दुसर्याची ‘जमीन’ आपली दाखवून ‘जामिन’ मिळवण्याचा प्रयत्न! लांडेवाडीच्या उपसरपंचासह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा; जिल्ह्यात उडाली खळबळ..

नायक वृत्तसेवा, नेवासा
दुसर्याचे ओरबाडण्याच्या प्रयत्नात माणूस कोणत्या पातळीपर्यंत खाली जावू शकतो याचे मोठे उदाहरण जिल्ह्यातून समोर आले आहे. नेवासा तालुक्यातील एका शेतकर्याची जमीन आपलीच असल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र (नोटरी) तयार करुन त्याचा वापर करीत चक्क लांडेवाडीच्या (सोनई) उपसरपंचाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातून जामिन मिळविण्याचा प्रयत्न केला. उपसरपंचाचा हा सगळा खटाटोप समोर आल्यानंतर पुण्यात स्थायिक झालेल्या जमिनीच्या मूळ मालकाने सोनई पोलिसांकडे धाव घेत त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी लांडेवाडीचा उपसरपंच संजय पद्माकर दरंदले याच्यासह तिघांवर फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ज्याच्या जमिनीतून ऊस चोरला त्याची जमीनच आपल्या नावावर दाखवून अटकेपासून संरक्षण मिळविण्याचा हा जगावेगळा प्रकार पाहून सोनई पोलिसही चक्रावले आहेत. या प्रकाराने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सोनई पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सोनईतील लांडेवाडी येथील शेतकरी राजेंद्र श्रीनिवास अट्टल यांनी 17 मार्च, 2020 मध्ये लांडेवाडीतील गट नंबर 150 (जूना 857) मधील एकूण 1 हेक्टर 43 आर जमीन, त्यातील झाडेझुडपे, बोअर व उभ्या ऊसाच्या पिकासह अॅड.भरत रामराव जाधव, अॅड.प्रफुल्ल रामराव जाधव व पद्मा रामराव जाधव (रा.सोनई) यांना कायमस्वरुपी खरेदी खताद्वारे विक्री केली होती. त्याच जमिनीतील काही वर्षांपूर्वी विकलेल्या क्षेत्रातील ऊसाची चोरी झाली होती, त्याबाबत सोनई पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे. त्या प्रकरणाचा तपास सुरु असून त्यात लांडेवाडीच्या उपसरपंचाचाही समावेश आहे.

या दरम्यानच्या काळात ऊसचोरीच्या प्रकरणातील अटक टाळण्यासाठी उपसरपंच संजय दरंदले याने अट्टल यांनी 2020 साली दरंदले यांना विकलेल्या जमिनीचे 14 नोव्हेंबर, 2017 रोजी परस्पर आपल्या नावाने प्रतिज्ञापत्र (नोटरी) तयार केले. त्यासाठी जमिनीचे मूळमालक असलेल्या राजेंद्र अट्टल यांच्या बनावट स्वाक्षरीसह त्यांच्या अर्धवट स्वरुपातील आधारकार्डचाही वापर करण्यात आला. सदरची बाब समोर आल्यानंतर अट्टल पुण्याहून थेट सोनई येथे आले व त्यांनी अॅड.भरत जाधव यांची भेट घेतली असता उपसरपंच दरंदले याने दिवंगत अॅड.देवीदास लाटकर यांच्या मार्फत तयार केलेले खोटे प्रतिज्ञापत्र त्यांना दाखवले व सदरच्या प्रतिज्ञापत्राचा वापर करुन संजय दरंदले याने पूर्वी याच गट नंबरमधील क्षेत्रातून झालेल्या ऊस चोरीच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातून जामीन मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.

हा सगळा प्रकार पाहून हादरलेल्या 64 वर्षीय राजेंद्र अट्टल यांनी तडक सोनई पोलीस ठाणे गाठून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांना घडला प्रकार सांगितला. त्यांनी कागदपत्रांची पडताळणी करुन तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सोनई पोलिसांनी लांडेवाडीचा सरपंच संजय पद्माकर दरंदले याच्यासह भरत तुकाराम दरंदले व संतोष भास्कर तांदळे यां तिघांवर भारतीय दंडसंहितेच्या कलम 420, 468, 471, 34 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. ज्याच्या जमिनीतून ऊस चोरला त्याची जमीनच आपल्या नावावर दाखवून अटकेपासून संरक्षण मिळविण्याचा हा जगावेगळा प्रकार पाहून सोनई पोलिसही चक्रावले आहेत. या वृत्ताने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून सोनई परिसरात 420 उपसरपंच संजय दरंदले याचे किस्से सांगितले व ऐकले जात आहेत.

लांडेवाडीचा उपसरपंच संजय दरंदले याने अशाच पद्धतीने अनेकांची आर्थिक फसवणुक केल्याची चर्चा सध्या सोनई परिसरात सुरु आहे. राज्यातील सत्ताधारी पक्षाचा जिल्हाध्यक्ष नातेवाईक असल्याचा फायदा घेवून दरंदले याने सोनई परिसरात अनेक उद्योग केल्याचे समोर येत असून सोनईचे सहाय्यक निरीक्षक सचिन बागुल यांनी राजकीय दबाव झुगारुन फसवणूक झालेले शेतकरी व गोरगरीब नागरिक यांना न्याय मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अशा पद्धतीने फसवणूक झालेल्यांनी पुढे येण्याचीही गरज आहे.

