राहुल गांधी यांना ‘भारत जोडो’ ऐवजी ‘घर जोडो’ अभियानाचे सांगा! ऑडिओ क्लिप व्हायरल; औरंगाबादच्या तरुणाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांनाच साकडे..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या देशभर चर्चेत आहे. या यात्रेला दक्षिणेतील विविध राज्यांमधून मोठा प्रतिसाद मिळत असतांना आता औरंगाबादच्या एका तरुणाने राहुल गांधी यांच्याबाबत व्यक्त केलेली चिंता राज्यात तुफान व्हायरल झाली आहे. रमेश पाटील नावाच्या या तरुणाने चक्क काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांना मोबाईलवर फोन करुन ‘राहुल गांधी यांचे लग्न व्हायला हवे’ अशी अपेक्षा व्यक्त करीत ‘खरेतर त्यांनी भारत जोडो ऐवजी आधी घर जोडो अभियान राबविले पाहिजे’ असा सल्लाच त्यांनी दिला. त्यांचा हा अजब सल्ला ऐकून खुद्द थोरातांनाही हसू आवरता आले नाही. या दोघांमध्ये झालेल्या याच संभाषणाची ऑडियो क्लिप सध्या समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून पाटील यांनी दिलेल्या सल्ल्याची खुमासदार चर्चा रंगली आहे.

औरंगाबादमध्ये राहणार्या रमेश पाटील नावाच्या तरुणाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांना मोबाईलवर फोन केला होता. फोनच्या सुरुवातीला पाटील यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेबाबत भाष्य करताना आपल्याला हा उपक्रम अतिशय भावल्याचे सांगितले. या यात्रेच्या माध्यमातून गांधी परिवारातील सदस्य सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधत असल्याबाबत त्यांनी समाधानही व्यक्त केले. काँग्रेस पक्षाबाबत पाटील यांच्याकडून व्यक्त केल्या जात असलेल्या प्रतिक्रियेला आमदार थोरात प्रतिसाद देत असतांनाच अचानक त्यांनी चर्चेचा विषय बदलला.

यावेळी बोलता बोलता पाटील यांनी अचानक राहुल गांधी यांच्या लग्नाच्या विषयाला हात घातला. त्यावर बोलताना ते थोरातांना म्हणाले की, राहुल गांधींचे आतातरी लग्न झाले पाहिजे. त्यांनी भारत जोडो यात्रा काढून पक्ष जोडण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. मात्र त्या आधी त्यांनी ‘घर जोडो’ अभियान राबवून आधी लग्न केले पाहिजे असे ते म्हणताच थोरात यांनाही हसू आवरता आले नाही. यानंतरही पाटील यांनी गांधींच्या लग्नाबाबत चिंता व्यक्त करताना थोरातांनी आपले हे मत राहुल गांधींपर्यंत पोहोचवण्याची अपेक्षाही व्यक्त केली.

राहुल गांधी यांनी लवकरात लवकर लग्न का करावं हे बाळासाहेब थोरात यांना पटवून देताना रमेश पाटील पुढे म्हणतात; ‘त्यांनी कोणत्याही समाजाची बायको करावी, पण आता लग्न केलेच पाहिजे. त्यांनाही बायकोचा अनुभव आला पाहिजे की नाही?. बायको कशी असते हे त्यांनाही समजलेच पाहिजे.’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर पुढे बोलताना पाटील यांनी आपण सुद्धा राहुल गांधी यांच्याप्रमाणेच बेरोजगार असल्याचे सांगत पुन्हा त्यांच्या लग्नाच्या विषयाकडे आपली चर्चा वळवली. ‘आपल्याला पक्षाशी काही घेणंदेणं नाही, परंतु किमान यावर्षी तरी राहुल गांधींचे लग्न होईल का?’ असा सवालही त्यांनी बाळासाहेब थोरात यांना विचारला.

राहुल गांधी यांचे वय आता पन्नास वर्षांचे आहे. जसे वय वाढत जाईल तशी परिस्थितीही बदलत राहील. काही वर्षांनंतर त्यांना बायकोही मिळणार नाही अशी चिंताही त्यांनी फोनद्वारे बाळासाहब थोरात यांच्याकडे व्यक्त केली. या दोघांमध्ये झालेल्या जवळपास तीन मिनिटांच्या या संभाषणाची ऑडियो क्लिप सध्या समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून औरंगाबादच्या या तरुणाने चक्क काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांना फोन करुन काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख नेत्याच्या लग्नाबाबत चिंता व्यक्त केल्याने राज्यात खुमासदार चर्चा रंगल्या आहेत.

