नेवासा ते टाकळीभान रस्त्याचे निकृष्ट काम आम आदमीचा रास्ता रोको; आश्वासनानंतर आंदोलन मागे


नायक वृत्तसेवा, नेवासा
नेवासा ते टाकळीभान रस्त्याचे काम अतियस निकृष्ट पद्धतीने सुरू असल्याने कामाची गुणवत्ता तपासणी करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (ता. 22) सकाळी 11 वाजता नेवासा फाटा येथील आंबेडकर चौकात आम आदमी पक्षाचे तालुकाध्यक्ष राजू आघाव व निवडणूक समिती प्रमुख अ‍ॅड. सादिक शिलेदार यांच्या नेतृत्वाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा करुन बांधकाम खात्याचे या कामाकडे दुर्लक्ष होत आहे. संबंधित ठेकेदार निकृष्ट काम करत असून एका किलोमीटर अंतराला अडीच कोटी रुपये खर्च होवूनही गुणवत्ता नसल्याने तालुकाध्यक्ष आघाव यांनी तीव्र संताप व्यक्त केला. कामाचे अंदाजपत्रक आणि सुरु असलेल्या कामाचा लेखाजोखा अधिकार्‍यांसमोर मांडून काम अंदाजपत्रकाप्रमाणे न झाल्यास प्रसंगी न्यायालयातही दाद मागण्याचा इशारा अ‍ॅड. शिलेदार यांनी दिला. तर तालुका उपाध्यक्ष देवराम सरोदे म्हणाले, सध्या या रस्त्याच्या कामाकडे अर्थिक मिलीभगतीमुळे दुर्लक्ष झाल्याने कामाची वाट लागलेली आहे. जर अंदाजपत्रकाप्रमाणे काम केले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.

सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता दुबाळे यांनी निवेदन स्वीकारुन कामाची गुणवत्ता तपासणीसाठी पाठपुरावा करु व सुरु असलेले काम दर्जेदार होण्यासाठी बांधकाम विभाग लक्ष घालणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. नेवासा पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक समाधान भाटेवाल, हवालदार बाळकृष्ण ठोंबरे, सुहास गायकवाड, वाहतूक शाखेचे किरण गायकवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. याप्रसंगी घटनापती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवी भालेराव, आम आदमीचे सचिव प्रवीण तिरोडकर, भाऊसाहेब बेल्हेकर, अप्पासाहेब लोंढे, अल्पसंख्यांक आघाडी प्रमुख सलीम सय्यद, शहराध्यक्ष संदीप आलवणे, बापूसाहेब अडांगळे, नानासाहेब बर्डे, डॅनियल जावळे, संतोष कापसे, पांडुरंग खंडागळे, नितीन गुंजाळ, युवक आघाडी प्रमुख दीपक गायकवाड, सोहेल शेख आदी पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.

Visits: 112 Today: 1 Total: 1106074

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *