घुलेवाडी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल! मालमत्तेचा वाद; बेकायदा जमाव जमवून घरावर हल्ला चढवल्याचीही तक्रार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महिन्याभरापूर्वी महिलांनी भररस्त्यात अडवून मारहाण केल्याच्या प्रकरणातून चर्चेत आलेल्या जिल्हा परिषदेच्या घुलेवाडी गटाचे माजी सदस्य सीताराम राऊत यांचा पाय आता आणखी खोलात गेला आहे. गेल्या महिन्यात त्यांनी बेकायदा जमाव जमवून आपल्या मालकीच्या रस्त्यावरुन वाद उकरुन काढला व राहत्या घरावर हल्ला करुन जातीवाचक शिवीगाळ करीत घराचे व दुचाकीचे नुकसान केल्याची फिर्याद घुलेवाडीतील कविता अभंग या महिलेने आज शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी राऊत यांच्यासह एकूण अठरा जणांवर भा.द.वी.च्या विविध कलमांसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या वृत्ताने संगमनेरच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची तक्रार घुलेवाडीतील कविता संतोष अभंग यांनी दाखल केली आहे. त्यानुसार त्यांचे पती हयात असतांना सन 2011 साली सीताराम पूंजा राऊत व सुनील बन्सी राठी या दोघांनी त्यांना फसवून त्यांच्या 0.09 आर क्षेत्राचा डेव्हलपमेंट करार केला होता. सदरचा करार झाल्यानंतर या दोघांनी त्या करारातील मुद्द्यांचे कधीही पालन केले नाही व करारात ठरल्याप्रमाणे रक्कमही अदा केली नाही. राहीलेल्या पैशांची त्यांच्याकडे मागणी केल्यानंतर वेळोवेळी ते धमक्या देत, त्यामुळे आपले पती दबावात आले व त्यातच त्यांचे निधन झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पतीच्या मृत्यूनंतरही सीताराम राऊत यांनी आपणास व कुटुंबास धमक्या देण्याचा प्रकार सुरुच ठेवला. या दरम्यान त्यांनी फिर्यादीच्या मालकीच्या रस्त्यावरही हक्क सांगण्यास सुरुवात केली. गेल्या महिन्यात 13 सप्टेंबररोजी दुपारी चारच्या सुमारास परिसरात भाजीपाला विकणार्या काही महिलांनी आपणास विनंती करीत आमच्या मालकीच्या रस्त्यावर बसून भाजीपाला विकण्याची परवानगी मागितली. त्यानुसार त्यांना माझ्या मालकीच्या रस्त्यावर बसून भाजी विकण्यास आपण संमती दिली होती. सदरचा प्रकार सीताराम राऊत यांना समजताच ते लागलीच त्यांचे चारचाकी वाहन (क्र.एम.एच.17/बी.एक्स.0643) घेवून तेथे आले. यावेळी फिर्यादी महिला व त्यांच्यात जोरदार वादावादीही झाली. याबाबत शहर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल असल्याचेही या तक्रारीत म्हंटले आहे.

त्यानंतर पाच दिवसांनी 19 सप्टेंबररोजी फिर्यादी त्यांचा भाऊ व मुलीसह आपल्या चारचाकी वाहनातून घुलेवाडी ग्रामपंचायत कार्यालयाच्या दिशेने जात असतांना दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सीताराम राऊत यांनी त्यांचे वाहन आडवे घालून त्यांना अडविले. यावेळी त्यांच्यात जोरदार शाब्दीक भांडणेही झाली. या दरम्यान राऊत यांनी आपणास जातीवाचक शिवीगाळ करीत आपला अपमान केला. या घटनेनंतर फिर्यादी तेथून पुन्हा घरी आली व त्यांचा भाऊ निघून गेला. दुपारी एकच्या सुमारास ‘त्या’ वादाचा राग मनात धरुन सीताराम राऊत, त्यांचा भाऊ संजय राऊत, संतोष लहानु राऊत यांनी 10 ते 15 अनोळखी लोकांना सोबत घेवून पुन्हा फिर्यादीच्या घरी येवून शिवीगाळ केली.

यावेळी राऊत व त्यांच्यासोबतच्या इतर लोकांनी आपल्या घराच्या समोर ठेवलेल्या झाडाच्या कुंड्या फोडल्या, खिडकीच्या काचा फोडल्या, बाहेर ठेवलेली पाण्याची टाकीही लोटून देत दारासमोर असलेल्या मोपेड वाहनाचेही नुकसान केले. या सगळ्या प्रकाराने मनात दहशत निर्माण झाल्याने आपण आपल्या मुलीसह मागच्या दाराने पळून गेलो. या सगळ्या घटनाक्रमाने आमचे कुटुंब घाबरल्याने आपण मुलीसह बाहेरगावी निघून गेलो व आजरोजी घुलेवाडीला परत आल्यानंतर शहर पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी आल्याचेही दाखल फिर्यादीतून सांगण्यात आले आहे.

त्यावरुन संगमनेर शहर पोलिसांनी जिल्हा परिषदेच्या घुलेवाडी गटाचे माजी सदस्य सीताराम राऊत, त्यांचा भाऊ संजय राऊत, संतोष लहानु राऊत यांच्यासह अन्य 10 ते 15 अनोळखी इसमांच्या विरोधात भारतीय दंडसंहितेचे कलम 341, 143, 147, 504, 506, 427 सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे (अॅट्रोसिटी) कलम 3 (1) (आर) (एस), 3 (2), 5 (ए) नुसार वरील सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने करीत आहेत.

