खळीतील आरोग्य उपकेंद्र कोविड संकटकाळातही बंदच! ग्रामस्थांची उपकेंद्रासह कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील खळी येथे माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे-पाटील व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे-पाटील यांच्या पाठपुराव्यातून तसेच अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अंदाजे 60 लाख रुपये खर्च करून सुसज्ज प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधण्यात आले आहे. मागील दोन वर्षांपूर्वी या उपकेंद्राचे उद्घाटन होऊनही हे उपकेंद्र नागरिकांच्या सेवेसाठी सुरू झालेले नसल्याने हे उपकेंद्र कोविडच्या संकटकाळात सुरू करावे, अशी मागणी खळी ग्रामस्थांनी केली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कर्मचार्‍यांअभावी खळी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बंद असल्याची उत्तरे प्रशासनाकडून दिली जात असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सामाजिक कार्यकर्ते किशोर वाघमारे, सोमनाथ नागरे, प्रा.बाळासाहेब वाघमारे आदिंनी ग्रामसभेमध्ये अनेकदा उपकेंद्र सुरू करण्याची मागणी केली. परंतु प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कोविडचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले असून गावात अनेक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. तसेच गावात अनेकांचा कोरोनाची बाधा झाल्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे खळी येथील आरोग्य उपकेंद्र सुरू असते तर नागरिकांना तत्काळ प्राथमिक उपचार घेता आले असते. यामुळे ‘खळी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असून अडचण नसून खोळंबा’ अशी म्हणण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने खळी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तत्काळ सुरू करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किशोर वाघमारे, बाळासाहेब वाघमारे, सोमनाथ नागरे आदी नागरिकांनी करून येथेच 20 ते 25 खाटांचे कोविड सेंटर सुरू करावे, अशीही मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.


खळी येथे दोन वर्षांपूर्वी सुसज्ज अशी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत उभी राहिली असून आरोग्य विभागाकडे कर्मचारी नसल्याने खळी आरोग्य उपकेंद्रात कर्मचारी उपलब्ध होत नाहीत. कोविड संकटकाळात हे आरोग्य उपकेंद्र सुरू होण्यासाठी ग्रामपंचायतीने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांना निवेदन दिले आहे. ग्रामपंचायतीकडूनही पाठपुरावा सुरू आहे.
– राजेंद्र चकोर (सरपंच, खळी)

Visits: 19 Today: 1 Total: 205405

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *