पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यासह जिल्हा पोलीस दलातील तिघांना महासंचालकांचे शौर्यपदक! आपल्या कार्यक्षेत्रातील एका कुटुंबाला ओलीस ठेवून जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्याच्या आवळल्या होत्या मुसक्या..
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
कर्तव्य बजावतांना प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून नागरिकांच्या प्राणांचे रक्षण करुन अद्वितीय साहस दाखवणार्या पोलीस अधिकारी व कर्मचार्यांचा दरवर्षी महाराष्ट्र दिनी सन्मान करण्यात येतो. यावर्षीच्या या सोहळ्यात श्रीरामपूर विभागाच्या पोलीस उपअधीक्षकांसह अहमदनगर पोलीस दलातील सहाय्यक फौजदार जितेंद्र ढवळे, पोलीस नाईक माधुरी तोडमल व दीपक घाटकर यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील अशा पराक्रमी पोलिसांची नावे जाहीर केली असून त्या सर्वांना पोलीस महासंचालकांचे विशेष शौर्यपदक देवून गौरविण्यात येणार आहे.
आपल्या धडाकेबाज कारवाईसाठी परिचित असलेल्या श्रीरामपूर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी गेल्यावर्षी राहुरी तालुक्यातील एका घटनेत अद्वितीय शौर्य दाखवले होते. एका गुन्हेगाराने हातात बंदुक घेत तालुक्यातील एका कटुंबाला ओलीस ठेवले होते. याबाबतची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक मिटके यांनी घटनास्थळी धाव घेत या कुटुंबाला त्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोराकडे बंदुक असल्याने त्याच्यापासून त्या कुटुंबाच्या जिवाला धोकाही निर्माण झाला होता. पोलिसांची एक चूक त्या कुटुंबासाठी धोक्याची ठरली असती.
यासर्व गोष्टींचा विचार करुन व कारवाईची योग्य दिशा ठरवून उपअधीक्षक मिटके यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि शस्त्रधारी आरोपी असतांनाही त्याच्या मुसक्या आवळून त्याने ओलीस ठेवलेल्या त्या कुटुंबाची सुखरुप सुटका केली. त्यांच्या या पराक्रमाची दखल घेवून नाशिक विभागाचे तत्कालीन विशेष पोलीस उपमहानिरीक्षक बी.जी.शेखर यांनी त्यांना प्रशस्तीपत्रक देवून त्यांचा सन्मान केला होता व पोलीस महासंचालकांच्या शौर्यपदाकासाठी त्यांच्या नावाची शिफारसही केली होती.
त्यानुसार पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यासह नगर पोलीस दलात कार्यरत असलेल्या सहाय्यक फौजदार जितेंद्र ढवळे, पोलीस नाईक माधुरी तोडमल व दीपक घाटकर यांनी कर्तव्य बजावतांना निष्ठेने व निर्भीडपणे कामगिरी बजावून महाराष्ट्र पोलीस दलाची गौरवशाली परंपरा कायम राखली. त्यांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्यामुळे केवळ अहमदनगर पोलीस दलच नव्हेतर संपूर्ण राज्याच्या पोलीस दलाची मान अभिमानाने उंचावली. त्यामुळे या पराक्रमी अधिकारी व कर्मचार्यांना पोलीस महासंचालकांचे विशेष शौर्यपदक देवून गौरविण्यात येणार आहे.