अकोलेतील शाहूनगरची आधुनिक समाजसेविका संगीता साळवे दारुबंदी चळवळीसह कोरोना एकल महिलांच्या पुनर्वसनासाठी देताहेत लढा..
नरेंद्र देशमुख, अकोले
अकोले शहरातील अवैध दारुविक्रीमुळे चर्चेत आलेल्या शाहूनगर येथील आधुनिक समाजसेविका संगीता साळवे यांनी महिलांच्या समस्या सोडविण्याबरोबर दारुमुळे उध्वस्त होणारे कुटुंबं वाचविण्याचा विडाच उचलला आहे. कोणतेही प्रबळ पाठबळ नसतानाही त्या महिलांसाठी बुलंद आवाज ठरत आहेत.
दोनवेळच्या जेवणाची भ्रांत आणि कोणताही भक्कम आधार नसणार्या संगीताताईंच्या पतीला दारुचे व्यसन होते. त्यातच पतीला कोविडची बाधा झाला. मात्र, आयुष्यभराचा साथीदार वाचविण्यासाठी प्रचंड आशावादी राहून मुंबईपर्यंत उपचारांसाठी हलविले. परंतु नियतीने डाव साधला आणि दोन वर्षांपूर्वी पतीची साथ कायमची विरली. सध्या आशा सेविका म्हणून काम करून येणार्या तुटपुंज्या मानधनावर कुटुंबाचा गाडा हाकत आहेत. दोन मुली, एक मुलगा असे चौघांचे कुटुंब त्या चालवत आहे. शिक्षणासाठी त्यांची मोठी कसरत होत आहे. परंतु अपार मेहनत करून आपल्या मुलांना शिकवायचे असा निर्धार त्यांनी केलेला आहे.
अशा कठीण परिस्थितीत त्यांच्या वाट्याला आलेले दुःख व यातना दुसर्या महिलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्यांनी हेरंब कुलकर्णी, प्रतिमा कुलकर्णी आणि डॉ. अजित नवले यांच्या मार्गदर्शनाखाली दारुबंदी आंदोलन समितीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. या माध्यमातून अनेक कुटुंबं दारुमुळे उध्वस्त होण्यापासून वाचविली. तर अनेक महिलांना भक्कम आधार देऊन सुखाचे जीवन जगण्याची वाट दाखवली. अवैध दारुविक्री करणार्यांना इतर व्यवसाय करण्यास प्रवृत्त तर केलेच. परिणामी अवैध दारुविक्री बंद होण्यास त्यांना यश मिळाले. याचबरोबर कोरोनाने विधवा झालेल्या महिलांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांचे काम सुरू आहे. वेळप्रसंगी महिलांच्या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी मोर्चे, आंदोलनेही करतात. अशा नवदुर्गेला अजून काम करण्याची ऊर्जा मिळावी म्हणून दैनिक नायकतर्फे शुभेच्छा!