समन्वयाच्या अभावातून रेंगाळतेय संगमनेरची विसर्जन मिरवणूक! अपर अधिक्षकांनी पुढाकार घेण्याची अपेक्षा; सामाजिक कार्यकर्त्यांनीही पुढे येण्याची गरज..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
एकशेतीस वर्षांहून अधिक मोठा इतिहास असलेल्या संगमनेरच्या विसर्जन मिरवणुकीत मानाच्या गणपती मंडळाकडून घेतल्या जाणार्या अतिरीक्त वेळेच्या कारणाने अनेक छोट्या-मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये नाराजी आहे. शांतता समितीच्या बैठकीत बाजारपेठ व्यापारी मंडळाने मुख्य मिरवणुकीतून माघार घेत असल्याचे सांगताच या विषयाला वाचा फुटली आणि त्यातून मानाच्या मंडळाकडून होणार्या मनमानीवर पहिल्यांदाच उघड चर्चा झाली. यावर अपर पोलीस अधिक्षकांनीही भाष्य करीत ऐतिहासिक परंपरा जोपासण्यासाठी वेळेचे महत्त्व अधोरेखीत केले होते. दैनिक नायकमधील बुधवारच्या वृत्तानंतर मानाच्या मंडळाच्या उपाध्यक्षांनी स्वतः संपर्क साधून गवंडीपूरा मशिदीपाशी वेळेत येवूनही पाठीमागील मंडळांच्या गैरहजेरीमुळे मिरवणुकीस विलंब होत असल्याचे सांगत त्याला अन्य मानाची मंडळे कारणीभूत असल्याचा उंगली निर्देश केला. त्यातून मानकरी मंडळांमध्येच समन्वयाचा अभाव असल्याचेही दिसून आले आहे. मात्र त्याचा फटका अडीच दशकांपूर्वी पर्यंत दिवसभर विसर्जन मिरवणुकांनी बहरणार्या मेनरोडला बसला आहे. या ऐतिहासिक परंपरेचे महत्त्व कायम ठेवण्यासह ते पुढच्या पिढ्यांपर्यंत जाण्यासाठी संगमनेरचा इतिहास आणि भूगोल अशा दोहींचा अभ्यास असलेल्या अपर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी समन्वयकाची भूमिका बजावण्यासह शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतल्यास संगमनेरच्या या वैभवशाली परंपरेला गतवैभव प्राप्त होण्याची शक्यता आहे.

विविध ऐतिहासिक घडमोडींचे केंद्र राहिलेल्या संगमनेरच्या सार्वजनिक गणेशोत्सवालाही खूप मोठी परंपरा आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वसामान्यांचा सहभाग वाढावा यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवाला सार्वजनिक स्वरुप दिल्यानंतरच्या दुसर्याच वर्षी संगमनेरच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. भजन-कीर्तनासह नाटक आणि कथांमधून लोकांना एकत्र करुन त्यांच्यात राष्ट्रप्रेरणा
भरण्याचे काम त्यावेळच्या या उत्सवातून व्हायचे. नंतरच्या काळात त्याचे स्वरुपही वाढत जावून शहरातील बहुतेक समाजांनी टप्प्याटप्प्याने आपापल्या मंदिरांमध्ये गणपतींची प्रतिष्ठापना करुन राष्ट्रकार्यात आपलाही हातभार लावला. स्वातंत्र्यलढ्यासाठी सहाय्यक ठरलेल्या या उत्सवांचे स्वरुप स्वातंत्र्यौत्तर काळात बदलत गेले. राज्याच्या निर्मितीनंतर विसर्जन मिरवणुकांच्या माध्यमातून कलह देखील निर्माण होवू लागले. त्याला प्रशासनाने स्थापनेनुसार अग्रक्रम देवून मानाचे ठरवताना रामबाण तोडगा काढला, मात्र आता बदललेल्या नियम-कायद्यांमुळे ‘तो’ तोडगाही निष्प्रभ ठरु लागला असून मानाच्या मंडळांच्या मनमानीचा फटका या ऐतिहासिक परंपरेलाच बसण्याची भीती निर्माण झाली आहे.

बुधवारी (ता.27) दैनिक नायकने संगमनेरच्या या ऐतिहासिक उत्सवावर प्रकाश टाकताना ‘मानाच्या गणपतीने अन्य मंडळांचा विचार करण्याची गरज!’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध करताना सोमेश्वर रंगारगल्ली मंडळाची मिरवणूक सकाळी आठ वाजता सुरु होवूनही नियोजित वेळेपूर्वी पालिका सोडीत नसल्याचा मुद्दा मांडला होता. गेल्या 27 वर्षांपासून मुख्य मिरवणुकीत सहभागी होणार्या बाजारपेठ व्यापारी मंडळाने याच
विषयाला वाचा फोडताना मिरवणुकीतून माघार घेतल्याचा धागा पकडून त्यातून अन्य मानाच्या गणेश मंडळांसह मुख्य मिरवणुकीच्या मार्गावरुन वाजतगाजत आपला बाप्पा नेण्याची मनशा असलेल्या सार्वजनिक मंडळांमध्ये नाराजी निर्माण होत असल्याची बाबही दैनिक नायकने समोर आणली होती. शांतता समिती बैठकीतही त्यावर चर्चा झाल्यानंतर अपर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी परंपरेला धोक्याची सूचना देत बदलांची गरज वर्तवली होती, त्यावरही आम्ही झोत टाकला.

या वृत्तानंतर सोमेश्वर रंगारगल्ली मंडळाचे उपाध्यक्ष अक्षय ढोरे यांनी स्वतः दैनिक नायकशी संपर्क साधून धक्कादायक दावा केला. सकाळी आठच्या सुमारास मंडळाची मिरवणूक सुरु झाल्यानंतर साडेबारा ते एकच्या दरम्यान गणपती गवंडीपूर्याजवळ असतो, मात्र त्यावेळी दुसर्या
क्रमांकापासून मागच्या मंडळांची गैरहजरी असल्याने आमच्या मंडळाने घाई करण्यात काहीच अर्थ नाही असा सूर त्यांनी अळवला. आमच्या मंडळाचा गणपती गवंडीपूर्याच्या पुढे सरकताच लागोलाग अन्य मानाच्या मंडळांनीही मिरवणूक मार्गावर प्रवेश केल्यास सायंकाळी चार वाजता पालिकेचे प्रवेशद्वार ओलांडण्याची तयारीही त्यांनी दाखवली. मात्र त्यांच्या संपूर्ण संभाषणात त्यांनी कोठेही मानाच्या पहिल्या गणपतीच्या 12 ते 15 तास चालणार्या मिरवणुकीला आपलेच मंडळ जबाबदार असल्याचे मान्य केले नाही.

वास्तविक मुख्य विसर्जन मिरवणुकीत दुसर्या क्रमांकाचा चौंडेश्वरी मंडळाचा गणपती गवंडीपूर्याजवळ मिरवणुकीत सहभागी होते. सकाळी आठच्या सुमारास रंगारगल्लीतील मिरवणुकीला सुरुवात होताच तासाभरातच हा गणपतीही कोष्टीगल्ली, मोमीनपूरा मार्गाने मिरवणुकीसाठी मार्गस्थ केला जातो. तिसर्या क्रमांकाचा साळीवाडा मंडळाचा गणपती रंगारगल्लीच्या लागोलाग त्याच मार्गाने निघतो. तर, राजस्थान मंडळाचा चौथ्या
क्रमांकाचा गणपती सकाळी अकराच्या सुमारास शास्त्री चौकातून बाजारपेठ मार्गे तेलिखुंटाकडे रवाना होतो. पाचव्या क्रमांकाचा चंद्रशेखर चौक व सहाव्या क्रमांकाचा नेहरु चौकाचा गणपती मानाचे पहिल्या आणि तिसर्या क्रमांकाचे गणपती पुढे सरकल्यानंतर लागलीच मिरवणुकीला लागतात. तर, सातव्या क्रमांकाचा माळीवाडा मंडळाचा गणपती नेहरु उद्यान, मोमीनपूरा, नवघरगल्ली मार्गाने मिरवणुकीला लागतो. त्यानंतरची भगतसिंग, नगवघरगल्ली, स्वामी विवेकानंद ही मानाची मंडळेही गवंडीपूरा आणि तेलिखुंटावरच मुख्य मिरवणुकीत सहभागी होतात.

वास्तवित पोलीस दप्तरी नोंद असलेली मानाची मंडळे वेळेत आपल्या जागेवरुन हलावित यासाठी प्रत्येक मंडळासाठी एका अधिकार्यासह काही कर्मचार्यांची नेमणूक केलेली असते. मानाच्या पहिल्या गणपतीची निघण्याची आणि संबंधित गणपतीची मिरवणुकीला लागण्याची वेळ लक्षात घेवून ठरलेल्या वेळी पोलिसांकडून सदरच्या मंडळाला मार्गस्थ केले जाते. या प्रक्रियेत फारतर अर्धातासाचा फरक पडू शकतो. त्यामुळे सोमेश्वर मंडळाचा
गणपती गवंडीपूरा मशिदीजवळ आल्यानंतर त्याच्या पाठीमागे लागणारी चौंडेश्वरी आणि साळीवाडा ही दोन्ही मंडळे हजरच असतात, तर, राजस्थान, चंद्रशेखर चौक आणि नेहरु चौकाचे गणपती तेलिखुंटाकडून गवंडीपूर्याच्या दिशेने असतात. त्यामुळे रंगारगल्लीचा मंडळेच हजर नसतात हा दावा फोल ठरतो. महत्वाचे म्हणजे रंगारगल्लीचा मान पहिला असल्याने या मंडळाने पाठीमागे कोण आहेत याचा विचार न करता आपले मंडळ पुढे नेल्यास पोलिसांकडून त्यामागील क्रमांकानुसार गणपती सोडले जावू शकतात.

असे घडल्यास मानाच्या गणपतींची मिरवणूक रात्री दहाच्या आत पालिकेच्या प्रवेशद्वारापल्याड गेल्यास संगमनेरच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीत शहरातील आणखी काही मोठी सार्वजनिक गणेश मंडळेही सहभागी होवू शकतात आणि 25 वर्षांपूर्वीचे वैभव प्राप्त करुन देवू शकतात. त्यासाठी आवश्यकता आहे ती मानाच्या गणेश मंडळांचा परस्परांशी संवाद होण्याची आणि समन्वयातून हा इतिहास जोरकसपणे पुढे नेण्याची. आपल्या
आनंदात आणखी दहा-वीस मंडळे सहभागी झाल्यास शहराच्या विसर्जन सोहळ्याची भव्यता वाढून सर्वच बाप्पांना वाजतगाजत आणि हजारोंच्या उपस्थितीत निरोप दिला जावू शकतो, त्यासाठी मानाच्या प्रत्येक मंडळाने फक्त एक पाऊल मागे घेण्याची गरज असून परस्परातील समन्वय वाढावा यासाठी श्रीरामपूरचे अपर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

