हिवरगावच्या ‘त्या’ बालकांचा ‘अपघात’ नव्हे ‘घातपात’? महिना होवूनही तपास शून्य; आक्रमक ग्रामस्थांनी पुणे-नाशिक महामार्ग रोखला..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
वडिल मयत असलेल्या हिवरगाव पावसा येथील दोघा बालकांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मागील महिन्यांत राम नवमीच्या दिनी तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे घडली होती. या घटनेपासूनच मयत मुलांचे नातेवाईक आणि ग्रामस्थ घातपाताचा संशय व्यक्त करीत आहेत. त्या अनुषंगाने ‘त्या’ बालकांच्या आजोबांनी उपविभागीय पोलीस अधिकार्यांकडे तक्रार देत सखोल चौकशीची मागणीही केली होती. मात्र अद्यापपर्यंत या प्रकरणी ‘अकस्मात’ मृत्यूचीच नोंद असल्याने हिवरगाव पावसाचे ग्रामस्थ त्या विरोधात आक्रमक झाले आहेत. या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करुन गावांत सुरु असलेल्या ‘नाजूक’ चर्चेच्या अनुषंगाने तपास करण्याच्या मागणीसाठी आज हिवरगाव पावसा गांव बंद ठेवून टोलनाक्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
गेल्या महिन्यांत 17 एप्रिलरोजी देशभरात श्रीराम नवमीचा उत्साह ओसंडून वाहत असतानाच दुपारी चारच्या सुमारास सदरची दुर्दैवी घटना समोर आली होती. हिवरगाव पावसा येथे राहणारे रितेश सारंगधर पावसे (वय 12) व त्याचा सख्खा भाऊ प्रणव सारंगधर पावसे (वय 9) हे दोघे रामनवमीची सुट्टी असल्याने दुपारच्या जेवणानंतर आपल्या सायकलसह खेळण्यासाठी घराबाहेर पडले. आपल्या घरापासून काही अंतरावर असलेल्या एका नातेवाईकाच्या घरी गेल्यानंतर तेथून परत येताना परिसरातील एका शेततळ्यात पाय घसरुन दोघेही पाण्यात पडले. मात्र दुर्दैवाने ही घटना घडली त्यावेळी त्या परिसरात कोणीही नसल्याने त्यांच्याकडे कोणीही पाहीले नाही.
मात्र काही वेळानंतर या दोन्ही मुलांच्या पायातील चपला शेततळ्यातील पाण्यावर तरंगत असल्याचे काहींच्या लक्षात आल्यानंतर काहीतरी दुर्घटना घडली असावी या संशयातून शेततळ्यात शोध घेतला असता वरील दोघे पाण्यात बुडाल्याची बाब समोर आली. याबाबत तालुका पोलिसांना माहिती देत बुडालेल्या दोन्ही मुलांना तातडीने घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले. वेदनादायक म्हणजे या घटनेच्या अवघ्या वर्षभरापूर्वीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते, त्यामुळे या घटनेने संपूर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त झाली.
या प्रकरणी तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करीत दोन्ही मुलांचे शवविच्छेदन केले असता त्यातूनही त्यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांच्या दृष्टीने ‘त्या’ प्रकरणात तपासासारखे काही शिल्लक राहीले नाही. मात्र या घटनेपासूनच हिवरगाव पावसा गावांत वेगवेगळ्या चर्चांना अक्षरशः उधाण आले. त्यातून सदरची घटना कोणाच्या डोळ्यादेखत घडलेली नसताना अचानक बुडीतांना पाण्याबाहेर काढण्यासाठी उपस्थित झालेली माणसं आणि त्यातून चर्चेत आलेला ‘नाजूक’ विषय यामुळे सदरचा प्रकार अपघात नसून घातपातच असल्याची चर्चा आकाराला आली आणि ‘त्या’ दोन्ही मुलांचा खुनच झाल्याचे बोलले जावू लागले.
या घटनेनंतर मयत मुलांच्या आजोबांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे तक्रार करीत घातपाताचा संशय व्यक्त केला होता. त्यावरुन त्यांनीही संशय असलेल्यांना आपल्या कार्यालयात बोलावून सखोल चौकशीही केली. मात्र त्यातून काही निष्पन्न झाले नाही. परंतु या मुलांचा घातपातच असल्याच्या संशयावर त्यांचे आजोबा व अन्य नातेवाईक ठामच राहील्याने अखेर त्याला गावातील ग्रामस्थांचेही पाठबळ मिळू लागले. त्यातूनच गेल्या 22 मे रोजी गावकर्यांनी पोलीस अधिक्षकांना निवेदन पाठवले. या निवेदनातही त्यांनी दोन्ही मुलांचा मृत्यू सामान्य नसून त्यात घातपात असल्याचे नमूद केले.
या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करुन संशयीतांना ताब्यात घेवून चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली. तसेच, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व तालुका निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्याकडे वारंवार तक्रारी करुनही कोणतीच कारवाई होत नसल्याने पोलीस गुन्हेगारांना पाठबळ देत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला होता. या प्रकरणात मंगळवारपर्यंत (ता.28) खुनाचा गुन्हा दाखल न केल्यास आज (ता.29) हिवरगाव पावसा गाव बंद ठेवून टोलनाक्यावर रास्तारोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. या निवेदनावर गावातील दीडशेहून अधिक ग्रामस्थांनी सह्या केल्या आहेत हे विशेष.
सामान्यपणे खेळता खेळता ही दोन्ही मुलं नातेवाईकाच्या घरी गेली व तेथून परत येताना पाय घसरुन शेततळ्यात बुडून मरण पावली असे सांगण्यात आले. शवविच्छेदन अहवालातूनही दोन्ही मुलांचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे स्पष्ट झाले. सदरची घटना मयत मुलांच्या घरापासून काही अंतरावर घडली होती. मात्र त्यानंतर त्यांना बाहेर काढण्यासाठी जमलेल्या लोकांमध्ये अशी माणसं उपस्थित होती की त्यावेळी त्यांची तेथील उपस्थितीच संशयाला जागा करुन देणारी ठरली. मयत मुलांना बाहेर काढल्यानंतरही तेथे घडलेला प्रकार संशयात भर घालणारा ठरला. त्यातूनच मयत मुलांच्या आजोबासह नातेवाईक व ग्रामस्थांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून पोलिसांनी दोन्ही मुलं पाय घसरुन शेततळ्यात पडली की त्यांना पाडण्यात आले याचा शोध घेण्याची मागणी होत आहे. त्यासाठीच आजचे आंदोलन पुकारण्यात आले होते.