जिल्ह्यातील 204 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धुराळा उडणार सर्वाधिक संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींची होणार निवडणूक


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्‍या आणि नव्याने स्थापित सुमारे 7 हजार 649 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 13 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 18 ऑक्टोबरपर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी जाहीर केले. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील 204 ग्रामपंचायतींचा समावेश असून, सर्वाधिक संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा धुराळा उडणार आहे.

विधानसभा मतदारसंघाच्या 31 मे 2022 रोजी अस्तित्वात आलेल्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर 13 ऑक्टोबर 2022 रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 21 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. कारण विधानसभेच्या संबंधित तारखेला अस्तित्वात असलेल्या याद्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आहे तशा वापरल्या जातात. हरकती आणि सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणार्‍या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागनिहाय यादीत नाव नसणे आदिंसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील 206 ग्रामपंचायतींची मुदत ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 ला संपत आहे. यामध्ये श्रीरामपूर 6, शेवगाव 12, पाथर्डी 11, सर्वाधिक संगमनेर 37, कर्जत 8, कोपरगाव 26, अकोले 10, नेवासा 13, जामखेड 3, नगर 28, राहाता 12, पारनेर 16, राहुरी 11 आणि श्रीगोंदा 10 अशा 204 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. दरम्यान, संगमनेर तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींचा समावेश असून लोकनियुक्त सरपंच निवड असल्याने नवख्या गावकारभार्‍यांना चांगली संधी मिळणार आहे.

Visits: 125 Today: 1 Total: 1419383

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *