मूकबधिर विद्यालयातील ‘त्या’ अल्पवयीन मुलीच्या जखमा संसर्गातूनच? ससून रुग्णालयाचा अहवाल; प्रकरणाच्या तपासाचे कारणे देत पोलिसांकडून मात्र चुप्पी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील एका मूकबधिर विद्यालयातील सात वर्षीय मुलीच्या गुप्तांगावर भाजल्यासारख्या जखमा आढळल्याने गेल्या आठवड्यात तालुक्यात खळबळ उडाली होती. सदरील संस्था एका राजकीय पुढार्याशी संबंधित असल्याने या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचाही प्रयत्न झाला. मात्र शिक्षण संस्थेकडून सुरुवातीपासूनच हा प्रकार त्वचेच्या संसर्गातून झाल्याची शक्यता वर्तविली गेल्याने अखेर घुलेवाडी, लोणी व अहमदनगर अशा तीन ठिकाणी संबंधित पीडितेची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतरही तिला पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठविण्यात आले होते. तेथील तपासणीचा अहवालही आता पोलिसांना प्राप्त झाल्याची विश्वसनीय माहिती मिळाली असून ‘त्या’ अहवालातही सदर मुलीसोबत कोणतेही दुष्कृत्य झाल्याची शक्यता नाकारण्यात आली आहे. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार केवळ शाळेतील कर्मचार्यांच्या हलगर्जीपणातूनच घडला असण्याच्या शक्यतेवर एकप्रकारे सत्यतेची मोहोर उमटली आहे.

गेल्या शनिवारी (ता.1) तालुक्यातील ‘त्या’ मूकबधिर विद्यालयातून सदरचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. शाळा व्यवस्थापनाने याच दिवशी संबंधित मुलीच्या आईला फोन करुन अशा प्रकारच्या जखमा झाल्याची व त्यानंतर दोन-तीन दिवस शाळेने तिच्यावर उपचार केल्याची माहिती त्यांना दिली. मात्र याउपरांतही त्या मुलीच्या जखमा बर्या होत नसल्याने तिच्या पालकांनी शाळेत येवून त्या मुलीला घेवून जावे व तिच्यावर चांगल्या रुग्णालयात उपचार करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली गेली होती. त्याप्रमाणे मुलीच्या आई-वडीलांनी त्याच दिवशी तिला राहाता तालुक्यातील आपल्या घरी नेले.

दुसर्या दिवशी रविवारी (ता.2) त्या मुलीला सोनगाव येथील एका खासगी दवाखान्यात तर सोमवारी (ता.3) लोणीच्या ग्रामीण रुग्णालयात नेवून तिच्यावर उपचार करण्यात आले. मात्र लोणीच्या ग्रामीण रुग्णालयाने सदरील जखमा भाजल्याच्या असण्याची शक्यता व्यक्त करीत ‘त्या’ मुलीच्या पालकांना पोलीस ठाण्यात जावून तक्रार देण्याची सूचना केल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले. त्यातून आपल्या मुलीसोबत काहीतरी चुकीचे घडल्याचा संशय निर्माण झाल्याने तिच्या पालकांनी मंगळवारी (ता.4) संगमनेरात येवून ‘त्या’ शाळेत धाव घेतली व मुख्याध्यापकांकडे आपल्या मुलीला झालेल्या जखमांबाबत जाब विचारला.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व मुलींची काळजी घेणार्या शिक्षिकेने सदरील जखमांबाबत खुलासा करतांना स्वच्छतेच्या अभावातून अशा ठिकाणी त्वचेला संसर्ग होवू शकतो व एकसारखे खाजवल्याने आसपासच्या भागात त्याचा प्रसारही संभव असल्याचे सांगत सुरुवातीचे तीन दिवस शाळेत उपलब्ध औषधांचा वापर करुन सदरील मुलीच्या जखमांवर उपचार केल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी संबंधित मुलीच्या पालकांना प्रकरण वाढवू नका, तुमच्या काही शंका असतील तर आपण बसून मिटवू असे सांगितल्याने त्यांच्या संशयात आणखी भर पडली. त्यामुळे त्यांनी तेथून थेट संगमनेर शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून सदरील मुलीला तिच्या आईसह घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवले. मात्र वैद्यकीय संसाधनांची अपूर्तता असल्याचे कारण सांगून तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी तिला अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्याच दिवशी (ता.4) तिला नगरला नेण्यात आले. तेथेही तिची तपासणी केल्यानंतर संबंधित मुलीला झालेल्या जखमांबाबत नेमका निष्कर्ष समोर न आल्याने शहर पोलिसांनी लोणी ग्रामीण रुग्णालयाच्या अहवालाचा आधार घेत विजयादशमीच्या दिवशी रात्री उशिराने एका अज्ञात इसमासह ‘त्या’ मूकबधिर विद्यालयाच्या मुख्याध्यापकांवर विनयभंगासह पोक्सोतील विविध तरतूदींन्वये गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली.

दरम्यानच्या कालावधीत सदरील प्रकरण माध्यमांमध्ये आल्याने त्याला राजकीय रंग चढू लागला. त्यातच गुरुवारी (ता.6) भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी अहमदनगरला जावून जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली व सदरील मुलीची पुण्यातील बी.जे.मेडिकल कॉलेजमध्ये (ससून रुग्णालय) वैद्यकीय तपासणी करण्यासह या प्रकरणाचा तपास संगमनेर तालुक्यातील पोलीस अधिकारी वगळून अन्य ठिकाणच्या महिला पोलीस अधिकार्यांकडून व्हावा अशी मागणी केली. त्यानुसार त्यांनीही लागलीच सदरील मुलीला ससून रुग्णालयात पाठवून या प्रकरणाचा तपास शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक निकीता महाले यांच्याकडून काढून घेत तो शिर्डीच्या पोलीस उपनिरीक्षक योगिता कोकाटे यांच्याकडे सोपविला.

या संपूर्ण प्रकरणात सदरील मुलीसोबत काहीतरी चुकीचे घडल्याचे चित्र उभे केले गेल्याने ससून रुग्णालयातून तिच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल काय असेल याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष्य लागले होते. मात्र आता ती प्रतीक्षा संपली असून ससून रुग्णालयाने आपल्या निष्कर्षाचा सीलबंद अहवाल तपासी अधिकार्यांकडे सोपविला आहे. या अहवालातून सदरील मुलीसोबत कोणत्याही प्रकारचे दुष्कृत्य झाल्याची शक्यता पूर्णतः फेटाळून लावण्यात आल्याची विश्वसनीय माहिती दैनिक नायकला प्राप्त झाली आहे. मात्र सदरचे प्रकरण सध्या तपासावर असल्याचे कारण सांगत तपाशी अधिकार्यांसह वरीष्ठ पोलीस अधिकार्यांनी त्याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. मात्र या अहवालातून तसा कोणताही प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट झाल्याने या प्रकरणातील गांभीर्य संपुष्टात आले आहे. सदरचा संपूर्ण प्रकार हा शाळेचे मुख्याध्यापक व मूकबधिर मुलांची काळजी घेणार्या शाळेतील शिक्षिकांच्या हलगर्जीपणातूनच घडल्याचेही आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे.

गेल्या 1 ऑक्टोबरपासून चर्चेत आलेल्या या प्रकरणाची प्रत्यक्ष फिर्याद 5 ऑक्टोबररोजी दाखल झाली. त्यानंतर हा विषय जिल्हाभर चर्चेत आल्यानंतर त्यात राजकारणाचीही एन्ट्री झाली. या प्रकरणातील पीडित मुलीची सोनगाव, लोणी, संगमनेर येथे वैद्यकीय तपासणी केली गेली. या उपरांतही भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी मागणी केल्याप्रमाणे त्या मुलीला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले व तेथेच तिची वैद्यकीय तपासणीही केली गेली. आता त्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला असून त्यात पीडितेसोबत चुकीचे काही घडल्याचा इन्कार करण्यात आला आहे. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार शाळेच्या मुख्याध्यापकांसह सहकारी शिक्षिकांच्या हलगर्जीपणातूनच घडल्याचे जवळजवळ आता स्पष्ट झाले आहे.

