श्रीरामपूरातील 27 ग्रामपंचायतींसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर तलाठी, मंडळ, ग्रामपंचायात, पंचायत समिती व तहसिल कार्यालयात पहायला मिळणार

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार श्रीरामपूर तालुक्यातील माहे जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणार्‍या तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा मतदार यादी कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यामुळे तालुक्यातील इच्छुकांनी आत्ताच धावपळ करण्यास सुरूवात केली आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब, वडाळा महादेव, घुमनदेव, टाकळीभान, ब्राह्मणगाव वेताळ, बेलापूर बु. निपाणी वडगाव, कुरणपूर, कारेगाव, बेलापूर खु., पढेगाव, सराला, गोंडेगाव, मातुलठाण, भेर्डापूर, गोवर्धनपूर, मालुंजा बु., खोकर, महांकाळ वडगाव, नायगाव, मुठेवडगाव, वळदगाव, मांडवे, खानापूर, लाडगाव, एकलहरे व मातापूर या 27 ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या (यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम प्रभाग रचना व दि.25 सप्टेंबर, 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या विधानसभा मतदार यादीनुसार) 1 डिसेंबर, 2020 रोजी सर्व तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती कार्यालय व तहसिल कार्यालय येथील सूचना फलकांवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीसंदर्भात हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी 1 ते 7 डिसेंबर, 2020 असून 10 डिसेंबर, 2020 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या 27 ग्रामपंचायतींमध्ये एकूण 102 प्रभाग असून 281 सदस्य निवडून द्यायचे आहेत. यात 154 जागा महिला सदस्यांसाठी आरक्षित आहेत. संबंधित ग्रामपंचायतीतल्या नागरिकांनी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीचे अवलोकन करावे. तर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व मुक्त वातावरणात पार पडण्याच्या दृष्टीने सर्व नागरिकांचे सहकार्य असावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Visits: 115 Today: 1 Total: 1115713

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *