साहेब… आम्हांला फक्त राहण्यासाठी घराची गरज हाय! आंबीदुमाला येथील जळीतग्रस्त कुटुंबातील महिलेची विनवणी..

नायक वृत्तसेवा, घारगाव
साहेब… अनेकांनी संसारोपयोगी साहित्य, कपडे, किराणा, धान्य आदी साहित्य भेट दिले आहे. मात्र आता फक्त आम्हांला राहण्यासाठी घराची गरज आहे, अशी विनवणी करताना योजना चंद्रकांत भुतांबरे या आदिवासी महिलेला अश्रू अनावर झाले होते. त्यामुळे आता जीवन जगण्यासाठी मोठा सहारा मिळाला असला तरी निवार्‍यासाठी समाजातील दानशूरांनी पुढे येण्याची गरज आहे.

संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील आंबीदुमाला येथील सख्ख्या भुतांबरे भावांच्या सपराला आग लागल्याने आगीत रोख रक्कम, सोन्याचे दागिने, दुचाकी, धान्य व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे हे आदिवासी कुटुंब उघड्यावर आले होते. मात्र या कुटुंबाच्या मदतीला वंचित बहुजन आघाडी जिल्हा संघटक शिवाजी तळपे, मुन्ना शेख, अक्षय सरोदे, सागर काळे, नवनाथ सरोदे, योगेश शेळके, भरत माळी, विशाल रोकडे, लक्ष्मण ढेरंगे, अक्षय प्रल्हाद सरोदे, विशाल काळे, राजेंद्र लामखडे, विश्वास काळे, अस्लम शेख, असीफ अन्सार यांनी संसारोपयोगी साहित्य, किराणा, भाजीपाला, कपडे देत मदतीचा हात दिला.

त्यानंतर आधार फाऊंडेशनच्यावतीने संसारोपयोगी साहित्य (भांडी), धान्याचा कट्टा, महिनाभर पुरेल असा किराणा, अंथरूण-पांघरूणाचे साहित्य आणि शिक्षण घेणार्‍या दोन मुलांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. दोन्ही कुटुंबातील सदस्यांसाठी आधार फाऊंडेशनतर्फे या साहित्यांची व्यवस्था केली. हे साहित्य पोहोच करण्यासाठी फाऊंडेशनचे समन्वयक सुखदेव इल्हे, पी. डी. सोनवणे, सोमनाथ मदने आदी उपस्थित होते. याचबरोबर घारगाव येथील प्रसिद्ध फुलांचे व्यापारी दिलीप आहेर, हॉटेल लक्ष्मीचे संचालक अमीर शेख यांनी प्रत्येकी अकराशे रुपये तर माजी सरपंच सुरेश गाडेकर यांनी पाचशे रुपये अशी रोख स्वरूपात सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून भुतांबरे कुटुंबांना मदत केली. परंतु, साहेब आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे काम करत असून, या घटनेने आमची मोठी हानी झाली आहे. आमच्या कुटुंबांना खूप लोकांनी मदत केली हे आम्ही कधीही विसरणार नाही. फक्त आता आम्हांला घराची गरज आहे असे सांगताना योजना भुतांबरे यांना अश्रू अनावर झाले होते.

खरेतर कोणत्याही संकटात धावून जाणारा तालुका म्हणून संगमनेरची ओळख आहे. आता देखील अनेक दानूशर व्यक्ती व संस्थांनी जळीतग्रस्त भुतांबरे कुटुंबांना मदत केली आहे. परंतु, त्यांचा हक्काचा निवाराच नियतीने ओढून नेल्याने ते हतबल आहेत. त्यासाठी संसारोपयोगी मदतीबरोबर त्यांना पुन्हा हक्काचा निवारा होण्यासाठी समाजातील दानशूरांनी पुढे येण्याची गरज आहे.

Visits: 157 Today: 1 Total: 2060470

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *