शिवजयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
येथील सूर्यतेज संस्थेच्यावतीने कोपरगाव फेस्टिव्हल, स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा अभियान अंतर्गत समर्थ टाइम्स, शिरोडे अँड सन्स यांचे सहकार्यातून शिवजयंती उत्सवानिमित्त चित्रकला स्पर्धा आयोजित केल्याची माहिती संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी दिली आहे. छत्रपतींचे विचार चित्ररूपाने भावी पिढीला समजावे. या हेतूने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी जागर शिव विचारांचा, उत्सव रयतेच्या राजांचा हे विशेष अभियानही राबविण्यात येत आहे.

या स्पर्धेकरिता शालेय स्तरावर गट तयार करण्यात आले असून गट ‘अ’मध्ये (इ.5 ते 6 वी.), गट ‘ब’मध्ये (इ.7 ते 8 वी.), गट ‘क’मध्ये (इ.9 ते 10 वी.) आणि खुला गट ‘ड’ याप्रमाणे गट तयार करण्यात आले असून प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ बक्षिसे काढण्यात येणार आहे. विजेत्यास सन्मानपदक/चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेचे विषय गट अकरिता छापील चित्र देण्यात येणार आहे. गट बकरिता महाराष्ट्रातील गड किल्ले, वृक्षारोपण आणि संवर्धन, पृथ्वी वाचवा-जीवन वाचवा, प्रदूषण मुक्त वसुंधरा, शिवकालीन लोककला असे विषय देण्यात आले आहे. गट ककरिता जपा ऐतिहासिक स्थळे/संवर्धन करा, मर्दानी खेळ काळाची गरज (लाठी-काठी/तलवारबाजी…), छत्रपती शिवाजी महाराज एक प्रेरणा, स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा अभियान, खुला गट डकरिता छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग, माझी वसुंधरा अभियान याप्रमाणे विषय ठेवण्यात आले आहे. तरी चित्रकलेची आवड असणार्या स्पर्धकांनी मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
