संगमनेर तालुका पोलिसांनी गाय चोरट्याच्या आवळल्या मुसक्या पेमगिरी येथील घटना; पिकअपसह साठ हजार रुपयांची गाय ताब्यात
![]()
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील पेमगिरी येथील पशुपालक विनायक मधुकर बछिडे यांची सात दिवसांपूर्वी गोठ्यातून गाय चोरीला गेली होती. त्यानंतर तालुका पोलिसांनी तपास करत गाय चोरणार्याच्या बुधवारी (ता.9) मुसक्या आवळल्या असून, गायीसह पिकअप ताब्यात घेतली आहे.

याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पेमगिरी येथील पशुपालक विनायक बछिडे यांनी नेहमीप्रमाणे गुरुवार दिनांक 3 जून रोजी घरासमोरील अंगणात पाच गाया बांधल्या होत्या. दुसर्या दिवशी सकाळी उठल्यानंतर एक गाय नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ आजूबाजूला गायीचा शोध घेतला असता ती कुठेच मिळून आली नाही. अखेर गाय कोणीतरी चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तालुका पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली.

याबाबत विनायक बछिडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद क्रमांक 248/2021 भादंवि 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी गायीचा तपास करण्यास सुरुवात केली असता बुधवारी (ता.9) गावातीलच दत्तात्रय लक्ष्मण कोल्हे (रा.चंदन टेकडी) याने गाय चोरल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपी कोल्हे याच्याकडून वाहतुकीसाठी वापरलेली पिकअप व साठ हजार रुपयांची गाय ताब्यात घेत अटक केली आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षिका डॉ.दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, सहाय्यक फौजदार बी.बी.घोडे, मुख्य हवालदार एम.एन.जाधव, पोलीस नाईक एम.आर.सहाणे यांनी ही कामगिरी केली.
