मतदानासाठी तरुणाचा सायकलवरुन 180 किलोमीटर प्रवास! बारामती ते वळण; मतदान अधिकारासह व्यायामाचा दिला संदेश
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील 44 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता.15) सकाळपासून उत्साहात मतदानाला सुरुवात झाली. नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेल्या एका मतदाराने चक्क सायकलवरुन रपेट मारली. बारामती ते वळण असा 180 किलोमीटरचा सायकल प्रवास करून, 9 तास 33 मिनिटांत गाव गाठले. मतदान अधिकाराच्या कर्तव्याची जाणीव व सायकलींग व्यायाम असा दुहेरी संदेश देऊन त्या तरुणाने जनजागृती केली. याबद्दल ग्रामस्थांनी सत्कार व स्वागत करून तरुणाचे कौतुक केले आहे.
विजय भाऊसाहेब बनकर (वय 38, रा.वळण) असे या तरुणाचे नाव आहे. ते बारामती येथे एका कंपनीत नोकरीमुळे स्थायिक झाले. परंतु, मूळगावी वळण येथे त्यांच्या आई व भावाचे कुटुंब राहते. मतदानाच्या कर्तव्याबरोबर आईचे तिळगूळ घेण्याचा योग जुळून आल्याने बनकर यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता बारामती सोडली. सायंकाळी सात वाजता 180 किलोमीटरचा सायकल प्रवास करून वळण येथे घर गाठले. त्यांचे कुटुंबाप्रती असलेले प्रेम, मतदानाच्या अधिकाराची जाणीव व सायकलींगची आवड ग्रामस्थांना भावली. गावात पोहोचल्यावर ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करून स्वागत केले.
तालुक्यात 44 ग्रामपंचायतींच्या 168 पैकी 8 मतदार केंद्रांवरील उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. 418 पैकी 56 सदस्यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे उर्वरित 312 सदस्यांच्या निवडीसाठी 160 मतदान केंद्रांवर सकाळी साडेसात वाजल्यापासून शांततेत मतदान सुरू झाले होते. तालुक्यात एकही ग्रामपंचायत संवेदनशील घोषित नाही. तरी पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी प्रत्येक मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.