अकोलेच्या नगराध्यक्षपदी सोनाली नाईकवाडी तर उपनगराध्यक्षपदी बाळासाहेब वडजे बिनविरोध

नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले नगरपंचायतच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक नगरपंचायत सभागृहात पिठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता.16) पार पडली. भाजपचे 12 आणि विरोधी राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीचे 4 असे 16 नगरसेवक सभेला उपस्थित होते. यामध्ये भाजपच्या सोनाली नाईकवाडी यांना 12 मते पडली. तर नवनाथ शेटे यांना 4 मते मिळाली. काँग्रेसचे एकमेव नगरसेवक प्रदीपराज नाईकवाडी सभागृहाकडे फिरकलेच नाहीत. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.मंगरुळे यांनी नगराध्यक्षपदी सोनाली नाईकवाडी विजयी झाल्याचे घोषित केले.

याचबरोबर उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपचे बाळासाहेब वडजे यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे ते बिनविरोध निवडून आले. माजी मंत्री मधुकर पिचड, भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी आमदार वैभव पिचड, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अॅड. श्रीराम डेरे यांनी उपनगराध्यक्ष पदाच्या निवडी संदर्भात नगरसेवकांची वैयक्तिक मते जाणून घेतली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष गोंदकर यांनी उपनगराध्यक्षपदी बाळासाहेब वडजे यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर नगरपंचायतमध्ये येऊन माजी आमदार वैभव पिचड, जिल्हा परिषद सदस्य कैलास वाकचौरे यांच्या उपस्थितीत वडजे यांनी उपनगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना वैष्णवी धुमाळ सूचक तर सागर चौधरी अनुमोदक आहेत. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाच्या निवडी घोषित होताच भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
