साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करणार! सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांची माहिती; गायीचे तूप विक्री प्रकरण

नायक वृत्तसेवा, शिर्डी
मुदत संपलेल्या गायीचे शुद्ध तूप अखाद्य कारणाकरिता विक्री करण्यासाठी निविदा काढल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने परवानगी दिली असल्याचे सांगून दिशाभूल केली असल्याची माहिती अधिकारात उघड झाली आहे. याविषयी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.

श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी या संस्थानचे मुदत संपलेले शुद्ध गायीचे 214 क्विंटल तूप निविदा काढून विक्रीला काढले होते. ही निविदा प्राप्त झाल्यानंतर त्यावर आक्षेप घेतला आहे. मुदत संपलेले तूप कुठल्याही प्रकारे विकता येत नाही. ही निविदा बेकायदेशीर असल्याचा आरोप केला असता मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी पत्रकार परिषद घेत हे तूप अखाद्य कारणासाठी वापरत आहे आणि त्याला अन्न व औषध प्रशासनाने परवानगी दिली आहे, असे पत्रकारांना सांगून दिशाभूल केली.

या संदर्भात माहिती अधिकारात अन्न व औषध प्रशासनाला माहिती विचारली की, एखादे खाद्यपदार्थ मुदत संपलेले आहे तर ते बाजारामध्ये विकण्याची नियमावली आणि अखाद्य पदार्थ बाजारात विकण्यासाठी तसेच नष्ट करण्यासाठी असलेली नियमावली देण्यात यावी. त्या अनुषंगाने माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीनुसार एखादे खाद्यपदार्थ मुदत संपल्यानंतर विकण्यासाठी कुठल्याही प्रकारची नियमावली उपलब्ध नाही आणि मुदत संपलेला माल विकणे हा गुन्हा ठरतो. तो नष्टच करावा लागतो. त्याचबरोबर अखाद्य कारणासाठी कुठल्याही प्रकारची नियमावली नाही. याचाच अर्थ असा की, एखादे खाद्यपदार्थ मुदत संपलेले असेल तर ते नष्ट करावे लागते. कुठल्याही प्रकारे अखाद्य म्हणून वापरण्यासाठी परवानगी नाही. परंतु साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हे तूप बाजारामध्ये निविदा काढून विकण्याचा घाट घातला होता. तसेच यापूर्वी देखील काही प्रमाणात तूप विकलेले असल्याची माहिती मिळाली आहे, असेही माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी सांगितले. जर त्यांनी अशाप्रकारे तूप विकले असेल त्याचप्रमाणे निविदा काढलेली आहे. हा दखलपात्र गुन्हा आहे. सदरचा दखलपात्र गुन्हा कुठल्याही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्या नागरिकाने पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी यासाठी कायद्यात तरतूद आहे. त्या अनुषंगाने साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचेही स्पष्ट केले.

Visits: 107 Today: 1 Total: 1123570

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *