पठारभागातील नराधमाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार! आई-वडीलांना जीवे मारण्याची धमकी देत चार महिन्यांपासून सुरु होते दुष्कृत्य..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अवैध धंदे आणि वाळू तस्करीचे आगार बनलेल्या तालुक्यातील पठारभागातून धक्कादायक वृत्त हाती आले आहे. या परिसरातील एका पंधरा वर्षीय विद्यार्थीनीवर तिच्या आई-वडीलांना जीवे मारण्याची धमकी देत एका नराधमाने गेल्या चार महिन्यांपासून वेळोवेळी शारीरिक अत्याचार केले. सदरची मुलगी गरोदर राहिल्याने त्या नराधमाचे दुष्कृत्य उघड झाले. पीडित अल्पवयीन मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी मयूर मोहन कौटे या नराधमावर बलात्कारासह बालकांचे लैंगिक अत्याचारपासून संरक्षण करणार्‍या कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. या वृत्ताने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना पठारभागातील एका निवासी शाळेच्या परिसरात घडली आहे. यातील नराधम आरोपी मयूर मोहन कौटे याने दिवाळीनंतर सदर अल्पवयीन मुलीला दमदाटी करीत तिच्यावर बलात्कार केला. या कृत्याला तिने विरोध केला असता त्या नराधमाने तिच्या आई-वडीलांना जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर इच्छेविरुध्द शारीरिक अत्याचार केले व सदरची घटना कोणासही न सांगण्याचा दमही भरला. या सर्व प्रकाराने घाबरलेल्या त्या मुलीने याची कोठेही वाच्यता केली नाही. त्यामुळे मनोबल वाढलेल्या त्या नराधमाने त्यानंतर वेळोवेळी तिला ‘त्या’ शाळेच्या परिसरात नेवून गेल्या चार महिन्यांपासून सातत्याने तिच्यावर अत्याचार केले. या प्रकारातून त्या मुलीला पोटदुखीच्या वेदना होवू लागल्याने तिच्या आई-वडीलांनी तिला दवाखान्यात नेले असता तिच्या तपासणीत ती तीन महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले. हा प्रकार समजताच मोलमजूरी करुन आपली उपजीविका साधणार्‍या त्या गरीब कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. मात्र संबंधित रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांना धीर देत घारगाव पोलीस ठाण्यात जावून तक्रार देण्याचा सल्ला दिला.

त्यानुसार संबंधित अल्पवयीन मुलीच्या वडीलांनी घारगाव पोलीस ठाण्यात जावून पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांना घडला प्रकार सांगितला. त्यावरुन त्यांनी तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावरुन घारगाव पोलिसांनी नराधम मयूर मोहन कौटे (वय 27) याच्यावर भारतीय दंड संहितेचे कलम 396 (2) (।) (एन), 506 व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्‍या कायद्याचे (पोस्को) कलम 4 नुसार गुन्हा दाखल करुन त्या नराधमाला अटक केली आहे. आज त्याला न्यायालयासमोर उभे केले जाणार असून पोलिसांकडून त्याच्या कोठडीची मागणी केली जाणार आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धिरज राऊत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षात घारगाव पोलीस ठाण्याच्या निष्क्रीयतेमुळे संपूर्ण पठारभागात गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या भागात अंमली पदार्थासह मटका, जुगार व वाळू तस्करीच्या घटनाही वाढल्या असून यामागे पोलिसांचे पाठबळ असल्याचे आरोपही वेळोवेळी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून जांबुत परिसरात वाळू तस्कर आणि ग्रामस्थ यांच्यात वादाची ठिणगी पेटलेली असतांनाही पोलिसांची बघ्याची भूमिका हे स्पष्ट करणारी ठरली आहे. त्यातूनच गुन्हेगारी आणि विकृतीचे मनोबल उंचावले असून पठारावरील गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे, त्यात आज अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेची भर पडली आहे. या प्रकाराने पठारभागासह संपूर्ण तालुक्यातून संताप व्यक्त होत असून त्या नराधमाला कठोर शासन करण्याची मागणी होत आहे.

Visits: 147 Today: 1 Total: 1804404

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *