श्रीरामपूर तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा झाडे पडली; शेतकर्‍यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील प्रवरा काठावरील गावांना रविवारी (ता.5) सायंकाळी मान्सून पूर्व पावसाने वादळी वार्‍यासह जोरदार हजेरी लावली. वादळाने नर्सरी परिसरात झाडे पडली. बेलापूरच्या आठवडे बाजारात दाणादाण उडाली. यामुळे परिसरात वीज पुरवठाही काही काळ खंडीत झाला होता.

रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास प्रवरा नदीकाठच्या उक्कलगाव, बेलापूर खुर्द, नर्सरी, बेलापूर बुद्रुक, वळदगाव, उंबरगाव या परिसरात सोसाट्याचा वारा सुटला. त्यानंतर लगेचच पावसाला सुरुवात झाली. सुमारे 10 ते 20 मिनिटे पाऊस झाला. परंतु वादळ असल्याने पाऊस पुढे सरकला. बेलापूर-नगर रस्त्यावरील नर्सरी येथे रस्त्यात झाडे पडल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. ती बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. त्यात रविवारी बेलापूरचा बाजार असल्याने भाजी विक्रेते आणि ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक पाल उडून गेले.

दरम्यान, तालुक्याच्या इतर भागात काही प्रमाणात वादळी वारा होता. श्रीरामपूर शहरातही वारा वगळता पावसाचे फक्त वातावरण होते. गोंडेगाव परिसरात वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकर्‍यांच्या कांदा चाळीत पाणी शिरले. काही जनावरांच्या निवार्‍याचे पत्रे उडाले तर आंब्याच्या झाडाच्या कैरी गळून पडल्या. झाडे व विजेचे खांब पडले. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले.

श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावर दत्तनगरपासून खंडाळा व परिसरात सोसाट्याच्या वार्‍यासह पाऊस झाला. वाकडी फाट्यापासून सुरू झालेल्या पावसाने जागृती इंडस्ट्रियल समोरील झाड पडल्याने रहदारीस अडथळा निर्माण झाला. त्यानंतर अरिहंत मार्बलसमोर एका झाडाच्या फांद्या तुटल्या नवज्योत पेट्रोलियम समोर विद्युत वाहक तारांवर झाड पडल्याने विजेचा खांब तुटून तारा व झाड रस्त्यावर आडवे पडले. तेथे पूर्ण रहदारी ठप्प झाली. परिसरातील युवकांनी याठिकाणी धाव घेऊन मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला. परंतु रहदारीमध्ये सुरळीतपणा आला नाही. कमी-अधिक प्रमाणामध्ये दत्तनगर ते बाभळेश्वर दरम्यान किमान वीस ते पंचवीस झाडे पडली. कालव्याच्या कडेला असलेले निवृत्ती खरात यांच्या घरावर लिंबाचे झाड पडले. विद्युत खांब पडल्यामुळे परिसरामध्ये रात्रभर विद्युत पुरवठा सुरू होण्याची शक्यता नाही.

Visits: 194 Today: 1 Total: 1880530

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *