दर्शना पवार प्रकरणी पोलिसांची पाच पथके तयार वेल्हे पोलिसांत अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
एमपीएससी परीक्षेत राज्यातून सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या कोपरगाव येथील दर्शना दत्ता पवार हिच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी पाच पथके तयार केली आहेत. संबंधित तरुणीच्या डोक्यात आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर येतं आहे. त्यामुळे वेल्हे पोलिसांकडून अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

एमपीएससी परीक्षेत दर्शना दत्ता पवार (वय 26) उत्तीर्ण झाली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून तिची निवड करण्यात आली होती. पुण्यातील एका संस्थेकडून तिचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. 9 जून रोजी ती पुण्यात आली होती. सिंहगड रस्ता भागातील नव्हे परिसरात एका मैत्रिणीकडे ती राहत होती. 12 जून रोजी सिंहगड किल्ल्यावर निघाली आहे, असे मैत्रिणीला सांगून ती घराबाहेर पडली. दर्शनाने कुटुंबियांना याबाबतची माहिती दिली होती. तिच्यासोबत मित्र राहुल दत्तात्रय हंडोरे होता. 12 जूननंतर तिचा मोबाइल क्रमांक बंद झाला. तिच्या कुटुंबियांनी संपर्क साधला. मात्र, तिचा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी शोध घेतला. मात्र, तिचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी दर्शना बेपत्ता असल्याची तक्रार सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दिली.

दरम्यान, दर्शनाबरोबर असलेला मित्र राहुल हंडोरे बेपत्ता झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार वारजे पोलीस ठाण्यात दिली होती. रविवारी राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या सतीचा माळ परिसरात दर्शनाचा मृतदेह सापडला. दर्शना आणि तिचा मित्र राहुल हंडोरे 12 जून रोजी दुचाकीवरुन वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ला परिसरात गेले होते. दर्शनाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. अद्याप पोलिसांना शवविच्छेदन अहवाल मिळाला नसून, शवविच्छेदन अहवालातून तिच्या मृत्यूमागचे कारण समजेल.

ट्रेकिंगला दोघे गेले होते, येताना राहुल एकटाच होता…
दर्शना आणि राहुल दोघेही 12 जूनला राजगडावर दुचाकीने गेले होते. साधारण 6 वाजून 15 मिनिटांनी गडाच्या पायथ्याशी पोहोचले. त्यानंतर दोघांनीही गड चढायला सुरुवात केली. मात्र नंतर 10 वाजताच्या सुमारास राहुल एकटाच परत येताना दिसत आहे. राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका हॉटेलच्या सीसीटीव्हीतून ही माहिती समोर आली आहे. राहुल सध्या बेपत्ता आहे. राहुल नेमका कुठे आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. त्याच्या मोबाईलचं लोकेशन बाहेरील राज्यात दिसत आहे. मात्र दुसर्यांच्या फोनवरुन त्याने घरच्यांना फोन करुन काही माहिती दिली आहे आणि या प्रकरणात मी काहीही केलं नसल्याचं घरच्यांना सांगितलं आहे.
