अजितदादांबरोबरच्या चार आमदारांविरुद्ध आक्रमक भूमिका घेणार! राष्ट्रवादी फुटीनंतर अहमदनगरमध्ये झालेल्या आढावा बैठकीत निर्णय


नायक वृत्तसेवा, नगर
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अहमदनगरमध्ये मूळ पक्षाची प्रथमच आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी चौदापैकी सहा तालुक्यांचे तालुकाध्यक्ष तसेच जिल्हा कार्यकारिणीच्या ९० पदाधिकार्‍यांपैकी तब्बल ६० जण उपस्थित होते. याशिवाय सामाजिक न्याय, वकील, ग्रंथालय, ज्येष्ठ नागरिक, सांस्कृतिक, माजी सैनिक या सेलचे पदाधिकारीही उपस्थित होते. त्यावरून नगर जिल्ह्यात पक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याच पाठीशी असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता पवारांना सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात गेलेल्या चार आमदारांविरूद्ध आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.

राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे आणि शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी सोमवारी (ता.१८) तसे सूतोवाच केले. जिल्हाध्यक्ष फाळके यांच्यासोबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे, माजी मंत्री, राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे सक्रीय झाले आहेत. आमदार रोहित पवार राज्यात फिरत असताना आता फाळके आणि तनपुरे या दोघांनी आता शरद पवार गटाची जिल्ह्यातील नवी संघटना बांधणीचेही नियोजन केले आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडून आता जवळपास दोन महिने होत आले आहेत. या पार्श्वभूमीवर, शरद पवारांच्या गटातून अजित पवारांच्या गटात गेलेल्यांपैकी कोणी परत माघारी फिरते काय, याचा अंदाज घेण्यात आला आहे. त्यासाठी संबंधितांना पुरेशी संधीही देण्यात आली. त्याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाध्यक्ष फाळके यांनी बैठक घेतली.

यावेळी आमदार तनपुरेंसह माजी आमदार दादा कळमकर, शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, महिला जिल्हाध्यक्षा योगीता राजळे उपस्थित होते. आढावा बैठकीस नगर तालुका, जामखेड, नेवासा, शेवगाव, पाथर्डी आणि राहुरी या सहा तालुक्यांचे तालुकाध्यक्ष तसेच जिल्हा कार्यकारिणीच्या ९० पदाधिकार्‍यांपैकी तब्बल ६० जण उपस्थित होते. याशिवाय सामाजिक न्याय, वकील, ग्रंथालय, ज्येष्ठ नागरिक, सांस्कृतिक, माजी सैनिक या सेलचे पदाधिकारीही उपस्थित होते. फक्त युवक-युवती सेवा दल पदाधिकारी नव्हते. जिल्हाध्यक्ष फाळके आणि आमदार तनपुरे हे संयुक्तपणे सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्हा दौरा करणार आहे. प्रत्येक तालुक्यात नव्याने संघटना बांधणी करणार आहेत. शिवाय विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकाही घेणार आहेत. त्यानंतर १० ते १२ ऑक्टोबरदरम्यान नवे पदाधिकारी निवड होणार आहे. शरद पवारांना दगाफटका करणार्‍या जिल्ह्यातील चार आमदारांविरुद्ध आक्रमक भूमिका घेणार असल्याचे फाळके यांनी जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *