ष केल्याने आता आंदोलनाची तीव्रता आणखी वाढणार असून याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहील. तसेच जर या चक्री उपोषणाची प्रशासनाने दखल घेतली नाही तर डॉ. तनपुरे कारखाना बचाव कृती समिती 21 जानेवारी रोजी पुणे येथील साखर आयुक्त आणि अहमदनगर जिल्हा बँकेला टाळे ठोकण्याचा इशारा कृती समितीचे अमृत धुमाळ यांनी दिला आहे.

याप्रसंगी अरुण कडू, राजूभाऊ शेटे, रवींद्र मोरे, एकनाथ घोगरे, दिलीप इंगळे, दादासाहेब पवार, पंढरीनाथ पवार, संजय पोटे, अ‍ॅड. भाऊसाहेब पवार, संदीप आढाव, गणेश खिलारी, अनिल औताडे, यूवराज जगताप, बाळासाहेब जठार, त्रिंबक भगदाडे, सुदाम औताडे, साहेबराव चोरमले, शरद आसने, बाबासाहेब उघडे, रवींद्र आढाव, अविनाश पेरणे, सचिन भिंगारदे, नारायण टेकाळे, सुनील निमसे आदिंसह उपोषणकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Visits: 119 Today: 1 Total: 1109939

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *