धक्कादायक! विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील चार चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू!! संगमनेर तालुक्यातील दुर्दैवी घटना; दोन सख्ख्या भावांच्या चार मुलांचा समावेश..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका आज पठार भागातील एका कुटुंबाला बसला. पठारावरील येठेवाडी परिसरात राहणाऱ्या दोन संख्ख्या भावांची चार मुले परिसरातील तलावात आंघोळीसाठी गेली असता वादळाने दोन दिवसांपूर्वीच पडलेल्या उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीचा धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत असून वीज कंपनीच्या गलथान कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मृत्यू झालेल्या चारही मुलांचे वय पाच ते सात वर्षांच्या दरम्यान आहे.

याबाबत समजलेल्या माहितीनुसार सदरची घटना आज (ता.8) दुपारी दुपारच्या सुमारास खंदरमाळवाडी अंतर्गत येणाऱ्या येठेवाडी परिसरात राहणाऱ्या अरुण व अजित या दोघ्या सख्ख्या आदिवासी भावंडांच्या कुटुंबात घडली. अरुण बर्डे यांची ओंकार (वय 7) व अनिकेत (वय 6) तर अजित बर्डे यांची दर्शन (वय 6) व विराज (वय 5) अशी प्राथमिक शाळेत शिकणारी ही चार मुलं आज शाळा सुटल्यानंतर येठेवाडी परिसरातील आपल्या घराच्या जवळच असलेल्या एका छोटेखानी तलावात पोहोण्यासाठी व खेकडा पकडण्यासाठी गेली होती. मात्र गेल्या दोन दिवसांपूर्वी पठार भागात झालेल्या वादळी पावसामुळे परिसरातील काही झाडे उन्मळून पडल्याने या तलावाजवळून जाणारी विद्युत महामंडळाच्या उच्च विद्युत वाहिनीची एक तार तुटून खाली पडलेली होती.

या विद्युत वाहिनीमध्ये विद्युत प्रवाह सुरू असल्याबाबत कोणतीही कल्पना नसल्याने तलावात आंघोळीसाठी गेलेल्या या चारही मुलांना त्या विद्युत वाहिनीचा धक्का लागून त्यात चौघांचाही मृत्यू झाला. सदरची घटना समजल्यानंतर आसपासच्या नागरिकांसह त्या मुलांच्या नातेवाईकांनीही तलावाच्या दिशेने धाव घेतली. तलावाकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने नागरिकांनी तेथपर्यंत पायी जात चादरीच्या झोळ्या करून बेशुद्ध झालेल्या मुलांना रुग्णवाहिकेपर्यंत आणले व तेथून सुरुवातीला घारगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात त्या मुलांना दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्या चौघांचाही विजेच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण संगमनेर तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अरुण व अजित बर्डे हे दोघेही सख्खे भाऊ असून मयत झालेली चारही बालके त्या दोघांची आहेत. या दुर्दैवी घटनेत दोन संख्ख्या भावांच्या चार मुलांचा अशा पद्धतीने करुण अंत होण्यास वीज वितरण कंपनीचा या गलथान कारभार कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी केला. उच्च विद्युत वाहिनी तुटून दोन दिवस झाले तरीही त्याची दुरुस्ती का करण्यात आली नाही? अथवा त्यातून सुरू असलेला विद्युत प्रवाह का बंद केला गेला नाही? असेही प्रश्न आता उपस्थित होऊ लागले असून हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आता समोर येऊ लागली आहे. सदरची घटना समजल्यानंतर शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, अशोक वाघ, रामनाथ कजबे, तलाठी युवराजसिंग जारवाल, घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार राजू खेडकर, पोलीस नाईक राजेंद्र लांघे, हरिश्चंद्र बांडे,प्रमोद चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Visits: 259 Today: 1 Total: 1104267
