महाराष्ट्र एरोबिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलचे यश! राज्यातील विविध शाळांमधून पाचशेहून अधिक स्पर्धक सहभागी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सातारा जिल्हा स्पोर्टस एरोबिक्स, फिटनेस असोसिएशन व एस. ए. एफ. ए. एम. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र एरोबिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलने नेत्रदीपक यश मिळवले. सातारा येथे पार पडलेल्या या स्पर्धेत राज्यातील विविध शाळांमधून पाचशेहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.

या स्पर्धेतील 8 ते 14 वर्षांखालील वयोगटात शौर्य श्रेयस मणियार याने सुवर्ण पदक मिळवले. तर रुद्र सुदीप हुलवान, जयदीप जयप्रकाश चोपडे, रचित रोहित कासट, पृथ्वीक विवेक कोल्हे यांनी रौप्य आणि साईराज बाळासाहेब बालोडे, ईशान संदीप उगले या दोघांनी कांस्य पदकांची कमाई केली. आलोक अमोल आरोटे, ओम विनोद गणोरे व राजवीर उमेश आवारी यांना चतुर्थ क्रमांकावर समाधान मानावे लागले.

मुलींच्या गटात नंदीनी सुदीप हुलवान, तनुश्री प्रेमराज लहामगे, मानसी दत्तात्रय आहेर, आस्था नितेश जोशी, मनस्वी वैभव कदम, आर्या संतोष तक्ते, अस्मी दीपक वर्पे व आदिती नारायण काळे यांनी एरोबिक्सचे विविध प्रकार सादर करताना सुवर्ण पदकांची कमाई केली. या सर्व विद्यार्थ्यांना ध्रुव ग्लोबलचे प्रशिक्षक कुलदीप कागडे यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल शाळेचे चेअरमन डॉ. संजय मालपाणी, व्हा. चेअरमन गिरीश मालपाणी व प्राचार्या अर्चना घोरपडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
