कोविडने घेतला सप्टेंबर महिन्यातील बारावा बळी! बळींची संख्या वाढण्यासोबतच अवघ्या पंधरा दिवसांतच पडली आठशे रुग्णांची भर


नायक वृत्तसेवा, संगमनेर
दोनच दिवसांपूर्वी वेल्हाळे आणि मंगळापूर येथील ‘देवमाणसांचे’ बळी घेणार्‍या कोविडने मंगळवारी रात्री तालुक्यातील आणखी एकाचा बळी घेतला आहे. गेल्या दोन दिवसांत तालुक्यातील तिघांचे तर या महिन्यातील अवघ्या पंधराच दिवसांत तब्बल बारा जणांचे बळी गेल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली आहे. मंगळवारी बळी गेलेला इसम कौठे धांदरफळ येथील असून शहरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते, त्या दरम्यानच त्यांचे निधन झाले आहे. त्यांचा कोविडनेच बळी गेला असल्याच्या वृत्ताला उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांनी दुजोरा दिला आहे.


या महिन्याच्या सुरुवातीपासूनच तालुक्यातील कोविडचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत कोविडने संगमनेर तालुक्यातील 170 गावांपैकी 131 गावांना पछाडले आहे. मंगळवारच्या अहवालापर्यंत तालुक्यातील 2 हजार 467 जणांना कोविडचे संक्रमण झाले आहे. यातील 818 रुग्ण शहरातील तर 1 हजार 649 रुग्ण ग्रामीणभागातील आहेत. आजच्या स्थितीत तालुक्यातील केवळ 226 रुग्ण सक्रीय संक्रमित असून त्यांच्यावर शहरातील विविध कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. तर शासकीय नोंदीनुसार आत्तापर्यंत तालुक्यातील 32 जणांचा जीवही गेला आहे.


दोनच दिवसांपूर्वी सोमवारी (ता.14) मंगळापूर व वेल्हाळे येथील दोघांचा कोविडने बळी घेतला होता. ही दोन्ही माणसं त्या त्या गावच्या पंचक्रोशीत देवमाणसं म्हणून परिचित होती. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने या गावांच्या परिसरात अक्षरशः शोककळा पसरली आहे. हे दुःख सहन करीत असतांनाच त्याच्या दुसर्‍याच दिवशी रात्री तालुक्यातील कौठे धांदरफळ येथील 55 वर्षीय इसमाचाही बळी गेला आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील कोविड बळींची संख्या आता 38 झाली आहे. मात्र शासकीय दप्तरी अद्यापही 32 मृत्युचीच नोंद आहे.


मंगळवारी मृत्यु झालेल्या कौठे धांदरफळ येथील 55 वर्षीय इसमावर गेल्या 28 ऑगस्टपासून शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. या दरम्यान त्यांची प्रकृती खालावत गेल्याने व गेल्या दोन दिवसांत त्यांची अवस्था अत्यंत गंभीर बनल्याने त्यांच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र कोविडने त्यांच्या श्‍वसन यंत्रणेवरच ताबा मिळविल्याने त्यांना वाचवण्यासाठी सुरु असलेली वैद्यराजांची शर्थ अखेर तोकडी ठरली आणि मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. या मृत्युने हळहळ व्यक्त होत असून गेल्या दोन दिवसांत तिसरा तर 1 सप्टेंबरपासून बारावा बळी गेल्याने संगमनेरात खळबळ उडाली आहे.


1 सप्टेंबररोजी माळीवाड्यातील 70 वर्षीय इसम, 2 स्पटेंबररोजी समनापूर येथील 62 वर्षीय इसम, 3 सप्टेंबररोजी मालदाड येथील 35 वर्षीय तरुण, 5 सप्टेंबररोजी चंदनापूरी येथील 39 वर्षीय तरुण, 6 सप्टेंबररोजी गिरीराजनगर येथील 59 वर्षीय इसम (हा मृत्यु बाह्य जिल्ह्यात गणला गेला आहे.), पंपींग स्टेशन येथील 73 वर्षीय महिला, चिखलीतील 76 वर्षीय महिला व घुलेवाडीतील 80 वर्षीय इसम, 11 सप्टेंबररोजी हिवरगाव पठार येथील 55 वर्षीय इसम, 14 सप्टेंबररोजी वेल्हाळे येथील 65 वर्षीय व मंगळापूर येथील 65 वर्षीय इसम तर कालच्या मंगळवारी कौठे धांदरफळ येथील 55 वर्षीय इसम अशा एकुण बारा जणांचे बळी गेले आहेत.

Visits: 10 Today: 1 Total: 79917

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *