अमोल वाकचौरे आत्महत्या प्रकरणी तिघांना अटक अटकपूर्व जामीन मिळविण्यापूर्वीच पोलिसांनी पकडले


नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील निंब्रळ येथील अमोल वाकचौरे या तरुणाच्या आत्महत्या प्रकरणी त्याची पत्नी, सासू व मेव्हणा या तिघांना अकोले पोलिसांनी मंगळवारी (ता.4) अटक केली आहे.
निंब्रळ येथील अमोल कैलास वाकचौरे याचा गावातीलच पोलीस खात्यात सेवेत असलेल्या तरुणीशी 5 नोव्हेंबर 2018 रोजी प्रेमविवाह झाला होता. विवाहानंतर दोघेही मुंबईला राहत होते. त्यानंतर दोघात वाद होऊ लागल्याने वाकचौरे दोन वर्षांपासून निंब्रळ गावी राहत होता. तसेच त्याच्या पत्नीचे योगेश गोसावी (रा. नांदगाव जि. नाशिक) याचेबरोबर प्रेमसंबंध असल्याचे माहीत झाल्याने वाद झाले. पत्नी व तिची आई यांनी 23 सप्टेंबर 2021 रोजी मारहाण करुन मुंबई येथून घराबाहेर काढून दिले होते.

पत्नी, सासू व मेव्हुणा यांच्या त्रासामुळे अमोलने शेडच्या लोखंडी पाईपला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मयत अमोलच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पत्नी करुणा अमोल वाकचौरे, तिचा प्रियकर योगेश गोसावी, संकेत राधाकिसन सोनवणे, प्रतिभा राधाकिसन सोनवणे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस आरोपींच्या मागावर होते. या प्रकरणातील सासू, मेव्हणा, पत्नी हे आरोपी संगमनेर न्यायालयात मंगळवारी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी चालले असता त्यांना मयताचे नातेवाईक आणि पोलिसांनी पकडले.

सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मयताच्या नातेवाईकांनी अकोले पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून ठिय्या आंदोलनाचा प्रयत्न केला. नातेवाईकांच्या जमावाला बाहेर काढून देत चार-पाच जणांशी चर्चा करुन पोलिसांनी वातावरण शांत केले. अकोले पोलिसांनी आत्तापर्यंत तीन आरोपींना अटक केली असून लवकरच चौथ्या आरोपीला अटक केली जाईल, असे सहायक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांनी सांगितले.

Visits: 216 Today: 1 Total: 2122353

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *