नद्यांच्या स्वच्छतेबाबत पालिकेची भूमिका संशयास्पद! म्हाळुंगीचा झालाय कचरा डेपो; पालिका मात्र धक्काभिंतीतच धन्य..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
दोन वर्षांनी होत असलेल्या सिंहस्थाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने गोदावरीच्या विकासासाठी विशेष प्रयत्न सुरु केले असतानाच दुसरीकडे संगमनेरकरांसाठी जीवनदायी ठरलेल्या नद्यांची मात्र प्रचंड दूरावस्था होत असल्याचे भयानक वास्तव सध्या दृष्टीस पडत आहे. कोणत्याही अडथळ्याशिवाय या नद्यांच्या पात्रातून सुरु असलेल्या वाळू उपशासह शहरातून वाहणारे सांडपाणी, बांधकामाचा राडारोडा, दररोजचा कचरा आणि चक्क पशूंच्या कत्तलखान्यातील टाकावू घाणही थेट नद्यांच्या पात्रात टाकली जात असल्याने शहरातून वाहणार्‍या या दोन्ही नद्यांचे पावित्र्य जवळजवळ संपुष्टात आले आहे. स्वच्छ भारत अभियानातून मिळवलेल्या बक्षिसांच्या जोरावर स्वतःची पाठ थोपटवून घेणार्‍या पालिका प्रशासनाने नद्यांच्या स्वच्छतेकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने प्रशासकांच्या कारभाराबाबतही संशय निर्माण झाला आहे. एकीकडे नद्यांचे पावित्र्य संपवण्याचे पद्धतशीर षडयंत्र सुरु असताना दुसरीकडे पालिकेने ‘नदीसुधार’च्या गोंडस नावाखाली राज्य सरकारकडून कोट्यवधीचा निधी मागितल्याने मोठे आश्‍चर्यही व्यक्त होत आहे.


नाशिकमध्ये होत असलेल्या सिंहस्थ कुंभपर्वणीच्या अनुषंगाने सध्या राज्य सरकार सक्रिय झाले असून खूद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोदावरीच्या स्वच्छतेबद्दल प्रचंड आग्रही असल्याचे गेल्याकाही दिवसांतील घडामोडींवरुन दिसत आहे. त्यामुळे येणार्‍या कालावधीत गोदावरीच्या पात्रातील प्रदुषणावर नियंत्रण मिळवले जाण्याची शक्यता निर्माण झालेली असताना या नदीच्या उपनद्यांमधील प्रचंड जलप्रदुषण आणि स्वच्छतेचे काय? असा प्रश्‍न मात्र कायम आहे. त्यातूनच आता प्रत्येक गोष्टीच्या श्रेयासाठी भांडणार्‍या स्थानिक लोकप्रतिनिधींनी नद्यांमधील अस्वच्छतेकडेही लक्ष देण्याची आणि त्याच्यावरुन एकमेकांशी वाद घालण्याची गरज संगमनेरकरांमधून व्यक्त होवू लागली आहे.


संगमनेरला लाभलेल्या अमृतवाहिनी प्रवरा आणि तिची उपनदी असलेल्या म्हाळुंगी नदीने समृद्ध केले आहे. मात्र गेल्या दीड-दोन दशकांत शहरासह संपूर्ण तालुक्यात ‘वाळू तस्कर’ नावाची जमात जन्माला येवून त्यांनी बेमालुमपणे दिवसरात्र या नद्यांचे लचके तोडल्याने काही वर्षांपर्यंत वाळूने ओथंबलेल्या या नद्यांच्या पात्राचे अक्षरशः वाळवंट झाले आहे. या उपरांतही नद्यांमधील वाळूसाठी पडणारे दरोडे आजही सुरुच असल्याने शहरात मोठा संताप निर्माण होत असतानाच आता काहींकडून जाणीवपूर्वक नद्यांना दुषीत करण्याचे षडयंत्र राबवले जात असल्याचे समोर येवू लागले आहे. अर्थात या प्रक्रियेत शहरातील सांडपाणी व्हाया म्हानुटी-म्हाळुंगी व नाटकी द्वारा थेट नदीपात्रात सोडून पालिकेने बाजी मारली आहे हे वेगळं सांगायला नको.


जेव्हा पालिकाच पर्यावरणाची एैशीतैशी करीत असेल तेव्हा सामान्यांकडून काय अपेक्षा? या उक्तीप्रमाणे पालिकेचा आदर्श घेत आता शहरातील काही बांधकाम व्यावसायिक व नागरिकांनी बांधकामातील टाकावू साहीत्यही (राडारोडा) गुपचूप म्हाळुंगी नदीच्या कडेला टाकण्यास सुरुवात केल्याने नदीच्या पारंपरिक प्रवाहात अडथळे निर्माण होवू लागले आहेत. हा प्रकार कमी होता म्हणून की काय मागील काही वर्षात शहरात चिकनशॉप अथवा मटनाची दुकानं चालवणार्‍यांनीही पद्धतशीरपणे प्रागैतिहासापासून अविरत प्रवाहित राहून या परिसराला समृद्ध करणार्‍या आणि पुराणात अतिशय पवित्र मानल्या गेलेल्या या नद्यांच्या थेट वाहत्या प्रवाहात आणि पात्रालगत कत्तलखान्यांमधील टाकावू अवशेषही टाकायला सुरुवात केल्याने कधीकाळी शितल प्रवाहासह शांत आणि रम्य परिसर समजले जाणारे नद्यांचे काठ आता अतिशय घाणेरड्या दुर्गंधीच्या आहारी जावू लागले आहेत.


काही वर्षांपूर्वी म्हाळुंगीच्या विकासाचे स्वप्नं दाखवून संगमनेर नगरपरिषदेने कोट्यवधी रुपयांचा खर्च करुन अकोले पूलापासून साईमंदिराच्या दिशेने दोन्ही बाजूने धक्काभिंत घालण्याचा उपक्रम राबवला. मात्र त्याचा कोणताही फायदा झाला नसल्याचे आता स्पष्टपणे दिसू लागले असून दोन्ही बाजूला धक्काभिंती असतानाही ना वाळू उपसा थांबला आहे, ना थेट पात्रात घाण टाकण्याचे प्रकार. त्यामुळे नद्यांच्या विकासाबाबत पालिकेची भूमिकाचा संशयात्मक बनली आहे. त्यातच पालिकेकडून नदीसुधारचे गोंडस गाजर दाखवून राज्य सरकारकडून कोट्यवधीची मागणी केली गेल्याने वेगवेगळ्या चर्चांसह आश्‍चर्यही व्यक्त होवू लागले आहे.


संगमनेर शहराचे अस्तित्व प्रागैतिहासापासून मानले गेले असून त्याही पूर्वीपासून प्रवरा व म्हाळुंगी या नद्यांचे प्रवाह वाहते होते. त्यामुळे पालिका प्रशासकांनी स्वच्छतेचा ढोल वाजवताना आधी नद्यांमध्ये त्यांच्याकडूनही सुरु असलेल्या जलप्रदुषणावर उपाय शोधून रात्रीच्या अंधारात कांपलेल्या जनावरांचे अवशेष, राडारोडा व कचरा आणून टाकणार्‍यांवर राजकारण विरहित कठोर कारवाई करुन गुन्हे दाखल करण्याची गरज आहे. मात्र यासर्व गोष्टी पालिकेसाठी गौन असल्याने सद्यस्थितीत पालिका धक्काभिंतीवरच समाधानी असून नदीसुधारखाली मिळणार्‍या कोट्यवधीच्या प्रतिक्षेत असल्याचे दुर्दैवी चित्र सध्या संगमनेरच्या पवित्र नद्यांच्या काठावर बघायला मिळत आहे.


काही वर्षांपूर्वी पालिकेने स्वामी समर्थ मंदिर ते जाजू पेट्रोल पंपापर्यंत ‘रिंगरोड’ तयार केला होता. सुरुवातीला हा रस्ता निसर्गरम्य आणि दाट झाडीतून जाणारा असल्याने संगमनेरकरांसाठी आवडीचा बनला होता. मात्र नागरिकांच्या मनातील ही आवड फारकाळ टिकली नाही. आज हा संपूर्ण रस्ता खड्डेमय होण्यासह गुन्हेगारी टोळ्या, नशेबहाद्दर आणि नद्या प्रदुषीत करण्याचे षडयंत्र रचणार्‍यांच्या हाती गेला असून सर्वसामान्यांना या रस्त्याचा वापर करण्यापूर्वीच घाम फूटत आहे. पालिकेने विकासाचा चष्मा स्वच्छ करुन या गोष्टींकडे पाहण्याची गरज आहे.

Visits: 123 Today: 1 Total: 1109477

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *