घुलेवाडीच्या धनगंगा पतसंस्थेत आणखी 48 लाखांचा अपहार! व्यवस्थापकानेच जमिन तारण ठेवून परस्पर कर्जही काढले आणि परतफेड न करता जमिनही विकली..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
घुलेवाडीच्या धनगंगा स्वयं सहाय्यता ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या लेखापरिक्षणातून आता आणखी एक घबाड बाहेर आलं असून यावेळी तब्बल 48 लाख 60 हजार 287 रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सहकारी संस्थांचे लेखापरिक्षक अजय राऊत यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून यापूर्वीच गजाआड असलेला संस्थेचा व्यवस्थापक सचिन बजरंग कवडे याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. या वृत्ताने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली असून या संस्थेत आपल्या कष्टाचा पैसा जतन करुन ठेवलेल्या ठेवीदारांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.


याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील शहरानजीकच्या घुलेवाडी परिसरात असलेल्या धनगंगा स्वयं सहाय्यता ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे सन 2018-19 या आर्थिक वर्षाचे लेखापरिक्षण सुरु असतांना संस्थेचे चेअरमन रंगानाथ काशिद यांनी संस्थेचा व्यवस्थापक सचिन बजरंग कवडे याने त्याच्या स्वतःच्या मालकीच्या पारेगाव बु. (ता.संगमनेर) येथील जमिनीचे गहाणखत करुन 40 लाखांचे कर्ज घेतल्याची बाब लेखापरिक्षकांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावरुन लेखापरिक्षक अजय राऊत यांनी खरेदीखत, गहाणखत व अन्य कागदपत्रांची तपासणी केली असता संस्थेचा व्यवस्थापक सचिन कवडे याने आपल्या पत्नीच्या नावे 40 लाख रुपयांचे कर्ज घेतांना आपल्या नावावर असलेली पारेगाव बु. येथील गट नं.634/1 व 634/3 ही मालमत्ता संस्थेला तारण म्हणून दिली होती.


मात्र घेतलेल्या कर्जापोटी ढबूही न भरता त्याने परस्पर कर्जाचा बोगस ‘निल’ दाखला तयार करुन त्या आधारावर सदरची मिळकत अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील ज्योती तुकाराम हुलवळे यांना विक्री केल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे 40 लाख रुपयांचे तारण कर्ज घेताना त्याने चेअरमन व संचालक मंडळाची कोणतीही मंजूरी न घेताच 2 एप्रिल 2016 रोजी सदरचेी रक्कम परस्पर संस्थेतून घेतली. मात्र त्यापोटी तारण ठेवण्यासाठीचे गहाणखत 2 ऑगस्ट 2016 रोजी लिहून दिले. सदर बेकायदा कर्जाची रक्कम 31 मार्च 2019 अखेरपर्यंत व्याजासह 46 लाख 47 हजार 307 इतकी झाली. विशेष म्हणजे त्याने 30 सप्टेंबर 2017 नंतर स्वतः घेतलेल्या कर्जावर व्याजाची आकारणीही केलेली नाही.


त्यासोबतच कर्जदार लहानु काशिद यांनी 24 जून 2016 रोजी 95 हजारांचे सोने गहाण ठेवून 38 हजारांचे कर्ज घेतले होते व त्याची परतफेडही केली होती. मात्र त्यांना आजपावेतो आपले सोने परत मिळालेले नाही. या व्यवहारात 55 हजार 860 रुपयांचा अपहार झाल्याचे दिसून आले. तुकाराम वदक यांनी 30 सप्टेंबर 2015 रोजी 95 हजारांचे सोने तारण ठेवून 75 हजारांचे कर्ज घेतले होते. त्यांनीही कर्जाची संपूर्ण परतफेड केली मात्र त्यांनाही सोने परत मिळाले नाही. या व्यवहारात 95 हजारांचा अपहार झाला. सागर वाकचौरे यांनी 8 जुलै 2016 रोजी 48 हजार 720 रुपयांचे सोने तारण ठेवून 75 हजारांचे कर्ज घेतले होते, त्याची परतफेडही त्यांनी केली. मात्र त्यांचे सोनेही परत मिळाले नाही. त्यात व्यवहारातही 48 हजार 720 रुपयांचा अपहार झाला.


अण्णासाहेब नवले योनी 8 जुलै 2016 रोजी 10 हजार 400 रुपये किंमतीचे सोने तारण ठेवून 9 हजार रुपये कर्ज घेतले होते. त्यांनी कर्जाची रक्कमही भरलेली नाही आणि त्यांना त्यांचे सोनेही परत मिळालेले नाही. त्या व्यवहारात 1 हजार 400 रुपयांचा अपहार झाला आहे. रमेश जगताप यांनी 28 सप्टेंबर 2016 रोजी 35 हजारांचे सोने तारण ठेवून 28 हजार रुपये कर्ज घेतले होते. त्यांनी कर्जाची रक्कम भरलेली नाही, आणि त्यांना तारण ठेवलेले सोनेही परत मिळालेले नाही. त्या व्यवहारात 7 हजारांचा अपहार झाला आहे. तसेच सोमनाथ राऊत यांनी 7 ऑक्टोंबर 2016 रोजी 22 हजार रुपयांचे सोने तारण ठेवून 17 हजारांचे कर्ज घेतले होते. त्यांनीही कर्जाच्ी परतफेड केलेली नाही, आणि सोनेही परत नेलेले नाही. या व्यवहारातही 5 हजारांच्या रकमेचा अपहार झाल्याचे लेखापरिक्षणात आढळून आले आहे. संस्थेत सोने तारण ठेवून देण्यात आलेल्या कर्जाची संपूर्ण जबाबदारी संस्थेचा व्यवस्थापक सचिन बजरंग कवडे याची होती. मात्र त्याने संचालक मंडळाला अंधारात ठेवून कागदपत्रांची अफरातफर करुन 2 लाख 12 हजार 980 रुपये सोने तारण कर्ज प्रकरणात अपहार केला.


दिनांक 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2019 या कालावधीत व्यवस्थापक सचिन बजरंग कवडे याने आपल्या पदाचा दुरुपयोग करुन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तारण असलेली स्वतःचीच मालमत्ता विक्री करुन 46 लाख 47 हजार 307 रुपये व सोने तारण प्रकरणातील 2 लाख 12 हजार 980 रुपये अशा एकूण 48 लाख 60 हजार 287 रुपयांचा अपहार केल्याचे लेखापरिक्षणातून स्पष्ट झाले आहे. त्यानुसार सहकारी संस्थांचे लेखापरिक्षक अजय राऊत यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी यापूर्वीच अपहाराच्या प्रकरणात गजाआड असलेल्या आरोपी सचिन बजरंग कवडे याच्या विरोधात भारतीय दंड संहितेचे कलम 408, 420, 467 व 471 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

2017 मध्ये दाखल झाला होता सुमारे चार कोटी रुपयांच्या अपहाराचा गुन्हा..
घुलेवाडीच्या धनगंगा स्वयं सहाय्यता ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचा व्यवस्थापक सचिन बजरंग कवडे याने संचालकांच्या संगनमताने संस्थेत ठेवलेल्या ठेवीदारांच्या 3 कोटी 91 लाख 61 हजार 254 रुपयांच्या ठेवीचा अपहार केल्या प्रकरणी ऑक्टोबर 2017 मध्ये त्याच्यासह संस्थेचे चेअरमन रंगनाथ काशिनाथ काशिद, व्हा.चेअरमन किरण रामदास जाधव, संचालक शांताराम मुक्ताजी राऊत, आनंदा लहानु पानसरे, विक्रम बाजीराव गुंजाळ, महादेव दगडू अरगडे, प्रवीण छबू भावसार, राजेंद्र मल्लु गायकवाड, प्रवीण कारभारी ढमाले, बेबी संजय सोनवणे, सुनंदा बाळासाहेब सातपुते, भिकाजी गोपीनाथ राऊत, अण्णासाहेब गंगाधर नवले, बाळासाहेब धर्माजी नवले, सचिन गोविंद काळे, अशोक लहानु पानसरे, बाळासाहेब नाना राऊत, नामदेव देवराम घोडे, जिजाबाई देवीदास पांडे, अलका अशोक काशिद, कर्मचारी सचिन सुकदेव सोनवणे, विनायक दामोदर कांडेकर, रोखापाल शहनाज महबुब सय्यद व शिपाई सोमनाथ भागाजी राऊत आदींनी संगनमताने दिनांक 30 सप्टेंबर 2009 ते 29 सप्टेंबर 2017 या आठ वर्षांच्या कालावधीत वरील रकमेचा अपहार केल्याचा ठपका ठेवला होता. आता त्यात व्यवस्थापक सचिन बजरंग कवडे याच्या नव्याने समोर आलेल्या 48 लाख 60 हजार 287 रुपयांची भर पडल्याने घुलेवाडीच्या धनगंगा स्वयं सहाय्यता ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत एकूण 4 कोटी 40 लाख 21 हजार 541 रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे.

Visits: 86 Today: 1 Total: 437868

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *