लोकशाहीर विठ्ठल उमप लोककला प्रबोधन पुरस्कारांची घोषणा! प्रा.रंगनाथ पठारे, पत्रकार मधु कांबळे, अभिनेता मिलिंद शिंदे व गायक चंदन कांबळे यांचा समावेश..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरचे भूमीपूत्र, लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणार्‍या ‘लोककला प्रबोधन’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये संगमनेरचे साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे, नाट्य अभिनेता मिलिंद शिंदे, पत्रकार मधु कांबळे व पार्श्वगायक चंदन कांबळे यांचा समावेश आहे. येत्या रविवारी (ता.27) मुंबईतील दामोदर हॉलमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती लोकशाहीर विठ्ठल उमप लोककला थिएटरचे अध्यक्ष संदेश उमप यांनी दिली.

संगमनेर तालुक्यातील चिकणी येथील मूळनिवासी असलेल्या लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे बारा वर्षांपूर्वी निधन झाले. लोककला क्षेत्रात त्यांनी केलेल्या अफाट कामाचे सतत स्मरण रहावे यासाठी त्यांच्या मृत्यूपश्चात ‘लोकशाहीर विठ्ठल उमप लोककला थिएटर’च्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून त्यांच्या नावाने दरवर्षी ‘लोककला प्रबोधन पुरस्कार’ देण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून राज्यातील कला, साहित्य, प्रसार माध्यमं आणि सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या मान्यवरांना दरवर्षी हा पुरस्कार देवून गौरविण्यात येते. स्मृतीचिन्ह, महावस्त्र आणि मानपत्र असे स्वरुप असलेला हा पुरस्कार राज्यात प्रतिष्ठेचा समजला जातो.

यंदाच्या पुरस्कारप्राप्त मान्यवरांमध्ये राज्यातील प्रसिद्ध साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे, दैनिक लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे, नाट्य अभिनेता मिलिंद शिंदे आणि पार्श्वगायक चंदन कांबळे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या रविवारी (ता.27) मुंबईतील परळ येथील दामोदर हॉलमध्ये सायंकाळी पाच वाजता या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री, उदय सामंत, आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, प्रताप सरनाईक यांच्यासह राज्यातील कला, साहित्य व सिनेसृष्टीतील दिग्गज मंडळी या सोहळ्याला उपस्थित रहाणार आहेत.

या सोहळ्यानिमित्ताने रविवारी दुपारी साडेतीन वाजता कार्यक्रमस्थळी योगेश मोरे व उमेश चिपकर यांच्या शहनाई-क्लारनेट मैफीलीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमानंतर दिवंगत लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी लिहिलेल्या व गायलेल्या अजरामर गीतांचा सदाबहार कार्यक्रमही होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यास व त्यानिमित्ताने होणार्‍या विविध संगीत कार्यक्रमास संगमनेरकरांनी अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन लोकशाहीर विठ्ठल उमप लोककला थिएटरचे मंगेश वडांगळे यांनी केले आहे.

Visits: 171 Today: 2 Total: 1110395

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *