रिमझिम पावसात एकविराचा दांडिया महोत्सव उत्साहात राधा खुडेच्या ‘पाहुणं जेवला काय’ गाण्याने भरली रंगत


नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्रात सांस्कृतिक परंपरा व वैभवशाली शहर म्हणून ओळख निर्माण झालेल्या संगमनेर शहरात एकविरा फाउंडेशनच्यावतीने झालेल्या दांडिया महोत्सवावेळी आलेला रिमझिम पाऊस आणि युवतींच्या जल्लोषामुळे मोठ्या उत्साहात झालेला दांडिया महोत्सव संस्मरणीय ठरला.

संगमनेरातील यशोधन कार्यालयाच्या प्रांगणात एकविरा फाउंडेशनच्यावतीने दांडिया महोत्सव 2022 संपन्न झाला. यावेळी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, उद्योजक राजेश मालपाणी, माजी गृहमंत्री दिलीप वळसे यांच्या कन्या पूर्वा वळसे, कांचन थोरात, दुर्गा तांबे, कर्करोगतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, शरयू देशमुख आदिंसह संगमनेर शहरातील विविध मान्यवर महिला उपस्थित होत्या. यावेळी आर. जे. सुमित, सूर नवा ध्यास नवा फेम राधा खुडे व दांडिया स्पेशालिस्ट रिचा भडके यांच्या उपस्थितीने कार्यक्रमात एकच रंगत भरली.

अत्यंत आकर्षक रोषणाईने केलेले भव्यदिव्य रंगमंच, एलईडी स्क्रीन, साऊंड सिस्टीम, बैठक व्यवस्था यामुळे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात दांडिया सुरू झाल्या. याचवेळी रिमझिम पावसाचे आगमन झाले. जगदंबा मातेच्या आरतीने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर अमृतवाहिनी मॉडेल स्कूल, निडो स्कूल व इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींच्या सामूहिक गरबा नृत्याने कार्यक्रमाची रंगत आणखीच वाढवली.

रिमझिम पावसात राधा खुडेने गायलेलं ‘पाहुणं जेवला काय’, कोळीगीत व विविध लोकगीतांवर महिला भगिनींनी केलेल्या दांडिया नृत्यास भरभरून दाद मिळाली. याप्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले, एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून मागील तीन-चार वर्षांपासून अत्यंत नीटनेटके आयोजन करून दांडिया महोत्सव संपन्न होत असतो. यावर्षीचा हा दांडिया महोत्सव आपल्या सर्वांसाठी संस्मरणीय आहे. भर पावसातही इतक्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहात हे आपल्या सांस्कृतिक वैभवतेचे प्रतीक आहे. तर डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, नवरात्र उत्सव हा महिलांचा सन्मान वाढवणारा उत्सव आहे. यावर्षी सर्वत्र मोठ्या आनंदाने नवरात्र उत्सव साजरा झाला आहे. एकविराच्यावतीने विविध क्षेत्रात काम करणार्‍या महिलांचा सन्मान सातत्याने होत असून या दांडिया महोत्सवातून आपण सर्वजणी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करत आहोत. यानंतर सुमारे दोन तास रिमझिम पाऊस आणि देवीच्या विविध गीतांबबरोबर दांडिया रंगला.

Visits: 14 Today: 1 Total: 116978

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *