माघी पोर्णिमेनिमित्त खंडोबारायांच्या मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी! कोविडच्या सावटातही देवगडला यात्रा; दर्शनासाठी भाविकांनी लावल्या रांगा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
धार्मिक मान्यतेनुसार माघ महिना अत्यंत पवित्र समजला जातो. या महिन्यात गणेश जयंती, वसंत पंचमी, रथसप्तमी, भीष्माष्टमी, भीष्मद्वादशी असे विविध उत्सव येतात, त्यात माघ पोर्णिमेला विशेष महत्त्व आहे. हा दिवस म्हाळसादेवीचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्याची महाराष्ट्रात पद्धत असून कुलदैवत खंडोबारायाच्या भेटीसाठी घरातील देव नेले जातात. यासोबतच संगमनेर, सुपे व जेजुरी येथील मानाच्या काठ्याही वाजतगाजत नेवून पोर्णिमेच्या दुसर्या दिवशी मंदिराच्या शिखरी टेकविल्या जातात. या दिवशी महाराष्ट्रातील सर्व खंडोबा मंदिरांमध्ये मोठी धामधूम असते. संगमनेरातही मल्हारी मार्तंडांची अनेक देवालये असून देवगड येथे मोठी यात्रा भरते. गेल्या तीन वर्षांपासून राज्यात कोविडचे सावट असले तरीही यंदा देवगडमध्ये यात्रा भरली असून दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी लोटली आहे.

संगमनेरपासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या देवगाव येथे श्री खंडोबारायांचे पुरातन मंदिर आहे. उंच टेकडीवर असलेल्या या मंदिरात माघ महिन्यात हरीनाम सप्ताह केला जातो. पोर्णिमेच्या दिवशी मुख्य उत्सव होतो. या दिवशी सकाळी देवाचा छबीनाही काढला जातो. वाजतगाजत खोबरे व भंडार्यांची उधळण करीत निघणार्या या मिरवणूकीत भाविक उत्साहाने सहभागी होतात व येळकोट येळकोट जय मल्हारचा घोष करतात. दिवसभर येथील मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. संगमनेर, अकोले व पारनेर तालुक्यातील भाविकांची या मंदिरावर मोठी श्रद्धा आहे.

यंदा कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यात्रा भरते की नाही अशी भाविकांच्या मनात शंका होती. मात्र श्रद्धेपुढे शंका निरर्थक ठरली असून देवगडच्या परिसरात खाद्यान्न, खेळणी, मनोरंजनाच्या छोट्या-मोठ्या साधनांनी हा संपूर्ण परिसर व्यापला आहे. पावसाळ्यात शेतात लावलेले धान्य या काळात तयार होत असल्याने त्यापासून बनविलेला नेवैद्यही देवाला दाखवण्याची परंपरा आहे. त्यानुसार अनेक भाविक दूरदूरवरुन देवासाठी नवधान्य घेवून येतात व ते देवाला वाहून समृद्धीची कामना करतात.

आजच्या दिवशी संगमनेरातील होलम राजाची काठी, सुपे (ता.बारामती) येथील खैरे पाटलांची काठी व जेजुरी येथील महाराजा होळकरांची काठीही वाजतगाजत जेजुरीत दाखल होत असते. पोर्णिमेच्या दुसर्या दिवशी या तिनही काठ्यांसह राज्यभरातून आलेल्या काठ्या मुख्य मंदिराच्या शिखराला टेकविल्या जातात. या उत्सवाला ‘शिखरी काठी उत्सव’ म्हणून संबोधले जाते. काही वर्षांपूर्वी मानावरुन झालेल्या वादानंतर एक वर्षआड संगमनेर व सुपे येथील काठ्यांना सर्वप्रथम शिखराला टेकविण्याचा मान आहे. माघ पोर्णिमेचे औचित्य साधून आज संगमनेर तालुक्यातील देवगाव, सावरगाव घुले, साळीवाडा, रंगारगल्ली, नवघर गल्ली व सय्यदबाबा चौक येथील खंडोबारायाच्या मंदिरांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. आज सकाळपासूनच या मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले गेले असून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.

